मानवजातीचें बाल्य 11
आणि आतां प्राचीन इतिहासांतील ते अति महत्त्वाकांक्षी, ते अति अवडंबर माजवणारे, ते अत्यंत लढवय्ये असे असीरियन लोक पुढें आले. त्यांच्या त्या लांबरूंद जाड दाढ्या, लांब नाकें, त्यांचे ते जाडे जाडे ओंठ, असे हे लोक निनवी नगरीहून दिग्विजयार्थ बाहेर पडले. त्यांनीं नवीन रणरथांचा शोध लावला होता. कांहीं काळपर्यंत सर्व मानवजातीला त्यांनी 'दे माय धरणी ठाय' करून सोडलें. सर्वांना त्यांनी दशहत बसविली. त्या प्राचीन दुर्मीळतेच्या व दुर्भिक्ष्याच्या काळांत पुष्कळांना युध्द करणें भाग पडे. ती एक गंभीर भयंकर अशी आवश्यकता असे. परंतु असीरियन लोक जरूर होती म्हणून नव्हते लढत. त्यांना युध्द ही एक कला वाटे. सुंदर रमणीय कला ! मारण-मरणाची कला ! युध्दकैद्यांच्या आपण जीभा उपटीत आहोत, त्यांचे डोळे आपण काढीत आहोंत, अशा प्रकारच्या स्वत:च्या प्रतिकृती बनवून घेण्यांत असीरियन राजांना मोठा आनंद वाटे. त्यांचें तें युध्दतंत्र अत्यंत निर्दोष होतें. सार्या जगाला पादाक्रांत करूं व कायमची त्याच्यावर सत्ता गाजवूं असें स्वप्न असीरियन लोक मनांत खेळवीत होते. परंतु त्यांना फक्त एकाच गोष्टींत यश आलें ; ती गोष्ट म्हणजे स्वत:लाच नष्ट करणें ! जगावर सत्ता गाजविण्याचें त्यांचे स्वप्न शें-दीडशें वर्षांतच धुळीस मिळालें.
अशा प्रकारें एकापाठीमागून एक नाना जाती-जमाती येत होत्या. एकमेकांस खो देत होत्या. तारे वाचणारे खाल्डियन, सर्व सुखसोयींनीं सज्ज अशा राजवाड्यांतून वावरणारे ते क्रिटन, ते हिट्टिटिस, इलॉमिट्स, कास्टिट्स, सिथियन, किती नावें ! परंतु कशाला सारीं नावें सांगून तुम्हांला सतावूं ? तुमच्या मेंदूला कशाला नामावळीचें ओझें ? क्षणभर या जाती-जमाती चमकल्या आणि नंतर नष्ट झाल्या. त्यांच्या विनाशाचें एकच कारण ; आणि तें म्हणजे केवळ पाशवी लष्करी सत्तेवर त्यांची सारी भिस्त असे. १९१८ मध्यें अमेरिकनांनी जर्मनीवर मिळविलेला विजय आजपासून पांच हजार वर्षांनीं येणार्या वाचकांस जितका कौतुकाचा व गौरवाचा वाटेल, तितकेंच कौतुक असीरियनांनीं बाबिलोनियावर मिळविलेल्या विजयाचें आपणांस वाटतें. प्राचीन काळांतील हा इतिहास एकच गोष्ट रसरशीत निखार्याप्रमाणें आपणांस शिकवीत आहे ; ती गोष्ट ही कीं, युध्द म्हणजे खूनच नव्हे तर आत्महत्याहि आहे. प्रत्येक आक्रमक राष्ट्र आपल्या शत्रूचा नि:पात करतां करतां स्वत:हि नष्ट झालें आहे. दुसर्यास मारतां मारतां स्वत:लाहि त्यानें ठार केले आहे.
परंतु इतक्यानेंच काम भागलें नाहीं. जे मानववंश अधिक युध्दप्रिय व अधिक विजिगीषु होते, त्यांनीं आपल्या या सैतानी धांगडधिंग्यानें मानवी प्रगतीला किती मागें ठेवलें आहे हें पहाल तर विस्मित व्हाल. दुसर्या एकाद्या ग्रहावरचा फिरस्ता येथें पाहील तर प्रगति-विरोधकांची ही लष्करशाही पाहून तो आश्चर्यचकित होईल. आजपर्यंतचा मानवजातीचा इतिहास म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असें वाटतें. एकाद्या कुटुंबांतले सारेच वेडे असल्यावर त्यांची जी गत होईल, त्यांचा जसा इतिहास बनेल, तसें या मानवजातीचें झालें आहे. सुंदरसा राजवाडा अत्यंत श्रमानें उभा करावा व पुन्हा तो धुळीस मिळवावा असले प्रकार या मानवजातीच्या इतिहासांत पदोपदीं दिसून येतात. आज आपण ज्या संस्कृतींत आहोंत ती प्राप्त व्हावयास आपणांस दहा हजार वर्षे लागलीं. जग जर युध्दमुक्त असतें, हा लढायांचा खणखणाट व दणदणाट जगांत नसता, तर एवढी प्रगति आपण पांच शतकांत करून घेऊं शकलों असतों. ह्या भूतलावरून युध्द ही वस्तु अजि नष्ट झाल्याशिवाय खर्या प्रगतीला आरंभ होणार नाहीं.
आपणांस शिकायची इच्छा असेल, तर इतिहासानें सर्वांत महत्त्वाची अशी शिकविलेली ही गोष्ट होय.