मानवजातीचें बाल्य 44
- २ -
सायरसच्या जन्माविषयीं, त्याच्या आरंभीच्या जीवनाविषयीं फारशी माहिती उपलब्ध नाहीं. पर्शियन दंतकथा सांगतात, कीं त्याच्या आईबापांस एक स्वप्न पडलें. तें एक दुष्ट स्वप्न होतें. तें स्वप्न सायरसविषयींचें होतें. आईबापांनीं भीतीनें सायरसचा त्याग केला. त्याला त्यांनी रानावनांत नेऊन सोडलें. तेथे तो वास्तविक मरावयाचाच. परंतु एका कुत्रीनें त्याला पाळलें आणि अत्यंत आश्चर्यकारक रीतीनें तो जगला, वांचला. नंतर एका धनगराला तो आढळला. त्यानें त्याला मुलगा म्हणून पाळलें.
तो मोठा झाला. पुढारीपणाचे गुण जन्मजातच त्याच्याजवळ होते. ते दिसून येऊं लागले. पुढारी अर्थातच लोक समजतात त्या अर्थानें. पुढारीपणाचे गुण म्हणजे पहिल्या नंबरचें दुष्ट असणें, गुंड असणें. सायरसनें स्वयंसेवकांचा संघ गोळा केला. आजोबा अस्त्यगस यांना त्यानें पदच्युत केलें, आणि मेडीज व पर्शिया यांचा तो राजा झाला.
परंतु एवढ्यानें त्याचें समाधान झालें नाहीं. सुखी व समाधानी अशा लहानशा राज्याचा राजा होऊन रहाणें हें त्याला पुरेसें वाटेना. त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती. कॅन्सरच्या रोगाप्रमाणें-काळपुळीप्रमाणे-आपलें साम्राज्य सर्व खंडभर पसरावें असें त्याला वाटत होतें. अत्युष्ण कटिबंधापासून तो अति शीत कटिबंधापर्यंत आपलें साम्राज्य पसरलें पाहिजे असें त्याला वाटत होतें तें त्याला पर्शियाविषयीं खूप प्रेम वाटत होतें म्हणून नव्हें, पर्शियाचें नांव सर्वत्र व्हावें म्हणून नव्हें, त्याला फक्त स्वत:विषयीं प्रेम होतें. तो स्वत:चा पुजारी होता. तो तृष्णांध होता. लालसोन्मत्त होता.
- ३ -
सायरसनें पर्शियाचें राज्य बळकावलें त्याच्या आधीं दहाच वर्षे क्रोशियस हा लीडियाचा राजा झाला होता. आशियामायनरमधील ग्रीक वसाहतींच्या समुदायाला 'लीडिया' म्हणत. इजियन समुद्राच्या पूर्व बाजूस ह्या वसाहती पसरलेल्या होत्या. राजा क्रोशियस हा प्राचीन काळांतील जणूं कुबेर होता ! प्राचीन काळांतील जे. पी. मॉर्गन होता. स्वत:जवळच्या संपत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता. तो प्रत्येक देशांतील यात्रेकरूंस बोलावी. हेतु हा, कीं त्यांनीं आपल्या या संपत्तीची कीर्ति सर्वत्र न्यावी. तो त्या परदेशीय पाहुण्यांसमोर आपलीं सारीं माणिकमोतीं, सारें जडजवाहीर मांडी आणि नंतर त्यांना विचारी, ''पृथ्वीवरील सर्वांहून सुखी असा प्राणी मी नाहीं का ?'' त्याच्या या अहंकारी प्रश्नाला ग्रीक तत्त्वज्ञानी सोलोन यानें स्पष्ट उत्तर दिलें होतें, कीं ''मनुष्य मेल्याशिवाय त्याला सुखी म्हणतां येणार नाहीं.'' मनुष्य जन्मभर सुखी होता कीं दु:खी हें त्याच्या मरणकाळच्या स्थितीवरून कळतें.