मानवजातीचें बाल्य 15
- ३ -
खालच्या वर्गाच्या लोकांत तो जाऊं येऊं लागला. त्यांच्या भिकार वस्तींत बसूं उठूं लागला. शहरांतील इमारतींना लागणार्या विटा भाजणार्या मजुरांजवळ खरोखरच तो बोलत बसे. या श्रमजीवी लोकांजवळ बोलणें त्याला आवडूं लागलें. बरे आहेत हे लोक असें त्याला वाटलें. इजिप्शियन लोकांचा जसा इतिहास होता, तसा यांचाहि इतिहास होता. त्यांच्यांतहि मोठमोठे लोक होऊन गेले होते. त्यांच्या इतिहासांतहि सुवर्णक्षण येऊन गेले होते. हे लोक मूसाला म्हणाले, ''थोर अब्राहाम आमचा पूर्वज. त्यानें ऊर हें खाल्डियन श़हर सोडलें. स्वातंत्र्याचा शोध करीत तो निघाला. त्यानें समुद्र व वाळवंट यांच्यामध्यें एका प्रदेशांत हें नवीन स्वातंत्र्य स्थापिलें. कांही काळ अब्राहाम व त्याचे अनुयायी तेथें राहिले. गुराढोरांचीं त्यांची खिल्लारें वाढलीं. शेळ्यामेंढ्या वाढल्या. ते सुखी व संपन्न झाले. परंतु ज्यु म्हणजे अज्ञात व अस्थिर लोकांचे राष्ट्र. स्वस्थ बसणें त्यांना माहीत नाहीं. एका देशांतून दुसर्या देशांत असें करीत सर्व पृथ्वीवर भटकणें हेंच जणुं त्यांच्या नशिबीं. आणि आतां आम्ही या इजिप्शियन राजाच्या राज्यांत आलों आहोंत. आम्ही आज दास झालों आहोंत. तरीहि थोर पूर्वजांचा आम्हांला अभिमान वाटतो.''
ज्यू लोक व त्यांचा इतिहास यांचें मूसाला आकर्षण वाटलें. तो या ज्यू श्रमजीवींना भेटायला वरचेवर जाऊं लागला. मूसाची ही विचित्र वर्तणूक पाहून त्याचे पांढरपेशे प्रतिष्ठित मित्र त्याची गंमत करीत, टिंगल करीत. परंतु पुढें पुढें त्याच्या या वर्तनाचा ते धिक्कार करूं लागले. त्यांना ते बिलकुल पसंत नव्हतें. त्या असंस्कृत व परकी सेमिटिक भुक्कडांकडे जात जाऊं नकोस असें राजानें मूसाला बजावलें.
परंतु मूसानें या धमक्यांकडे व सूचनांकडे लक्ष दिलें नाहीं. एकदां हे ज्यू गुलाम काम करीत असतां मूसा तेथें गेला होता. एक इजिप्शियन सरदार एका गुलामाला निर्दयपणें फटके मारीत होता. मूसा संतापला. त्यानें त्या इजिप्शियनावर प्रहार केला व त्याला तेथल्या तेथें ठार केलें. एका ज्यू गुलामाची बाजू घेऊन इजिप्शियनास ठार करणें म्हणजे अक्षम्य अपराध होता. मूसाला प्राणरक्षणार्थ वाळवंटांत पळावें लागलें.