खर्या संस्कृतीचा प्रारंभ 66
हिटलरच्या नाझीझम राजकीयदृष्ट्या व सामाजिक विकासदृष्ट्या मुसोलिनीच्या फॅसिझमपेक्षां खालच्या पायरीचा होता. फॅसिस्ट लोक निदान समाजाची पुनर्रचना करण्याचा दुबळा प्रयत्न करतांना तरी दिसत. पण नाझींना तेवढेंहि श्रेय देतां येणार नाहीं. फॅसिस्ट निदान न्यायाचें सोंग तरी करीत असत; पण नाझींचें सारें तंत्र, त्यांची सारी उठावणी, उभारणी, चेतवणी व्देषावर उभारलेली असे. अलीकडचें जर्मन राष्ट्र अत्यंत दुर्दैवी होतें. मागील महायुध्दांत पराजय झाला, स्वाभिमान धुळीस मिळविला गेला, पूर्वीच्या वैभवाच्या तुलनेनें दारिद्र्य आलें, या सर्व गोष्टींमुळें ते चवताळलेले, पिसाळलेले होते. भवितव्यतेवर त्यांचा दांत होता, दैवावर त्यांना सूड उगवावयाचा होता; त्यांना सारखें वाटत असें कीं, कोणी ना कोणी तरी शत्रु आपला नाश करण्यासाठीं कोठेंना काठें टपून बसलेला असणारच. सदैवी अशी भीति असल्यामुळें ते प्रतिप्रहार करावयाला सदैव सज्ज असत. प्रतिप्रहार किंवा प्रहार. जर्मनांना वाटत असलेली ही भीति हेंच हिटलरचें भांडवल असल्यामुळें अतिशयोक्त प्रचारानें तो त्यांच्या मनांतील ही भीति वाढवीत राही, जर्मन जनतेच्या मनांत ज्वलंत व्देष पेटता राहील असें करी व व्देषाची आग पेटती राहावी म्हणून तो सारखा वारा घालीत बसे. ज्यू, क्लर्जी व सारीं परकीं राष्ट्रें तुमचे शत्रु आहेत असें तो जर्मन जनतेच्या कानींकपाळीं आरडून सांगत असे. सार्या जगाविरुध्द युध्द पुकारण्याइतकी तयारी नव्हती म्हणूनच आधीं त्यानें फक्त ज्यू व धर्मोपदेशक यांच्याविरुध्द युध्द पुकारलें. जर्मनीचें रत्तच्शोषण हेच लोक करीत आहेत असें त्यानें स्वत:ला व जर्मन जनतेला पटवून दिलें होतें. अंध व अविवेकीं संतापानें ज्यू व क्लर्जी या अल्पसंख्य लोकांवर तो सदैव आग पाखडीत असे, त्यांना सळो कीं पळो करून सोडीत असे. ज्यू व धर्मोपदेशक यांविरुध्द त्यानें चालविलेली ती प्रचंड मोहीम व चालविलेला तो तुफानी प्रचार पाहिला म्हणजे दु:ख होत असलें तरी थोडें हंसूंहि येतें. तो प्राचीन लॅटिन कवि 'पर्वताच्या प्रसूति वेदनांनंतर शेवटीं उंदीरच बाहेर पडला !' असें म्हणाला, तेंच हिटलर व त्याचे नाझी सरदार करीत होते. फुलपांखरांशीं लढण्यासाठीं ते आपल्या प्रचंड तोफा चालवीत होते. हिटलरच्या अप्रबुध्दतेला व दुष्टतेला अर्वाचीन इतिहासांत तुलनाच नाहीं ! असला नमुना पाहावयाचाच असेल तर मानवजातीच्या आरंभींच्या काळांतच गेलें पाहिजे. मुसोलिनी हा शेवटचा वाटतो आहे, तर हिटलर हा अतिप्राचीन असीरियन नमुना होय असें वाटतें.
- ५ -
इटलींतील व जर्मनींतील जुलुमी भुतावळ पाहिलीं; आतां अमेरिकेंतील लोकशाहीचा प्रयोग पाहूं या, म्हणजे मनावरचा ताण थोडा कमी होऊन मनाला थोडें बरें वाटेल. मानवजात अनियंत्रित राजशाहींतून हळूहळू लोकशाहीच्या शासनपध्दतीकडे जात आहे, हें आपण पाहत आलों. हा विकास हळुहळू होत आहे, हें खरें. व्यक्ति सत्ताधार्यांसाठीं आहे या रानटी तत्त्वांतून शासनसंस्था व्यक्तीसाठीं आहे या सुसंस्कृत तत्त्वापर्यंत मानवजात हळूहळू येऊन पोंचत आहे. व्यक्तीसाठीं शासनसंस्था आहे या तत्त्वाचा आजचा उत्कृष्ट पुरस्कर्ता म्हणजे रुझवेल्ट. तो व्यक्तीच्या जीवनाचें पावित्र ओळखतो. वॉल्ट व्हिटमनच्या दैवी प्रतिभेचा स्पुच्लिंग रुझवेल्टमध्येंहि आहे असें वाटतें. दोघेंहि अमेरिकन असले तरी उच्च आहेत. व्हिटमनप्रमाणें रुझवेल्टलाहि दु:खितांविषयीं सहानुभूति वाअते. कारण, तो स्वत: दु:खांतून जाऊनच शहाणपण शिकला आहे. त्याच्या आजारामुळें त्याचें शरीर दुबळें झालें, पण बुध्दि तीव्र झाली. आजारी पडण्यापूर्वी तो सामान्य राजकारणी होता. पण आजारांत कित्येक महिनें पाठीवर पडून राहावें लागल्यामुळें तो जीवनाकडे एका निराळया दृष्टिकोनानें पाहूं लागला. त्याच्यांतील राजकीयपणा जाऊन तो वरच्या दर्ज्याचा मुत्सद्दी झाला.