अद्वैत - अभंग २३०१ ते २३२०
२३०१
सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष भूमध्य । नव्हें सोहं ॥१॥
चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा । यासी जाणें अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥
अधिष्ठानीं सहाशे जप । स्वाधिष्ठांनी सहाशंजप तितुकें वोळखा निःशेष मणीपुरीं ॥३॥
अनुहातीं सहस्त्र । विशुद्ध अग्नी चक्र सहस्त्र । तीन ठायीं तीन सहस्त्र । जप होय ॥४॥
एकवीस सहस्त्र साशत । हें अवघेचि मारुत । त्यासी सोहं म्हणत । ते नाडिले ॥५॥
एका जनार्दनीं । सोहं नाहे पवन । पवनाचें वर्तन । सोहं सत्ता ॥६॥
२३०२
सोहं नव्हें प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन । इंद्रियांचे वर्तन । नव्हे सोहं ॥१॥
सोहं नव्हें विषयपंचक । सोहं नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥
सकार जाण माया । हंकार पुरुष शिष्यमय । शबक शुद्ध इये । जाणावें पैं गा ॥३॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा शबल पैं सकार । शुद्ध तो हंकार । ईश्वर पैं ॥४॥
स्थुल सूक्ष्म कारण । हा सकारचि जाण । हंकार तो महाकारण । ज्ञानरुप ॥५॥
एक जनार्दनीं तूर्या । सोहं तें दैवी माया । साक्षित्वें जाण असें श्रोतिया । सांगितलें ॥६॥
२३०३
अभ्यासीं द्रष्ट आटला । अहं सोहंचा घोट भरला । साक्षित्व देखोनि विराला । वास्तुमाजीं ॥१॥
जो जो वस्तु झाला केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि गेली ॥२॥
हारपलें ब्रह्मांड । हारपले पिंड - अंड । वस्तु झाला अखंड । त्यासी खंड नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं जाण । द्वैत गेलें मावळोल । मग वस्तुचि परिपुर्ण । भरली असे ॥४॥
२३०४
या देहा अमंगळा । पासुनी आत्मा वेगळा । ऐसा ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥
ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण । जेथें द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्वीस लक्षणें । बोलिलें षोढशाध्यायीं ॥२॥
ते दैवी प्रकृतीचें घरीं । परमात्मा राज्य करी । तो जयाएं अंगिकारी । तो सुटला गा ॥३॥
या पुरुषाचें बेचाळीस कुळ । पद पावले अढळ । आत्मतत्त्वीं सकळ । मिळणी आली ॥४॥
एका जनार्दनीं तेचि भेटी । जे अहंभावाची सुटे गांठीं । तो दैवी प्रकृतीचे मुगुटीं । सहजचि बैसे ॥५॥
२३०५
पिंडिच्या प्रळयासी सांगेन तुम्हांसी जो कां या देहासी होत आहे. ॥१॥
पृथ्वी बोलिजे प्राणी प्राणरंध्र । परिमळ घेउनी जाये तें घर ॥२॥
मग तो नेणें सुमनाचा सुवास । पृथ्वी तें अंशें जीवन मिळे ॥३॥
रसनेसी स्वाद ते जनवृंदा खाद्य । जीवनाचा जो स्वाद तोचि मिळे ॥४॥
असोनियां नेत्र न देख मंत्र । नयनाते दीस पवन मिळे ॥५॥
नाडीचा तो त्वरीत निघोनि जाय मारुत । सेवितां तो कोलीत या शुद्धि नाहीं ॥६॥
कंठाखालता काळ तो धुंडित । मेळवोनि समस्त एक करी ॥७॥
एका जनार्दनीं मेळा जो झाला । काळ घेउनी गेला लिंगदेहा ॥८॥
२३०६
आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं ॥१॥
महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं तें घर । ब्रह्माडीचें ॥२॥
तेथें नाहीं काळ । त्यासी नाहीं वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥
प्रभा आणि ज्योति । रत्न आणि दीप्ती । किरण आणि गभास्ती । एकरुप ॥४॥
तैसी वस्तु आणी ईश्वर । एक पैं प्रकार । पृथ्वी अंबर । दोन्हीं एक ॥५॥
तैशा शरीरा ज्योति । आदिमध्य अंतीं । वस्तु तें तत्त्वार्थीं । भरली असें ॥६॥
देह जावो अथवा राहो । आम्हीं वस्तुचि आहों । एक जनार्दनीं भावों । दृढ झालिया ॥७॥
२३०७
मृतिका आणि अग्नी । देहासी दहन । वस्तुतें व्यापुन । घेतलीं दोनीं ॥१॥
अग्नीमाजीं अग्निरुप । मृत्तिकामाजीं मृत्तिकारुप । जैसें आपीं आप । मिळोनि गेलें ॥२॥
वस्तु नाहीं एकदेशी । ते सर्वत्र समरसी । जयाचे प्रकाशीं । त्रैलोक्य वर्ते ॥३॥
तैसे मेले आणि जीत । हें अज्ञान भासत । तें वस्तुंतें नांदत । देहींमाजीं ॥४॥
एका जनार्दना । विचारुनीं ज्ञानी । संशयापासोनी । मुक्त झाले ॥५॥
२३०८
सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारें मुरत वस्तुमाजीं ॥१॥
पिंडीचें ते दोन्हीं ब्रह्माडींचे दोन्हीं । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥
प्रळय आत्यांतिक जेथें संहारत । विवेक आपणचि येत सर्वाठायीं ॥३॥
