मानवजातीची जागृती 30
ईश्वरी इच्छा म्हणजेच निसर्गाचा कायदा. प्रकाश तार्यांतार्यांपर्यंत सारखा फिरत आहे; मनुष्याची जाणीव-शक्ति सारखी काम करीत आहे. कारण तीं सर्व ईश्वरी इच्छेचा कायदा मानतात. प्रकाश प्रकाशाचा अवश्यक कायदा मानतो. मनुष्याची जाणीव जीवनाचा कायदा मानते. आपली मानवी इच्छाशक्तीहि अवश्यक अशा नियमांचें पाल करते. जगांत फ्री वुइल किंवा इच्छा-स्वातंत्र्य अशी चीज नाहींच.
आपण परिस्थितीचीं बाळें आहों. परिस्थिती आपणांस बनविते. स्पायनोझा लिहितो, ''आपल्या मनांत केवळ सर्वतंत्रस्वतंत्र असें कांहींच नाहीं; आपणांस इच्छास्वातंत्र्य नाहीं. आपण जी कांहीं इच्छा मनांत करतों ती कोणत्या तरी कारणामुळें असते; त्या कारणाला दुसरें कारण असतें, त्या दुसर्या कारणाला तिसरें कारण असतें; अशा प्रकारें कार्यकारणपरम्परा अनंत असते.'' दुसर्या शब्दांत हेंच सांगावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, आपल्या तोंडावरचे भाव किंवा शरीराचे स्नायू यांच्याप्रमाणेंच आपलीं सारीं कर्मेहि नैसर्गिक शक्तींवरच अवलंबून असतात. या नैसर्गिक शक्ती आपली कल्पनाशक्ति भूतकाळांत मागें पाहूं शकेल तेथपासून सारख्या चालूच आहेत. अनंत काळापासूनच म्हणा ना ? निसर्गाच्या नियत नियमाप्रमाणें असें कायमचेंच ठरलेलें आहे कीं, दैवी संगीत लिहिण्याला बीथोव्हेन जन्मावा, लाखों लोकांना हिंसक मरणाकडे नेण्याला नेपोलियन निर्माण व्हावा. आकाशांतून खालीं पडणार्या पावसाला स्वातंत्र्य नाहीं अगर धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची दिशा बदलतां येत नाहीं, त्याचप्रमाणें आपलीं कर्मेहि नियतच आहेत. आपली इच्छा असो, नसो, तीं तशीं हातून घडावयाचींच. बाणाची गति व मानवाचें कर्म यांत फरक इतकाच कीं, मानवाला आपल्या कर्माची जाणीव असते, स्वकर्माचें भान असतें. आणि या केवळ जाणिवेलाच तो चुकून आपली इच्छाशक्ति मानतो.
आपण काय करतें तें आपणांस माहीत असतें; पण तें करणें भागच असतें; तद्विपरीत वागण्याचें सामर्थ्य वा स्वातंत्र्य आपणांस नसतें. आपण आपल्या नियतीशीं निबध्द आहों. आपल्या जीवनाच्या या छोट्या नाटकांत केवळ प्रेक्षक म्हणून राहण्यास आपणांस परवानगी आहे. पण त्यांत ढवळाढवळ करावयाला, तेथें लुडबुड करावयास आपली इच्छा सोडण्याला आपणांस परवानगी नाहीं. आपल्या कर्माकडे पाहण्याची आपणांस पूर्ण मुभा आहे; पण आपलीं कर्मे आपणच ठरवितों असें जें आपणांस वाटतें तें मात्र चूक आहे. आपण जे कांहीं निर्णय घेतों ते केवळ आपल्याच भूतकाळाचे, गत जन्मींचे परिणाम नसून आपल्या सर्व पूर्वजांच्या मागील जन्मांचा तो परिणाम असतो.
म्हणून स्पायनोझा शेक्सपिअरच्या अपूर्व बुध्दिमत्तेबद्दल त्याची स्तुति करीत नाहीं किंवा खुनी माणसानें केलेल्या गुन्ह्यासाठीं त्याच्यावर रागावत नाहीं. तो लिहितो, ''आपणाकडून दुसर्यांचा उपहास होऊं नये, तसेंच स्वत:ला कधींहि दु:ख होऊं नये, आपणाकडून कोणीहि तिरस्कारिला जाऊं नये म्हणून मी फार जपतों. मानवी-मनुष्यांच्या हांतून होणारीं नानाविध कर्मे समजून घेण्याचा प्रयत्न मीं काळजीपूर्वक केला आहे.'' तो गुन्हेगाराला शासन करील, पण सूडबुध्दीनें मात्र नव्हे. तर त्याच्यापासून समाजाचें रक्षण व्हावें म्हणून. थंडगार वार्यामुळें पडसें आलें म्हणून काय आपण वार्यावर रागावतों ? त्या वार्याविषयीं आपली जी उदासीन, अनासक्त भावना असते, तीच स्पायनोझा आपल्या निंदकांविषयीं व अपायकर्त्यांविषयीं ठेवी. त्याची एक प्रकारची शास्त्रीय अनासक्ति असे. कार्यकारणभावाच्या अनंत सांखळींतील प्रत्येक वस्तु अपरिहार्य असा दुवा आहे हें त्यानें जाणलें होतें. तो प्रत्येक नैसर्गिक कर्म वा मानवी कर्म शाश्वततेचा प्रकाशांत पाहातो व अविचल राहतो.
- ३ -
अशा प्रकारें शाश्वततेच्या आरशांत पाहिल्यावर स्पायनोझा आपणांस जसें पाहतो त्याप्रमाणें आपण आपणांस पाहण्याची खटपट करूं या. प्रत्येक सजीव वस्तु ईश्वराचाच अंश आहे. काळाच्या पृष्ठावर साकार रूपानें, मूर्त रूपानें, प्रकट झालेला ईश्वराच्या अमर महाकाव्यांतील विचार म्हणजे प्रत्येक जीव. पृष्ठ नष्ट झालें कीं काव्याचें मूर्त स्वरूप नष्ट होतें, अदृश्य होतें. पण तो विचार अदृश्य झाला तरी झाला तरी मरत नाहीं. होमरची कविता असलेलें पुस्तक फाटलें म्हणजे होमरची कविता नष्ट झालीं असें होत नाहीं, त्या कवितेचें केवळ तें मुद्रण नष्ट होतें. होमरचे विचार अनेक पुष्ठांवर छापलेले आहेत. तीं पृष्ठें नष्ट करतां आलीं तरी ते विचार नष्ट करतां येणार नाहींत. शरीर मरतें, पण आत्मा राहतोच. रूपक बदलून असें म्हणतां येईल कीं, प्रत्येक जीवन म्हणजे जीवनाच्या कॅलेडोस्कोपमधील रंगीत कांचेचा एक तुकडा आहे. पुन: रूपक बदलून असेंहि म्हणतां येईल कीं, ईश्वराचा आत्मा, तो परमात्मा किंवा ईश्वरी योजना म्हणजे एक सूर्य आहे व मानवी शरीर म्हणजे पंकिल पल्वल आहे. तें तळें आटलें-म्हणजेच हें शरीर मेलें-कीं सूर्याचें प्रतिबिंब नाहींसें होतें, पण सूर्य पहिल्याप्रमाणेंच तेजानें तळपत असतो.