अद्वैत - अभंग २४४१ ते २४६०
२४४१
देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो ॥१॥
आम्ही जिताची मेलों जिताची मेलों । मरोनियां जालों जीवेविण ॥२॥
मृगजळाचें जळ भरलें असतां नाहीं । आटलिया तेथें कोरडें होईल काई ॥३॥
एका जनार्दनीं जगाचि जनार्दन । जिणें मरणें तेथें सहज चैतन्यघन ॥४॥
२४४२
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला ॥१॥
तें पूर्वीच पाणी आहे । तेथें पारधी साधील काय ॥२॥
जंव पारधी घाली जाळें । तंव त्याचेंच तोंड काळें ॥३॥
एका जनार्दनीं सर्वही पाणी । माशियाची कैंची खाणी ॥४॥
२४४३
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥
मीच माझी करीं पुजा । मीच माझा देवो सहजा ॥२॥
हेंचि उपासनाकांडाचें सार । आगमनिगमांचे गुह्मा भांडार ॥३॥
एका जनार्दनीं देव । स्वयें पाहे देवाधिदेव ॥४॥
२४४४
लागलें दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आलें अंगा ॥१॥
देव देऊळ अवघाचि देव । देखोनियां भाव लागतसे ॥२॥
जाणतां नेणतां उरी नुरे मना । यालागीं शरण एका जनार्दना ॥३॥
२४४५
सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली स्वयें ॥१॥
आतां चाखावें तें काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥
तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा ॥३॥
एका जनार्दनीं गोड । तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥
२४४६
जो जो कोणी मनीं ध्याये । तो मीचि होऊनियां राहे ॥१॥
ऐसा अनुभव बहुतां । अर्जुनादि सर्वथा उद्धवा ॥२॥
एक एक सांगतां गोष्टी । कल्प कोटी न सरेचि ॥३॥
शरण येतां जीवेभावें । एका जानार्दनीं भावें हरीसी ॥४॥
२४४७
साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग ॥१॥
नानामतें तर्क करितां विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥
देहीं असोनि देव वायां कां शिणती । एका जनार्दनीं फजिती होती तया ॥३॥
२४४८
आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥
वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥
सदोदित पाहे सर्वाठायीं आहे । एकाजनार्दनीं सोय धरी त्याची ॥३॥
२४४९
देहीं वाढें जों जों शांती । तों तों विरक्ति बाणें अंगीं ॥१॥
ऐसा आहे अनुभव । देहीं देव प्रकाशे ॥२॥
देहीं आत्मा परिपुर्ण । भरला संपुर्न चौदेहीं ॥३॥
एका जनार्दनीं रिता ठाव । नाहीं वाव पाहतां जगीं ॥४॥
२४५०
बहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह । नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं ॥१॥
न करावें तें केलें मनामागें धांवणें । परि नारायणें करुणा केली ॥२॥
आवरुनि इंद्रियें धरियेलीं हातीं । कामक्रोधाची शांती केली सर्व ॥३॥
वायां जाये परि श्रीगुरु भेटला । एका जनार्दनीं जाहला कृतकत्य ॥४॥
२४५१
विदेहदेह विस्मृति पावले । देहादेहीं फिटलें द्वैताद्वैत ॥१॥
ऐसें जनार्दनें उघड दाविलें । देहींच आटलें देहपण ॥२॥
एका जनार्दनीं चौदेहा वेगळा । दाविलासे डोळा उघड मज ॥३॥
२४५२
निमालें राहिलें गेले ऐसे म्हणती । वायां फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥
नासलें कलेवर घेऊनियां मांडीं । वाउगे तें तोंडी बोलताती ॥२॥
स्वयें आत्मज्योति जया नाहीं आदिअंत । तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥
एका जनार्दनीं उफराटी बोली । कैसी भ्रांती पडली त्यांचे मनीं ॥४॥
२४५३
व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥
वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥
भेदभावाची वासना । रामनामें निरसे जाणा ॥३॥
एकपणें जनीं वनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
२४५४
रामनाम स्मरे पुरुषोत्तम रे । सहज विद्या ज्ञेय हाही अविद्या धर्म रे ॥१॥
अहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया भ्रम रे । विजनवन निरंजन जनार्दन रे ॥२॥
अगम्य गति ध्येय ध्यान साधन बंधन रे । एका जनार्दनीं एका स्वानंद परिपुर्ण रे ॥३॥
२४५५
दर्पणामाजीं आपण । जीवरुपें शिव जाण ॥१॥
जेणे स्वरूपें आपण । तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥
अग्नि राखें झाकोळिला । तरी अग्नीपणें संचला ॥३॥
जीवशिव दोन्हीं हो का एक । तरी मलीन एक चोख ॥४॥
थिल्लरीं प्रतिबिंब भासे । बिंबाअंगीम काय संचिता वसे ॥५॥
निर्वाळूनि पहातां वेगीं । बिंब प्रतिबिंब वाउगी ॥६॥
ऐसें भुलूं नये मन । शरण एका जनार्दन ॥७॥
२४५६
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥
तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥
देहींचे देवळीं आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥
एका जनार्दनें भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥
२४५७
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥
ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥
सर्वरुप देखे समचि सारिखें । द्वैत अद्वैत पारखें टाकूनियां ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्माज्ञान बोली । सहजचि आली मज अंगीं ॥४॥
२४५८
देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥
शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥
आंत बाहेरी अवघेचि सूत । स्वरूप देखतां निवताहे चित्त ॥३॥
नीच नवा शोभतु साउला । एका जनार्दनीं मिरवला ॥४॥
२४५९
मस्तकीं केश चिकटलें होती । जैं ते निघती आपुले हातीं ॥१॥
मिळती जैशा माय बहिणी । हातीं घेउनी तेलफणी ॥२॥
ऐसा त्रिगुणाचा ठावो । एका जनार्दनीं पहा वो ॥३॥
२४६०
एकचि माहेर नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली ॥१॥
विठ्ठल विठ्ठल रोकडा । विठ्ठल पाहे चहुंकडा ॥२॥
आपण आंत बाहेरी पाहे । विठ्ठल देखोनि उगाची राहे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