मग प्रचीत सहज बरवे वाईट वोज । निपजे तेथें दुजे भाव नाहीं ॥४॥
एका जनार्दनीं भला आपणचि ईश्वर झाला । तो भरुनी उरला साक्षत्वेंसी ॥५॥
२३०९
निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझें ॥१॥
पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझें ॥२॥
माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व । सत्वाचें निज सत्व स्वरुप माझें ॥३॥
सद आणी चिद म्हणती आनंद । त्याहुनी अभेद स्वरुप माझें ॥४॥
एका जनार्दनीं एकपणातीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझें ॥५॥
२३१०
नेत्रींची बाहुली वस्तुरुप झाली । पाहतां सोहं मेळीं चिदांनंद ॥१॥
अर्ध मात्रा स्थान नयनाचें निधान । मसुरेप्रमाण महावर्ण तेथें ॥२॥
सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगती । नयनींच निश्चितीं बिंदुरुप ॥३॥
सर्वगत डोळा ती जगामाझारीं । जगाचिया हारी डोळियामाजीं ॥४॥
दाखवी संपुर्ण स्वामी जनार्दन । एका एकपण नाहीं जेथें ॥५॥
२३११
छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥
तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥
तेचि ॐकार अर्धं मात्रा । तेंचि महाकारण जाणा परा । एका जनार्दनीं सारा । निवाडा केला ॥३॥
२३१२
सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय ॥१॥
जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥
अभ्यास पुर्वीच्या पुण्य लेश जन्माचा । तैं ब्रह्माज्ञानाचा लाभ होय ॥३॥
एक जनार्दनीं पुर्ण कृपा होतां । सहज सायुज्यता पाठीं लागें ॥४॥
२३१३
जगाचिये नेत्री दिसे तो संसारीं । परि तो अंतरीं स्फटिक शुद्ध ॥१॥
वायांचि हांव नधरी कांहीं पोटीं । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥
स्त्रिया पुत्र धन नाही तेथें मन । इष्टमित्र कारण नाहीं ज्याचें ॥३॥
एका जनार्दनीं प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तयालागीं ॥४॥
२३१४
अभेदाचे उत्तम गुण । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥१॥
अभेद भक्ति वाडेंकोडें । देवा आवडे तें गोड ॥२॥
अभेद भजनीं सुख देवा । एका जनार्दनीं विसरे जीवा ॥३॥
२३१५
अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर ॥१॥
निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥
सांडुनी आकाराचें ज्ञान । निराकारी सुखसंपन्न ॥३॥
सुखें सुखासी मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
२३१६
सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥
सोहमाचें ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥
ऐसें श्रोते जन विनंति करुन । एका जनार्दन नमस्कारिला ॥३॥
२३१७
देखों तितकें आहे ब्रह्मा । वायां सांडीं कीं भवभ्रम ॥१॥
पोटीं नाहीं परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥
अर्थ नाहीं जयापाशीं । अनर्थ स्पर्शेना तयासी ॥३॥
अर्थापाशी असत्य जाण । एका जनार्दनीं शरण ॥४॥
२३१८
ब्रह्मीं नाहीं भवभ्रांति । ब्रह्मीं नाहीं दिवसराती ॥१॥
ब्रह्मीं नाहीं रूपवर्ण । ब्रह्मीं नाहीं काळकरण ॥२॥
ब्रह्मीं नाहीं ध्येयध्यान । ब्राह्मी नाहीं देवदेवता ॥४॥
ब्रह्मी नाहीं वर्णाश्रव । ब्रह्मीं नाहीं क्रियाकर्म ॥५॥
सर्व देहीं ब्रह्मा आहे । एका जनार्दनीं तें पाहे ॥६॥
२३१९
ब्रह्मा निर्गुण निर्विकार । ब्रह्मा सगुण साकार । ब्रह्मारुप चराचर । सच्चिदघन शुद्ध हें ॥१॥
ब्रह्मा अचिंत्य अव्यक्त । ब्रह्मा अच्छेद्य सदोदित । ब्रह्मा परात्पर पुर्ण भरित । समरस जाणिजे ॥२॥
एका जनार्दनीं ब्रह्मा । प्राप्तीलागीं हेंचि वर्म । सदगुरुचें पादपद्म । दृढ भावें धरावें ॥३॥
२३२०
निरालंब सहज माय पहातां कैसें । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे ।
लक्ष वो अलक्ष पाहतां देहीं देह न दिसे । निर्गुण गुणसी आलें अवघें ब्रह्माचि दिसें ॥१॥
ऐसा हा व्यापकु हरि आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या देहीं ॥धृ०॥
पिंड ब्रह्मांड व्यापुनी अतीत कैसा । आदि अंत ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैशा ।
नेति नेति शब्द बोलती हरि अगाध ऐसा । म्हणवोनि गुरुमुखें दृढ विश्वास धरीं ऐसा ॥२॥
प्रसिद्ध आत्मा देखोनि विरालें मन । मनचि उन्मन जालें तेथें कैचें ज्ञान ।
ज्ञान ध्यान हेंहि न कळें अवघा जनार्दन । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनें जाण ॥३॥