मानवजातीचें बाल्य 65
ज्या मनुष्याला सामाजिक बुध्दि नाहीं, सर्वांशीं मिळून मिसळून कसें वागावें, सर्वांच्या हितसंबंधींस अविरोधी वर्तन कसें ठेवावें हें ज्याला कळत नाहीं, अशा मनुष्याला केवळ बहिष्कृत किंवा अस्पृश्याप्रमाणें मानून तो सुधारेल असें नाहीं. गुन्हेगार वेडा असेल तर त्याचें वेडेपण तुम्हीं दूर केलें पाहिजे. तो अज्ञानी असेल तर तुम्हीं त्याचें अज्ञान दूर केलें पाहिजे. परंतु सूडबुध्दीनें तुम्हीं त्याला कधींहि, केव्हांहि, शासन करतां कामा नये, शिक्षा देतां कामा नये.
मानसिक रोगटपणाप्रमाणेंच शारीरिक रोगटपणाहि अज्ञानजन्यच असतो. नीट काळजी घेतली तर रोगराई बर्याच प्रमाणांत कमी करतां येईल, आरोग्य वाढवतां येईल. परंतु ज्यांचे रोग दु:साध्य आहेत त्यांना मरायचें असेल, आत्महत्या करायची असेल, तर कारुण्यबुध्दीनें त्यांना तशी परवानगी देण्यांत येईल. कारण अशा घुटमळणार्या व कंटाळवाण्या रोगापेक्षां मरण बरें.
वकील म्हणजे एक पीडाच. परंतु आदर्श राज्यांत त्यांची जरुरी राहणार नाहीं. या अनावश्यक आपत्तीचा त्रास प्लेटोच्या राज्यांत नाहीं. कारण जेथें ज्ञान आहे, समंजसपणा आहे, तेथें कोर्टकचेर्यांची, फिर्यादींची वगैरे जरुरीच नाहीं. आदर्श राज्यांत कायदे फारच थोडे असतील आणि त्यांचा अर्थ करणें सोपें व सरळ असेल. आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी शास्त्यांस पुरतेपणीं माहीत असतें कीं, एकादा नवीन कायदा करणें म्हणजे गुन्हेगारांचा आणखी एक नवीन वर्ग निर्माण करणें होय. भाराभर कायदे केल्यानें गुन्हे कमी होत नसतात. आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी राज्यकर्ते स्वत:चें नियंत्रण कसें करावें, स्वत:वर संयम कसा ठेवावा, आपलें मन, आपल्या वासना, आपल्या इच्छा यांच्यावर ताबा कसा ठेवावा हें जनतेस शिकवितील तर मग देखरेख करण्याची, पोलीस वगैरे राखण्याची फारशी जरुरी राहणारच नाहीं.
आदर्श राज्यांतील शासनसंस्था एकच गोष्ट सदैव पाहील. प्रजेचें हित, मंगल कसें होईल, प्रजेला सुख कसें लाभेल, याच एका गोष्टीकडे तेथले शास्ते रात्रंदिवस पाहतील. सुख, स्वास्थ्य, शांति, निरामयता, इत्यादि गोष्टी प्रजेस देणें हें शासकांचें काम राहील. इमर्सन म्हणतो, ''मला आरोग्य द्या व प्रकाश द्या. मग मी मोठ्या सम्राटांचा दिमाखहि हास्यास्पद करीन. त्यांच्याहून मी अधिक सुखी व खुष असेन.'' प्लेटोच्या दृष्टीनें आरोग्य, समाधान व प्रकाशपूर्ण आयुष्य--सौंदर्यमय असा हा जीवनक्रम म्हणजे सुखाची सीमा होय. निळ्या आकाशांत सुंदर सोनेरी प्रकाश असावा, तद्वत् जीवनांत सुखसमाधान असावें, सौंदर्य असावें. प्लेटोचें ध्येय काय ? सौंदर्याचें जीवन, न्यायाचें जीवन, प्रेममय जीवन, 'सत्यं-शिवं-सुंदर' चें जीवन. प्लेटोचें हें ध्येय आहे. प्लेटोच्या तत्त्वज्ञानांत हे तिन्ही शब्द जणूं समानार्थकच आहेत. सज्जन मनुष्य म्हणजेच सुखी मनुष्य ; सुखी असणें म्हणजेच सज्जन असणें, चांगलें असणें ; आणि हा सज्जन नेहमीं न्यायी असतोच. जो सुखी व सज्जन असतो त्याच्या जीवनांत अविरोध असतो, त्याच्या जीवनांत प्रमाण असतें, मेळ असतो ; म्हणून त्याच्या जीवनांत शांतीचें संगीत असते. असा मनुष्य सौंदर्यासाठी तहानलेला असतो. सर्वत्र मधुरता असावी, सुंदरता असावी, अशी उत्कंठा व कसोशी त्याला असते. सौंदर्य सर्वत्र व्हावें, दिसावें, म्हणून तो प्रयत्न करीत राहतो ; सौंदर्यनिर्मितीसाठीं तो धडपडतो. आपल्या सुंदर मुलांच्या रूपानें, कलात्मक कृतींच्या रूपानें किंवा उदात्त व उदार अशा कर्मांच्या रूपानें, तो स्वत:मधील सौंदर्यच प्रकट करीत असतो. शारीरिक, बौध्दिक व आंतरिक सौंदर्य तो मूर्त करूं पाहतो. सौंदर्य ही अमृतत्वाची जननी आहे. जेथें सौंदर्य आहे तेथें अमरता आहे. सौंदर्य असेल तर अमृतत्वाचा अमरपट्टा मिळेल. सुंदर वस्तु निर्मून आपण मृत्यूवर विजय मिळवितों, मरणाला जिंकून घेतों.