Get it on Google Play
Download on the App Store

भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४०

२२२१

एकाचिया चाडें । उगवी बहुतांचीं कोडें ॥१॥

म्हणोनि उभा विटेवरी । पाउले समचि साजिरीं ॥२॥

एकासाठीं गर्भवास । एकाद्वारीं रहिवास ॥३॥

एका घरीं उच्छिष्ट काढी । एकाची रणीं धुत घोडीं ॥४॥

एका द्वारीं भिकारी होय । एका घरीं भाजी खाय ॥५॥

एका एकपणें हरी । एका जनार्दनीं दास्य करी ॥६॥

२२२२

ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥

तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥

शस्त्र न धरें ऐसा बोलु । साचा केला संग्रामीं ॥३॥

विकल पडतांचि अर्जुन । धरिलें सुदर्शन हस्तकी ॥४॥

ऐसा कृपेचा कळवळा । एका जनार्दनीं पाळी लळा ॥५॥

२२२३

भक्तचरणींचे रजः कण । हृदयीं वाहे नारायण ॥१॥

भक्ता पडतां संकट । देव अंगें सोशी कष्ट ॥२॥

गांजितां प्रल्हादा नेहटीं । स्वयें प्रगटला कोरडें काष्ठीं ॥३॥

द्रौपदी गांजितां तात्काळीं । कौरवांचीं तोंडें केलीं काळीं ॥४॥

गोकुळीं गांजितां सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥५॥

अर्जुनांतें संकटप्राप्ती । दिवसां लपवी गभस्ती ॥६॥

अंबऋषीचें गर्भवास । स्वयें सोशी हृषीकेश ॥७॥

एका जनार्दनीं दास । होय भक्तांचा सावकाश ॥८॥

२२२४

कासया साधन तपाचिया हावा । पाचरितां धावो येतो लवलाही ॥१॥

ऐसा अंकिला धांवे वचनासाठीं । पहा जगजेठी भक्तकाजा ॥२॥

संकटीं पडला गजा नक्रमिठी । धांवे उठाउठीं ब्रीदासाठीं ॥३॥

अळीकर धांकुटा ध्रुव बैसे वनीं । तयासी तत्क्षणीं अढळ केलें ॥४॥

पडतां संकट द्रौपदी करीं धांवा । धांवे लवलाह्मा सारुनी ताट ॥५॥

एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । धांवे सत्वारीं आपुल्या लाजा ॥६॥

२२२५

अवरोध विरोध करितां हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणें तया ॥१॥

ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणें वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥

