मध्ययुगांतील रानटीपणा 27
शेतकर्यांचें बंड प्रथम फ्रान्समध्यें पेटलें. पुढें चारशें वर्षांनी झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची हें बंड ही एक आगाऊ सूचनाच होती म्हणाना ! फ्रान्समधील बंडाच्या ज्वाला इंग्लंडांत आल्या. केंट परगण्यांतील जनतेला जॉन बॉल यानें समतेचें तत्त्व उपदेशिलें. फ्रॉइसार्ट, जॉन बॉल याचें हें धाडस पाहून चकित होतो. जॉन बॉल याची त्याला जणूं गंमत वाटते. तो त्याला 'केंटमधील वेडा धर्मोपदेशक' असें संबोधितो. त्याच्या प्रवचनाला बहुजनसमाजांतील पुढील सूत्राचा आधार असे :-
''जेव्हां अॅडम काम करी आणि ईव्ह कांती,
तेव्हां प्रतिष्ठित वा सभ्य गृहस्थ होता का कोणी ?''
'कांही लोक ईश्वराच्या कृपेनेंच दुसर्यांवर सत्ता गाजविण्यासाठीं जन्माला येतात' असल्या चावट मतांची तो हुररेवडी उडवी व शेतकर्यांस सांगे कीं, हा सारा फालतू पसारा आहे, अन्यायी व जुलुमी लोकांचा हा पापमूलक अनाचार आहे. तो म्हणे, ''बंधूंनो, जोंपर्यंत आपण सारी संपत्ति सारखी विभागून घेत नाहीं, सर्वांस सारखें अन्नवस्त्र वांटून देत नाहीं, मिळेल तें सर्व सारे मिळून जोंपर्यंत सारखें उपभोगीत नाहीं, तोंपर्यंत जगांत श्रीमंत-गरीब, मालक-मजूर असे भेद राहणारच. ज्यांना आपण लॉर्ड म्हणतों त्यांच्यांत आपणां सामान्य लोकांहून विशेष असें काय आहे ? त्यांना कां म्हणून मोठें मानावयाचें ? त्यांची कोणती श्रेष्ठता ? कोणती लायकी ? ते आपणांस दास्यांत कां ठेवतात ? ते स्वामी कां ? व आपण त्यांचीं हीन-दीन कुळें कां ? आपण सारेच अॅडम व ईव्ह यांपासून जन्मलों, तर 'आम्हीच श्रेष्ठ' असें हें कोणत्या तोंडानें म्हणतात ? यांचा मोठेपणा एकच आहे व तो म्हणजे ते तुम्हांआम्हांस राबावयाला लावतात. त्यांना चैन करावयासाठीं जें जें लागतें तें सारें आपण निर्माण करतों व ते बेटे गाद्यांवर बसून गर्वानें सारें भोगतात. ते गरम कपडे घालतात, मलमलीचे व लोकरीचे सुंदर कपडे वापरतात, पण आपल्या अंगावर मात्र चिंध्या ! त्यांना प्यावयास उंची मद्यें, खावयाला छानदार भाकरी, नाना भाज्या, नाना मसाले ! आणि आपणांस मात्र साधी भाकर ! आपण चंद्रमौळी झोंपड्यांत राहतों, पेंढ्यावर निजतों, साधें पाणी पितों, तर त्यांना राहण्यास सुंदर घरें व भरपूर आराम ! आपणांस पावसापाण्यांत व थंडीवार्यांत शेतांत राबावें लागतें, हाल व कष्ट आपल्या कपाळीं ! हे बडे लोक जी ऐट व जें वैभव दाखवितात त्यांचा जन्म तुमच्याआमच्या श्रमांतूनच होतो.''