खर्या संस्कृतीचा प्रारंभ 10
प्रकरण २ रें
संयुक्त युरोपचें स्वप्न खेळविणारा इटॅलियन नेता : मॅझिनी
- १ -
आपणांस या प्रकरणांत एका उदात्त ध्येयाचा जन्म, त्याचा विकास व त्याचा नाश दिसणार आहेत. कोणतें हें ध्येय ? कोणता हा महाविचार ? युरोपांतील राष्ट्रांनीं एका कुटुंबांतील भावांप्रमाणें गुण्यागोविंदानें राहावें, युरोपचें एक संयुक्त राष्ट्र बनवावें, हा तो विचार. ज्याच्या मोठ्या मनांत हें महोच्च ध्येय जन्मलें त्या पुरुषाचें नांव गायसेघे मॅझिनी. मॅझिनीची कारकीर्द समजण्यासाठीं एकोणिसाव्या शतकांच्या पूर्वार्धांतील युरोपियन राजकारणाची सर्कस आपण थोडक्यांत पाहूं या--तिच्याकडे जरा डोकावूं या. १८१५ सालीं नेपोलियनचा पाडाव झाल्यावर व्हिएन्ना येथें युरोपांतील राष्ट्रांचे शांति-प्रतिनिधी जमले होते. १९१४ सालच्या महायुध्दाच्या वेळीं ज्याप्रमाणें शांतता-स्थापक मुत्सद्दी जमले व जखमी जगाला पुन: आपल्या पायांवर उभें करण्यास झटले पण अयशस्वी झाले, तसेंच व्हिएन्ना येथें शंभर वर्षांपूर्वी घडलें. व्हिएन्ना काँग्रेसमध्यें प्रामाणिक पण प्रतिगामी मुत्सद्दी मेटरनिक होता, हुषार पण दुष्ट टॅलिरँड होता आणि मानवांवर मनांतून प्रेम करणारा पण प्रत्यक्ष व्यवहारांत अनियंत्रित सत्ता गाजविण्याची चटक लागलेला, अर्धवट भला व अर्धवट बुरा; गूढवादी झार अलेक्झांडरहि होता. अलेक्झांडरची धार्मिक प्रेरणा तेथें प्रभावी होती. मेटरनिक व टॅलिरँड यांना व्यवहारबुध्दि अधिक होती. या तिघांच्या संमिश्र सूचनांनुसार तेथें जमलेल्या प्रतिनिधींनीं एक शांततेचा करार केला. त्याला 'पवित्र करार' म्हणतात. या पवित्र करारानुसार युरोपांतील राष्ट्रांनीं बायबलच्या पायावर मानवाचें बंधुत्व उभारावयाचें ठरविलें. त्याचबरोबर प्रबळ राष्ट्रांनीं दुबळया राष्ट्रांचें स्वातंत्र्य दडपून टाकण्याचाहि निश्चय केला.
युरोपांतील सत्ताधार्यांना जुलुमाची सनदच मिळाली. ही सनद उद्धोषितांना कांहीं हेतू उदात्त होते, पण पुष्कळसे मुत्सद्देगिरीचे, स्वार्थाचें व मूर्खपणाचे होते. मॅटरनिक, टॅलिरँड व अलेक्झांडर जगाला गुलाम करावयाला निघाले व त्या कामीं त्यांनीं पवित्र धर्मग्रंथांचा आधार घेतला. युरोपची विभागणी केली गेली. हांवर्या साम्राज्यशाही लांडग्यांना युरोपचे तुकडे चारण्यांत आले. डच रिपब्लिकचें रूपांतर पुन: राजशाहींत करण्यांत आलें. पोलंड रशियाला देण्यांत आला. क्रांतिकारक वृत्तीचा सर्वत्र बींमोंड करण्यांत आला. स्पेनमध्यें पुन: इन्क्विझिशन व छळमंदिरें स्थापिलीं गेलीं. गुप्त पोलिसांना लोकांच्या घरांत जाऊन त्यांचीं भाषणें ऐकण्याची परवानगी देण्यांत आलीं. लोकांचीं मोहोरबंद पत्रेंहि ते पाहत. उदार मतांचा पुरस्कार करणारे विद्यार्थी वा प्राध्यापक यांना हद्दपार करण्यांत येई किंवा कारागृहांत कोंबण्यांत येई. आतां राष्ट्रांराष्ट्रांचें युध्द नव्हतें हें खरें; पण 'मानवजातीचा इतिहास' या पुस्तकाचा कर्ता हेंड्रिग व्हॅन लून लिहितो, ''युरोपांतील ही शांतता केवळ स्मशानशांतता होती.''
पवित्र करार आपलें अपवित्र वर्चस्व युरोपवरच नव्हे तर अमेरिकेवरहि गाजवूं लागला. ज्या वेळीं सायमन बोलिव्हरनें वेनेझ्वालाचें स्वातंत्र्य जाहीर केलें, त्या वेळीं दक्षिण अमेरिकेंतलें हें रिपब्लिक चिरडून टाकण्यासाठीं पवित्र करारवाले उभे राहिले. पण अमेरिकेचे अध्यक्ष मन्रो यांनीं जाहीर केलें कीं, ''युरोपांतील दोस्त आपली साम्राज्यशाही वृत्ति जर या बाजूला आणूं पाहतील तर अमेरिकेच्या शांततेस व सुरक्षिततेस ही गोष्ट धोक्याची आहे असें आमचें मत आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या बाबतींत हें धोरण मैत्रीचें द्योतक नाहीं असें वाटतें.''