विष पाजुं आली पुतना राक्षसी । अक्षयपदासी दिलें तिसी ॥३॥

अगबग केशी असुर वधिले । सायुज्यता दिलें पद त्यासी ॥४॥

एका जनार्दनीं भक्तांचा कैवारी । ब्रीद हें साचारीं मिरवितसें ॥५॥

२२२६

ज्ञानराजासाठीं स्वयें भिंत वोढी । विसरुनी प्रौढीं थोरपण ॥१॥

तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरूनी करीं तिष्ठतसे ॥२॥

नामदेवासाठीं जेवी दहींभात । न पाहे उचित आन दुजें ॥३॥

गोरियाचें घरी स्वयें मडकीं घडी । चोखियाची वोढी गुरेंढोरे ॥४॥

सावत्या माळ्यांसी खुरपुं लागे अंगें । कबीराचे मागें शेलें विणी ॥५॥

रोहिदासासवें चर्म रंगुं लागे । सजन कसायाचे अंगें मांस विकी ॥६॥

नरहरी सोनारा घडुं फुंकुं लागे । दामाजीचा वेगें पाडीवार ॥७॥

जनाबाईसाठीं वेंचितसें शेणी । एका जनार्दनीं धन्य महिमा ॥८॥

२२२७

भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥

ज्ञानोबाची भिंत वोढी । उच्छिष्टपात्रें काढी धर्माघरीं ॥२॥

जेवी नामदेवासंगे साचें । सुदाम्याचें पोहे भक्षी ॥३॥

विष पितो मिराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्या स्वयें ॥४॥

एकजनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥५॥

२२२८

दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥१॥

पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धांवे नारायन लावलाहें ॥२॥

सुदामियाचें दरिद्र निवटिले । द्वारकेतुल्य दिलें ग्राम त्यासी ॥३॥

अंबऋषीसाठीं गर्भवास सोसी । परिक्षितीसी रक्षी गर्भामाजीं ॥४॥

अर्जुनाचें रथीं होउनी सारथी । उच्छिष्ट भक्षिती गोवळ्यांचें ॥५॥

राखितां गोधनें मेघ वरुषला । गोवर्धन उचलिला निजबळें ॥६॥

मारुनी कंसासुर सोडिले पितर । रक्षिलें निर्धारें भक्तजन ॥७॥

एकाजनार्दनीं आपुलें म्हणवितां । धांव हरि सर्वथा तयालागीं ॥८॥

२२२९

भक्तासी संकट पडतां । धांवे देव तत्त्वतां लवलाहे ॥१॥

ऐसा अनुभव आहे । देव लवलाहे धांवत ॥२॥

द्रौपदी पडता संकटीं । धांवे उठाउठी देव तेव्हां ॥३॥

पडतां संकट प्रल्हादासी । कोरडे काष्ठेंसी देव जाहला ॥४॥

पडतां संकट गजेंद्रासी । हाकेसरसी उडी घाली ॥५॥

एकाजनार्दनीं निर्धार । स्मरतां साचार धांवत ॥६॥

२२३०

मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार ॥१॥

प्रेमें नाना छंदें नाचे । उणें पडो नेदी साचे ॥२॥

अंगें धांव घाली । ऐशी कृपेची माउली ॥३॥

एका जनार्दनीं साचा । देव अंकित भक्तांचा ॥४॥

२२३१

मानी भक्ताचे उपकार । म्हणोनि धरी अवतार ॥१॥

उच्छिष्ट काढी धर्माघरीं । नीच काम करी गौळ्यांचें ॥२॥

अर्जुनाचें रथीं बैसे । सारथ्या सरसे करीतसें ॥३॥

एका जनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥४॥

२२३२

भाविकांची आवड मोठी । धांवे पाठीं रानोरान ॥१॥

कण्या खाये विदुराच्या । उच्छिष्ट गोवळ्यांचें परमप्रिय ॥२॥

उच्छिष्ट फळें भिल्लिणीचीं । खायें रुचे आदरें ॥३॥

पोहे खाये सुदाम्याचे । कोरडे फके मारी साचे ॥४॥

ऐशी भक्ताची आवडी देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥५॥

२२३३

उत्तम अन्न देखतां दिठी । ठेवी पोटीं जतन तें ॥१॥

तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता बाळातें ॥२॥

न कळे तया उत्तम कडु । परी परवडु माता दावी ॥३॥

एका जनार्दनीं तैसा देव । घेत धांव भक्ताघरीं ॥४॥

२२३४

वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां ॥१॥

तैसा भक्तांघरी नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥

मुंगुयांच्या घरां मुळ । धांडी समुळ कोण तो ॥३॥

एका जनार्दनीं देव । घेत धांव आपणचि ॥४॥

२२३५

यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥

आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥

एका जनार्दनीं पहा अनुभव । धांवतसे देव लवलाहे ॥३॥

२२३६

चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥

धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥

पक्कान्न सेवुं नेणती बाळें । माता मुखीं घालीं बळें ॥३॥

एका जनार्दनीं बोले । एकपण माझें नेलें ॥४॥

२२३७

बाळाचें छंद जाण । माता पुरविती आपण ॥१॥

बोबडे बोलतां ते बोल । माते आनंद सखोल ॥२॥

मागे जें तें आपण । आळ पुरवी त्यासी देऊन ॥३॥

एकाजनार्दनीं ममत्व तें । नोहे लौकिकापुरतें ॥४॥

२२३८

भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगीं धरिला ॥१॥

रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ॥२॥

भक्त अर्पितां आवडीं । देव जाणें त्याची गोडी ॥३॥

भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनीं राहें देहीं ॥४॥

२२३९

देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं ॥१॥

भक्त देहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥

जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥

एका जनार्दनीं अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥

२२४०

जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥

होय तयांचा अंकित । नेणें लहान थोर मात । आपुलें आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥

एका जनार्दनीं कनवाळ । पतितपावन म्हणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलांगीं स्वयें रक्षी ॥३॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

Shivam
Chapters
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते १९२० आत्मस्थिति - अभंग १९२१ ते १९४० आत्मस्थिति - अभंग १९४१ ते १९६० आत्मस्थिति - अभंग १९६१ ते १९८० आत्मस्थिति - अभंग १९८१ ते २००० आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२० आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४० आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६० आत्मस्थिति - अभंग २०६१ ते २०८० आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२० आत्मस्थिति - अभंग २१२१ ते २१३२ विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५० विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१५१ ते २१९९ भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२० भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४० भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४ श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अद्वैत - अभंग २२७६ ते २३०० अद्वैत - अभंग २३०१ ते २३२० अद्वैत - अभंग २३२१ ते २३४० अद्वैत - अभंग २३४१ ते २३६० अद्वैत - अभंग २३६१ ते २३८० अद्वैत - अभंग २३८१ ते २४०० अद्वैत - अभंग २४०१ ते २४२० अद्वैत - अभंग २४२१ ते २४४० अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० अद्वैत - अभंग २४६१ ते २४८० अद्वैत - अभंग २४८१ ते २५०० अद्वैत - अभंग २५०१ ते २५२० अद्वैत - अभंग २५२१ ते २५४० अद्वैत - अभंग २५४१ ते २५६६ स्थूल देह - अभंग २५६७ सुक्ष्म देह - अभंग २५६८ कारण देह - अभंग २५६९ महाकारण देह - अभंग २५७० नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२ सार - अभंग २५७३