मानवजातीची जागृती 31
दुसर्या शब्दांत बोलावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, प्रत्येक मानवी प्राणी म्हणजे दैवी ब्रह्माचा अंश आहे. व्यक्ति मरते म्हणजे बिंदु सिंधूंत मिळून जावा त्याप्रमाणें आत्मा परमात्म्यांत विलीन होतो. एकादी तान महासंगीतांत विलीन व्हावी तसा आत्मा परमात्म्यांत मिळून जातो. क्षणभर दिक्कालांत आलेला-स्थानबध्द झालेला तो भव्य, दिव्य विचार पुन: शाश्वततेच्या योजनेंत जाऊन बसतो. ''शरीरनाशाबरोबर मानवी मनाचा संपूर्ण नाश होणें शक्य नाहीं. ..... सद्गुणी आत्मे ईश्वरी अंशाचें असल्यामुळें-दैवी ज्ञानाचे अंशभाक् असल्यामुळें-चिरंजीवच आहेत.''
मानवी प्राणी म्हणजे इतस्तत: विखुरलेले पृथक् व अलग जीव नव्हेत. प्रत्येक केवळ स्वत:साठीं धडपडणारा व स्वत:पुरता जगणारा नाहीं. आपण सारे त्या दैवी ब्रह्माचे संबंध्द भाग आहों. आपणांस माहीत असो वा नसो, आपण सारे एकाच ध्येयासाठीं धडपडत आहों. आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहों; येवढेंच नव्हे तर आपण एकाच विराट् शरीराचे अणू आहों. अगदीं क्षुद्रतम माणसावर केलेला प्रहारहि सार्या मानवजातीच्या शरीरावरील आघात होय. एकाद्या क्षुद्र व्यक्तीविरुध्द केलेला अन्याय सार्या मानवजातीवरीलच अन्याय होय. जो आपल्या सर्व मानवबंधूंना सहानुभूति दाखवितो, जो सर्वांवर प्रेम करतो, तो जीवनाच्या स्वरूपाशीं सुसंवादी आहे असें म्हणावें. स्पायनोझाच्या मताचा वॉल्ट व्हिटमन् लिहितो, ''सहानुभूतिशून्य हृदयानें तुम्ही एक फर्लांग चाललां, तर आपलेंच कफन पांघरून तुम्हीं आपलीच प्रेतयात्रा काढली असें म्हणण्यास हरकत नाहीं.''
दुसर्यांचें सुख वाढवून त्यायोगें स्वत: सुख मिळविणें हें मानवी जीवनाचें साध्य आहे. ''शहाणा माणूस जी गोष्ट दुसर्यासाठीं इच्छीत नाहीं ती तो स्वत:साठींहि इच्छीत नाहीं.'' अल्पसंतुष्ट असणें, द्वेषाची परतफेड प्रेमानें करणें, दैवानें जें जें भोगावें लागेल तें तें आनंदानें व धैर्यानें हंसत हंसत सहन करणें म्हणजेच भलें जीवन, अर्थात् स्पायनोझाच्या मतें प्रज्ञावंतांचा संपूर्ण मार्ग अगर श्रेष्ठांचा निदोर्ष मार्ग होय. मुख्य गोष्ट ही कीं, सर्व जगाशीं एकरूप होऊन राहण्यांत आनंद मानावयास शिका. तुमचें तसेंच तुमच्या शेजार्याचें जीवन कितीहि क्षुद्र असले तरी, या विश्वाच्या विराट् वस्त्रांतील ते अवश्यक असे धागे आहेत हें कधींहि विसरूं नका. ''आपल्या मनाचें सर्व निसर्गाशीं ऐक्य आहे याची जाणीव वा याचें ज्ञान असणें ही परम मंगल व कल्याणप्रद गोष्ट होय.'' हें जग तुमच्यासाठीं केलेलें नसलें तरी निदान तुम्ही तरी या जगासाठीं केले गेले आहां. तुम्ही या जीवनाच्या ग्रंथांतलें एक महत्त्वाचें पृष्ट आहां. तुम्ही नसाल तर तो अपूर्ण व अपुरा राहील हे विसरूं नका.
आपण देशद्रोंही नाहीं अशी आपल्या देशबांधवांची खात्री पटविण्याचे कामीं सुदैर्वानें त्याला यश आलें म्हणून बरें. आपण निरुपद्रवी ज्ञानोपासक आहों हें त्यानें पटवून दिलें म्हणून त्याचे प्राण वांचले. पण त्याचे प्राण फार दिवस वांचावयाचे नव्हते. त्याची प्रकृति झपाट्यानें खालावत होती. १६७७ सालच्या हिंवाळ्यांत त्याची खालावलेली प्रकृति अधिकच खंगली व फेब्रुवारीच्या बाविसाव्या तारखेस तो मरण पावला. त्याच्या घराचा मालक व त्याच्या घराची मालकीण चर्चमध्यें गेलीं होतीं. त्याचा वैद्य तेवढा त्याच्याजवळ होता, त्यानें टेबलावर असलेले सर्व पैसे लांबविले, चांदीच्या मुठीचा एक चाकूहि गिळंकृत केला आणि मृत देह तसाच टाकून तो निघून गेला. स्पायनोझा हें पाहावयाला असता तर पोट धरून हंसला असता.
मरणसमयीं त्याचें वय फक्त चव्वेचाळीस वर्षांचें होतें. त्याच्या मनोबुध्दीचा पूर्ण विकास होण्याची वेळ येत होती. तो परिणतप्रज्ञ होत होता. अशा वेळीं घाला आला आणि तो गेला. पण रेननच्या शब्दांत म्हणूं या कीं, ''ईश्वराची अत्यंत सत्यमय दृष्टि आजपर्यंत जर कोणीं दिली असेल तर ती स्पायनोझानें. ती दृष्टि देऊन तो गेला.'' शोर मॅचर लिहितो, ''विचाराच्या क्षेत्रांत स्पायनोझा अद्वितीय आहे. त्याच्याजवळ कोणीहि जाऊं शकत नाहीं. तो आपल्या कलेचा स्वामी आहे. या क्षुद्र जगाच्या फार वर तो आहे; या क्षुद्र जगांत त्याला अनुयायी नाहींत व कोठेंहि नागरिकत्व नाहीं ! तो जणूं या जगाचा नाहींच !''
असें म्हणतात कीं, इतिहासांत खरे निदोर्ष ख्रिश्चन दोनच होऊन गेले. येशू व स्पायनोझा. आणि दोघेहि ज्यूच होते.