मानवजातीचें बाल्य 10
- ६ -
जागांतील प्रत्येक युध्दप्रिय राष्ट्र अशाच प्रकारें नष्ट झालें आहे असें आपणांस पुढें दिसेल. विजयाचा उन्माद, दुसर्यांस जिंकून घेण्याची अभिलाषा, शेवटीं जिंकणार्यालाच धुळीस मिळविते असें इतिहास सांगत आहे. मेसापोटेमियांतील तैग्रीस-युफ्रातीस नद्यांच्या दुआबांतील संस्कृतीहि इजिप्तमधील संस्कृतीप्रमाणेंच बरीचशी होती. पंडितात पुष्कळ वर्षे वाद चालला आहे, कीं संस्कृति आधीं इजिप्तमध्यें फुलून ती मेसापोटेमियांत गेली, कीं आधीं मेसापोटेमियांत फुलून ती इजिप्तमध्यें गेली. प्रथम सुमेरियन व इजिप्शियन लोकांनीं आपणांस शिल्पशास्त्र व लेखनकला यांचीं मूळाक्षरें शिकविलीं. इजिप्शियन लोक पेपरस नांवाच्या लहानशा रोपट्यांच्या पोकळ नळ्यांवर आपलीं तीं चित्रचिन्हें रंगवीत, तर तैग्रीस-युफ्रातीस नद्यांच्या खोर्यांतील सुमेरियन लोक आपली ती शरलिपि मातीच्या विटांवर लिहीत. सुमेरियन लोकांनीहि तो सुप्रसिध्द बेबेल मनोरा बांधला. नाना ठिकाणाहून आलेले व नाना भाषा बोलणारे लोक हा मनोरा बांधण्याच्या कामाला लावण्यांत आले होते. नाना जातीजमाती अशा प्रकारें येथें एकत्र आल्या. एकमेकांत प्रेमानें मिसळल्या. आणि यामुळें सुमेरियन लोकांनीं उभारलेली व वाढविलेली संस्कृति जवळजवळ चार हजारांहूनहि अधिक वर्षे टिकली. या संस्कृतीशीं तुलना करतां आजची ही आपली संस्कृति म्हणजे नुकतें वाढूं लागलेलें एक लहानसें रोपटें आहे असें वाटतें. खाल्डिया (म्हणजेच सुमेरिया) मधील उर शहर सोडून अब्राहाम जेव्हा स्वत:च्या नशिबाच्या परीक्षेसाठीं कन्नावच्या वाळवंटांत शिरला, त्या वेळेस त्यानें पाठीमागें ठेवलेल्या उर शहराची परंपरा पॅरिस किंवा लंडन, बर्लिन किंवा माद्रिद या शहरांच्या परंपरेपेक्षां अधिक प्राचीन व अधिक गौरवास्पद अशी होती. परंतु सुमेरियनांची अशी ती बहरलेली संस्कृति अखेरीस कोठें गेली ? त्यांचीं तीं भव्य पुरें-पट्टणें, ते विद्वान् लोक, ते सारें कोठें गेले ? युध्दांच्या रणधुमाळींत ही संस्कृति शेवटीं काळाच्या पोटांत गडप झाली. आणि सुमेरियन लोकांचें नांव आज मूठभर पंडितांपलीकडे कोणाला फारसें माहीतहि नाहीं.
सुमेरियन लोकांवर शेवटचा प्राणान्तिक घाव आक्केडियन लोकांच्या राजानें घातला. या राजाचें नांव सारगान. सारगान त्याच्या काळांतील जणुं जगज्जेता ज्युलियस सीझर होता. आक्केडियन हें लढवय्या लोकांचें राष्ट्र होतें. ते इतके लढवय्ये होते, कीं दोनशें वर्षांतच त्यांचें नांव नष्ट झालें. सुमेरियन लोकांप्रमाणेंच या आक्केडियन लोकांचें फक्त नांव राहिलें आहे.
आक्केडियनाच्या पाठोपाठ अॅमोराइट लोक आले. हम्यूरवि हा त्यांचा सुप्रसिध्द राजा. इतिहासाला ज्ञात असलेलें पहिलें कायदेकोड त्यानें दिलें. परंतु हें अॅमोराइट लोकहि तलवारीवर भिस्त ठेवणारे होते. ते आपल्या असिलतांनींच शेवटीं अस्तास गेले.