मध्ययुगांतील रानटीपणा 5
चौथें कारण म्हणजे पोप दुसरा अर्बन याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा. आपलें जरा डळमळीत झालेलें आसन भक्कम करावें असें त्याच्या मनानें घेतलें. त्यासाठीं त्यानें आपल्याभोंवतीं गुंड व पुंड जमवून त्या बाजारबुणग्या लुटारूंना 'धर्मयुध्द' दिलें. तो त्यांना म्हणाला, ''तुम्ही तिकडे पूर्वेकडील ज्यू वगैरे विधर्मीयांना ठार कराल तर प्रभु तुम्हांस सर्व पापांपासून मुक्त करील.'' अशा रीतीनें पोप म्हणजे जणूं ईश्वराचा शापच झाला ! पोप ही चर्चच्या इतिहासांतली एक अत्यंत शक्तिसंपन्न व्यक्ति झाली.
शेवटचें कारण यति पीटर याचा असहिष्णु स्वभाव. अमीन्सचा भिक्षु पीटर हा पहिल्या क्रूसेडचा आत्मा. तो बुटका व अर्धवट होता. त्यानें पहिल्या क्रूसेडमध्यें प्राण ओतला. त्यानेंच धर्मयुध्दाचें ध्येय दिलें.
- ३ -
भिक्षु पीटर हा अकराव्या शतकांतला कॅटो होता. कॅटोनें कार्थेज धुळीला मिळविण्यासाठीं रोमनांना चिथावलें, उठविलें ; पीटरनें 'जेरुसलेम ताब्यांत घ्या' अशी ख्रिश्चनांस चिथावणी दिली. दोघेहि अतिशयोक्तिनें बोलणारे व शापवाणी उच्चारण्यांत प्रवीण होते. पीटर पोप दुसरा अर्बन याजकडे गेला व त्यानें त्याला 'जेरुसलेममधले तुर्की मुसलमान ख्रिश्चन यात्रेकरुंचा अपरंपार छळ करतात' असें सांगितलें. तें अगदींच खोटें होतें असें नव्हे. अकरावें शतक म्हणजे धार्मिक छळाचेंच शतक म्हणाना ? सारें जग द्वेषाच्या वावटळींत सांपडलें होतें. मुसलमान ख्रिश्चनांची, तर ख्रिश्चन मुसलमानांची कत्तल करीत होते आणि ज्यूंची कत्तल तर काय, सर्वच करीत ! न्यायासाठीं शस्त्र घेण्याला योग्य असे खरोखर कोणाचेच हात नव्हते. सारेच अपराधी व दोषी, सारेच खुनी व गुन्हेगार ! पण पोपनें एकांगी दृष्टि ठेवली व ख्रिश्चनांच्या पापांकडे डोळेझांक करून मुसलमानांना मात्र धडा शिकविण्याची पवित्र प्रतिज्ञा केली. त्यानें इ.स. १०९५ मध्यें क्लर्मांट येथें धर्मसभा बोलाविली व तीपुढें जळजळींत द्वेषाचें प्रवचन केलें. तें सार्या दुष्ट भावना जागृत करणारें व मुसलमानांबद्दल सर्वांस चीड आणणारें भाषण होतें. तो म्हणाला, ''तुम्ही या पवित्र युध्दांत भाग घ्याल तर तुम्ही ईश्वराचीच कृपा मिळवाल असें नव्हे, तर ऐहिक दृष्टीनेंहि तुमचा फायदाच होईल. मेल्यानंतर ईश्वराचें राज्य, इहलोकीं भरपूर लूट ! हें युध्द अशा रीतीनें दोन्ही लोकीं फायदेशीर आहे. पॅलेस्टाइन म्हणजे समृध्द व संपन्न देश—दुधातुपानें, मधानें व द्राक्षांनीं भरलेला देश. जे कोणी परधर्मीयांपासून पॅलेस्टाइन जिंकून घेतील त्यांच्यांत ती जमीन वांटली जाईल. जा. धर्मयुध्द करा.'' हें भाषण ऐकून जमलेल्या कोह्यांकुत्र्यांनीं जिभा चाटण्यास सुरूवात केली. ते एकदम म्हणाले, ''ईश्वराचीच अशी इच्छा आहेसें दिसतें'' व या थोर युध्दासाठीं निघण्याच्या तयारीला लागले.
पीटर या लोकांच्या टोळीचा नेता झाला. तो शरीरानें खुजा, बुध्दीनें अप्रगल्भ व मनानें संकुचित आणि असंस्कृत होता. त्याचें चारित्र्यहि तिरस्करणीय होतें. तो केसाळ झगा वापरी व पायांत कांहींच घालीत नसे. त्याच्या डोक्यावरचे केंस पिंजारलेले असत. ही खुनशी स्वारी गाढवावर बसे. गाढवाला तो पवित्र मानी. त्याच्या हातांत एक लांकडी क्रॉस असे. हा पीटर फ्रान्समध्यें व जर्मनींत सर्वत्र हिंडला. चर्चमध्यें, रस्त्यांत, कोंपर्यांकोंपर्यांवर त्यानें प्रचाराचा धूमधडाका उडविला. गिबन म्हणतो, ''पीटरजवळ बुध्दि नव्हती, युक्तिवादहि नव्हता. पण ही उणीव भरून काढण्यासाठीं तो पदोपेदीं ख्रिस्ताचें नांव उच्चारी, मेरी व देवदूत यांचे उल्लेख करी व या सर्वांबरोबर आपलें बोलणें होत असतें असें सांगे.'' १०९६ च्या वसंत ॠतूंत त्यानें जवळजवळ एक लाख लोकांचा तांडा जमा केला. त्यांत बहुतेक सारे भिकारी, डाकू व गळेकापू होते. तो त्या सर्वांच्या अग्रभागीं होता. एक पवित्र हंसी व एक मेंढा त्या सर्वांपुढें चालत, या गोष्टीवरूनच त्यांच्या बुध्दीची प्रगल्भता दिसून येते. मेंढीच्या मार्गदर्शकत्वाखालीं निघालेले लोक ! अशा थाटांत पीटर ख्रिश्चन नसणार्या सारासीन मुसलमानांस ठार करण्याच्या अति थोर ध्येयासाठीं निघाला.