मानवजातीची जागृती 44
एच्.जी.वेल्स लिहितो कीं, 'राजाचा कैवार घेणार्यांनीं क्रांतिकारकांच्या अत्याचारांचीं अतिशयोक्तिपूर्ण वर्णनें केलीं आहेत.' त्याच्या मतें आपण फ्रेंच क्रांतींत मारल्या गेलेल्यांचीं इतकीं वर्णनें ऐकतों याचें कारण ते जरा बडे व प्रतिष्ठत लोक होते. जास्तींत जास्त चार हजार लोक मारले गेले असतील आणि त्यांपैकीं बरेचसे क्रांतीच्या विरुध्द होते. फ्रेंच रिपब्लिकविरुध्द सुरू असलेल्या लढाईंत ते खुषीनें सामील झाल्यामुळें त्यांना लढाईचीं फळें भोगावीं लागलीं. एच्.जी. वेल्स म्हणतो, ''१९१६ मधील सोम आघाडीवरच्या लढाईच्या वेळीं ब्रिटिश सेनापतींनीं संबंध फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळांत जितके लोक मारले होते त्यांपेक्षां अधिक एका दिवसांत मारले !'' इतिहासाच्या अंगणांत गरिबांच्या विव्हळण्यापेक्षां श्रीमंतांच्या रडण्याचेच प्रतिध्वनी अधिक मोठे उमटत असतात.
पण एकानें अन्याय केला म्हणून कांहीं दुसर्यानें केलेला अन्याय क्षम्य ठरत नाहीं. फ्रेंच राज्यक्रांतींतील 'रेन ऑफ टेरर' एकंदरींत लज्जास्पदच होतें. येवढेंच नव्हे, तर त्यासाठीं किंमतहि जबर द्यावी लागली. क्रांतिकारकांना स्वत:चें स्वातंत्र्य गमावून बसावें लागलें. त्यांनीं रिपब्लिकच्या रक्षणासाठीं टाकलेल्या पावलांतून इतिहासांतील एक अत्यंत चढाऊ युध्द निर्माण झालें. त्यांतच फ्रेंच रिपब्लिक नष्ट होऊन त्यांतून नेपोलियनच्या साम्राज्यशाही तृष्णा जन्माला आल्या.
- २ -
नेपोलियनच्या लढायांचा आरंभ 'रेन ऑप टेरर' मधून झाला. नेपोलियन मूळचा इटलीमधला. १७६९ सालीं कॉर्सिका बेटावर त्याचा जन्म झाला. फ्रान्समधील लष्करी विद्यालयांत त्याचें शिक्षण झालें. मुसोलिनीप्रमाणें तोहि आरंभीं क्रांतिकारक व जहाल होता. तो गबाळ व केसाळ होता. त्याचे केस कधीं नीट विंचरलेले नसत. पॉवडर वगैरे कोठली तरी, कशी तरी पचंसलेली असावयाची ! त्याला घरीं नीट शिक्षण मिळालें नाहीं. तो पॅरिसच्या रस्त्यांतून अहंमन्यतेनें भटकत फिरे. क्रान्तीचे शत्रू नष्ट करून क्रान्ति वांचविण्याची जबाबदारी त्यानें स्वत:च्या शिरावर घेतली. आपणच हें काम करूं शकूं असें तो म्हणे.
त्या वेळीं त्याचे वय फक्त सत्तावीस वर्षांचें होतें. पण लढवय्या म्हणून त्यानें आपली योग्यता आधींच दाखविली होती. ती म्हणजे १७९५ सालीं राजाची बाजू घेणार्यांचें बंड मोडून त्यानें रिपब्लिकविषयीं आपली निष्ठा दाखविली होती तेव्हां होय. क्रान्तीच्या नेत्यांनीं नेपोलियनला सैन्य देऊन सांगितलें, ''ही सेना घे व सार्या जगाला जिंकून त्याची फ्रेंच रिपब्लिकच्या धर्तीवर पुनर्रचना कर. पण हातांत तलवार घेणारे आजपर्यंत कधींच जगाचे उध्दारक ठरले नाहींत, जगाला वांचवूं शकले नाहींत. नेपोलियन आणि त्याच्या फौजा यांनीं जगाचा धुव्वा उडविला ! आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी नेपोलियननें क्रान्तीचा साधन म्हणून उपयोग करून घेतला. त्यानें पहिली स्वारी इटॅलियनांविरुध्द केली. आपण त्यांचीं बंधनें तोडण्यासाठीं जात आहों असें त्यानें जाहीर केलें; पण इटलीवर तुटून पडणार्या आपल्या शिपायांना तो म्हणाला, ''आपण या देशावर दोन कोटी फ्रँफ्रँक खंडणी लादूं (म्हणजेच तितकी संपत्ति लुटून नेऊं). जगांतील अत्यंत समृध्द मैदानांत मी तुम्हाला नेत आहें; तुम्हांला तेथें गेल्यावर यश, संपत्ति मानसन्मान, सारें कांहीं मिळेल.'' तदनुसार नेपोलियनाला वरील सर्व मिळालें पण त्याच्या शिपायांना मात्र मरणच लाभलें !
इटलींतील विजायामुळें नेपोलियन पुच्गला. तो आपणास ज्युलियस सीझरच्या प्रमाणांत पाहूं लागला. पूर्वेकडील देशांत आपणहि आपलें वैभव दाखविलें पाहिजे, आपला दरारा तिकडील राष्ट्रांवरहि बसविला पाहिजे असें त्याला वाटलें. म्हणून त्यानें ईजिप्तमधील लोकांना आतां मुक्त केलें पाहिजे हें आपल्या देशबांधवांस पटवून दिलें व आपल्या आज्ञाधारक क्रान्तिकारक कोंकरांस ईजिप्तमध्यें नेऊन त्यांना तेथलें उंच पिरॅमिड्स् दाखविले.