मानवजातीची जागृती 12
अखेर तो कर्जबाजारी होतो. त्याचे सावकार त्याला सतावूं लागतात. ज्या मित्रांना आपण आपलें सर्वस्व दिलें ते आपल्या संकटकाळीं धांवून येतील असें त्याला वाटतें. पण एकामागून एक सारे त्याला सोडून जातात; प्रत्येक जण निरनिराळ्या सबबी सांगतो व मदत नाकारतो.
पुन: एकदां टिमॉन त्या सर्वांना मेजवानीस बोलावतो व त्यांच्यासमोर केवळ कढत पाण्याचे पेले ठेवतो. पण त्या वेळेपर्यंत आपणांस त्याचे मित्र म्हणविणारे ते आश्चर्यचकित होऊन कांहीं बोलण्याच्या आधींच तो तें कटत पाणी त्यांच्या तोंडांवर व ताटें त्यांच्या अंगांवर फेंकतो व त्यांना घालवून देतो.
या स्वार्थी जगांत नि:स्वार्थीपणा म्हणजे मूर्खपणा असें तो शिकतो. जग काय हें त्याला नीट समजतें. तो अथेन्स शहर सोडून जंगलांतील गुहेंत राहावयाला जातो. तेथें त्याला 'अत्यंत निर्दय पशूहि माणसांहून अधिक दयाळू' आढळतात. आपल्या गुहेसमोर तो कंदमुळांसाठीं खणीत असतां त्याला अकस्मात् एक ठेवा—'पिवळा गुलाम'—पिवळे सोनें सांपडतें; मानवजातीला गुलाम करणारें व मानवजातीचें गुलाम असणारें सोनें त्याला आढळतें. पण तें पिवळें सोनें त्याला दिपवूं मात्र शकत नाहीं. तें सोनें पाहून त्याला त्याचा तिटकारा वाटतो व तो तें पुन: मातींत पुरून टाकतो. पण कांहीं नाणीं मात्र कोणी मानवी प्राणी त्रास द्यावयास आले तर त्यांना मारण्यासाठीं म्हणून तो वर ठेवतो.
टिमॉनला सोनें सापडल्याची गोष्ट अथेन्समधील लोकांना कळते व एकामागून एक ते त्याच्या गुहेकडे येतात. कवी, चित्रकार, योध्दे, वेश्या, भिकारी, डाकू, सारे येतात. पुन: एकदां टिमॉनची मैत्री जोडण्यासाठीं ते उत्सुक होतात. तो प्रत्येकाला मूठ, दोन मुठी नाणीं देतो. एकाद्या संतप्त व तिरस्कार करणार्या देवाप्रमाणें तो त्यांना म्हणतो, ''जा, चालते व्हा. तुमच्या शहरांत जा व हें द्रव्य पुजून ठेवा, नाहीं तर सूकरवत् चाललेल्या तुमच्या सुखोपभोगांत खर्च करा.'' कांहीं चोरांना तो द्रव्य देतो व म्हणतो, ''जा, लुटा एकमेकांना, म्हणजे अधिक मिळेल. कापा गळे. जे तुम्हांला भेटतील ते सारे चोरच आहेत. जा अथेन्स शहरांत व फोडा दुकानें. ज्यांचें लुटाल तेहि चोरच ! चोर चोरांना लुटूं देत. सारेच चोर ! हें सारें जग टिमॉनला डाकूंची गुहा वाटते. पण एक अपवाद मात्र असतो, तो म्हणजे त्याचा कारभारी फ्लॅव्हियस. तो आपल्या धन्याच्या दु:खांत भागीदार होतो. फ्लॅव्हियस म्हातारा झालेला असतो. तो जेव्हां धन्याजवळ येतो, त्याला भक्तिप्रेम दाखवितो व रडतो, तेव्हां टिमॉन म्हणतो, ''जगांत अद्यापि थोडी माणुसकी आहे. या जगांत एक—फक्त एकच—प्रामाणिक मनुष्य आहे. पण फक्त एकच हो ! माझें म्हणणें नीट लक्षांत घ्या. एकच, अधिक नाहीं; व तो म्हणजे हा वृध्द कारभारी.'' पण तो फ्लॅव्हियसला म्हणतो, ''तूं फसशील हो ! इतकें चांगलें असणें बरें नव्हे. तूं प्रामाणिक आहेस; पण शहाणपणांत कमी दिसतोस. तूं मला फसवून व छळून दुसरी चांगली नोकरी मिळवूं शकशील. आपल्या पहिल्या धन्याच्या मानेला फांस लागला म्हणजे शहाणे नोकर दुसरा धनी मिळवितात. जगाची तर ही रीतच आहे. तूं वेडाच दिसतोस.''
शेक्सपिअर खालच्या वर्गांतील लोकांना तुच्छ मानतो असा त्याच्यावर एक आरोप आहे. टीकाकार म्हणतात, ''अशांविषयीं शेक्सपिअरला सहानुभूति वाटत नसे. तो त्यांच्याबद्दल नबाबी तिरस्कारानें व तुच्छतेनें बोलतो. काटक्याकुटक्या, दगडधोंडे, यांच्याहून त्यांची किंमत अधिक नाहीं असेंच जणूं तो दाखवितो.'' अशा टीकाकारांना शेक्सपिअरच्या मनाची विश्वव्यापकता कळत नाहीं. 'अथेन्सचा टिमॉन' या नाटकात शेक्सपिअरनें अथेन्समधील जी मानवसृष्टि उभी केली आहे तींत त्यानें अत्यंत प्रेमळ पात्र जर कोणतें रंगविलें असेल तर तें टिमॉनच्या गुलामाचें—फ्लॅव्हियसचें होय. टीकाकारांच्या तत्त्वज्ञानांत जितकी सहानुभूति असेल तीपेक्षां अपरंपार अधिक सहानुभूति शेक्सपिअरच्या अनंत मनांत आहे.
जीवनाकडे प्रत्येक दृष्टीकोनांतून पाहणारा शेक्सपिअरसारखा महाद्रष्टा दुसरा झाला नाहीं. प्रसंगविशेषीं तो शेलेप्रमाणें क्रांतिकारक होऊं शके, हीनप्रमाणें कडवट व कठोर होऊं शके, तसाच युरिपिडीसप्रमाणें निराशावादी तर बायरनप्रमाणें निस्सारवादी (सिनिक) हि होऊं शके. स्विनबर्नप्रमाणें तो मायेंतून पाहणारा होई, तर गटेप्रमाणें तत्त्वज्ञानीहि होई; टेनिसनप्रमाणें तो आशावादी आणि शांतपणें शरणागति स्वीकारणारा, जें आहे तें चांगलेंच आहे असें मानणाराहि होई. जीवनाकडे नाना रंगांच्या चष्म्यांतून पाहणारा हा महाकवि आहे. याची दृष्टि एकांगी नाहीं. 'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकांत निराशेच्या काळ्या चष्म्यांतून तो पाहत आहे. जगांत कशांतहि सार नाहीं, सारा चौथा, सारें नि:सार, घाण ! टिमॉनचा एक मित्र अल्सिबिआडीस म्हणून असतो. तो अथेन्स शहर वांचवूं पाहतो; पण त्याला हद्दपारीचें बक्षीस मिळतें ! अल्सिबिआडीस रागानें सैन्य उभारून आपला अपमान करणार्या मातृभूमीवरच चालून येतो तेव्हां सीनेटर घाबरतात. ते सारे टिमॉनकडे जातात व म्हणतात, ''अथेन्स संकटांत आहे. या वेळेस तूं ये.''