अद्वैत - अभंग २५२१ ते २५४०
२५२१
एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥
बंधु बहिणींस लग्न तें लाविलें । विपरीत झालें सांगवेना ॥३॥
एका जनार्दनीं सांगतसे गूढ । नाहीं तरी गुढ होउनी राहे ॥४॥
२५२२
विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥
नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरें व्याला सांगुं काय ॥२॥
एक ब्रह्माचारीं कळिलावा मोठा । साठ पोरें व्याला पहा चोहटा ॥३॥
एक मेलें गर्भीं असतां गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥
एका जनार्दनीं उघडली दृष्टी । अर्थ पाहतां सुख होय पोटीं ॥५॥
२५२३
विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥
लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाता ॥२॥
ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडीं ॥३॥
एका जनार्दनीं लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥
२५२४
बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥
नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥
प्रौढ जाली आमुची आईं । बापाची नांवें त्या ठेविलीं पाहीं ॥३॥
लेकीनें बापासी केलें सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ॥४॥
२५२५
अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥
पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥
अमोल्यांचें कुळ न सांगवें तोंडें । सोय धरी तरी सखीं भांवडें ॥३॥
पाठीम पोटीं बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥
२५२६
बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥
बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥
तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घात कुळगोत्र ॥३॥
कांहीं एक वेद बोलूं गेला बोली । चवंढाई चिरुनी तीन कोंडें गेलीं ॥४॥
श्लाघोनी भक्ती बोलूं गेलीं तोडें । बोल बोल तंव नवखंडे ॥५॥
लडिवाळ भक्त बोलोनी हांसे । बोल बोलें तंव लावियेलें पिसें ॥६॥
बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोले तंव दवडिलें राना ॥७॥
एका जनार्दनीं मौनचीं घोटी । एकपणें तेंही घातलें पोटीं ॥८॥
२५२७
बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी ॥१॥
बाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥
मी बापापोटीं कीं बापु माझ्या पोटीं । वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥
एका जनार्दनीं जातक मौनी । जन्मनाम ठेविलें निःशब्द देउनी ॥४॥
२५२८
एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥
सबाह्म अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥
यापरि रिगाले अभिन्न अंगीं । दोघे सामावाले अंगीच्या अंगीं ॥३॥
ऐसें लेकीनें बापासी बांधलें कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥
२५२९
माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥
कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥
बापा आधीं लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥
वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनीं जाहली नवलपरी ॥४॥
२५३०
स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुनें भातें । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करुं नेदी हातीं । उसंत नाहें अहोरातीं ॥३॥
श्रद्धें विण अचाट सांगें । ढळॊं नेदी पुढें मांगें ॥४॥
न गणीं दिवस मास वरुषी । भागों जातां वहीच पुसी ॥५॥
चाव चावी करुं नेदी । सगळें गिळवी त्रिशुद्धी ॥६॥
जो कां ग्लानी साधन मागें । तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥
जो सेवा करी नेटका । त्यासी करुनी सांडी सुडका ॥८॥
झोंप लागों नेदी कांहीं । निजे निज निजवी पाही ॥९॥
एका जनार्दनीं निज सेवा । जीवें ऊरूं नेदी जीवा ॥१०॥
२५३१
गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें पेहें पाजीन संख्या सोयर्यासी ॥१॥
घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥
दृश्य न दिसे तें कांळीं अवघें लावी होटीं । सद्युक्तीचें शिंपीवरी गिळी तैसें पोटीं ॥३॥
अंतर तृप्त जालें सबाह्म कोंदलें । निज गोडिये गोडपणें तन्मय जालें ॥४॥
सदगुरु माउली पेहे पाजी अंगीं भरला योग । तेणें देह बुद्धी समुळ केला त्याग ॥५॥
पंचभुतांचे अंगुलें सुवर्ण हारपलें । माझें माझें म्हणत होतें त्या गुणा विसरलें ॥६॥
आतींची हारली भूक जालें सुख । निजनंदी पालखी पहुडलें स्वात्ममुख ॥७॥
पेहे पाजायाचे मिसें देतसे पुष्टी तुष्टी । एका सामावाला जनार्दना पोटीं ॥८॥
२५३२
नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं ॥१॥
ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरुप काढी मनाची का व्यथा ॥२॥
डोळ्यांची बाहुली पाहतां झडपली । तिसी रक्षा भली केविं करूं ॥३॥
निढळींची अक्षरें चुकलीं कानामात्रें । शुद्ध त्याहावें कैसें लिहिणारें ॥४॥
जीवीचिया डोळा पडळ आलें । अंजन सुदन केविं जाय ॥५॥
एका जनार्दनीं जाणे हातवटी । पुण्य घेउनी कोणी करा भेटी ॥६॥
२५३३
धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं ॥१॥
ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों कां निरुता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥
अग्नि हिवेला तापावें कोठें । पवना प्राणु नाहीं कवण लावी वाटे ॥३॥
गगन हारपलें पाहावेआं कवणे ठायीं । मन मुळीं लागलें शांतीक तें पाहीं ॥४॥
स्वादें जेवणार गिळिला पैं जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥
एका जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६॥
२५३४
हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥
तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥
तेथें वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी । एका जनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ॥३॥
२५३५
आतां आम्हीं सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वयें ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥
आम्हीं सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥
ते उन्मनीं परात्पर । निर्गुण हो निराकार । तुर्या तिचा आकार । एका जनार्दनीं सगुणाकार देह झाला ॥३॥
२५३६
उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥
हातीं देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहें लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें तें ॥२॥
एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध । अनुभवोनि हा बोध । संतचरण धरावे ॥३॥
२५३७
नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥
अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदुची तत्त्वतां सर्वगत ॥३॥
कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥
भिन्नभिन्न नाहीं अवघेंचि स्वरुप । पाहतां निजरुप रुप होय ॥५॥
तेथें कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनीं साचारू सर्वा घटीं ॥६॥
२५३८
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दीड घटिका पळें दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळाआ घटिका दहा पळें लेखा । निमिषें तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपुर गणती निमिष चार ॥४॥
आणिक घटी पळें तितुकींची पाही । अनुहत ठायीं निमिष पांच ॥५॥
पावणेतीन घटिका दहा पळें जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणेतीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमिष चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
साहाशें ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥
२५३९
आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥
दिवसांचें पाहणें । पाहतां दिसे लाजिरवाणें । खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥
बारा सोळा घागरीं । पाणी नाहीं थेंबवरी । नाहायासी बैसली नारी । मुक्त केशें ॥३॥
घरधनी उभा ठेला । तेणें रांजण उचलिला । जाउनी समुद्रीं बुडाला । नवल ऐका ॥४॥
नाहतां नारी उठली । परपुरुष भेटली । आनंदानें बैसली । निजस्थानी ॥५॥
काळें निळें नेसली । जाउनी दारवंटीं बैसली एका जनार्दनीं देखिला । नवल ऐका ॥६॥
२५४०
जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥
कैसें बोटानें दाखवुं तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥
कांहीं नसोनि तें दिसत । नाहीं म्हणतां सत्य भासत । आकारीं आकार लपत । वाउगें जाणत्यासी भासत ॥३॥
अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला । जगीं व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरुपुत्र भला ॥४॥