मानवजातीची जागृती 28
ज्यूंनीं बहिष्कृत केल्यावर त्यानें आपलें मूळचें बरूच नांव बदलून बेनेडिक्ट केलें. स्पायनोझाचें तत्त्वज्ञान कब्बालाच्या गूढवादावर उभारलेलें आहे व त्याचें नीतिशास्त्र जगांतील प्रॉफेटसच्या लिखाणांपासून मिळालेल्या स्फूर्तीतून जन्माला आलें आहे.
धर्माभ्यासांत तो ग्रॅज्युएट झाला; पण पास होतांना जास्तींत जास्त अपमान त्याच्या वांट्यास आला. धर्माभ्यासानंतर त्यानें लॅटिनचा व इतर धर्मोपदेशकांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आरंभिला. व्हॅन डेन एन्डे नामक डच पंडित त्याला लॅटिन शिकवीत असे. एन्डे भाषाकोविद् व व्युत्पत्तिशास्त्रज्ञ होता. धर्माच्या बाबतींत तो नास्तिक होतां. पुढें कांहीं वर्षांनीं चौदाव्या लुईची त्याच्यावर अवकृपा झाली व त्याला सार्वजनिक रीत्या फाशीं जाण्याचा मान लाभला !
व्हॅन डेन एन्डेची मुलगी स्पायनोझाला शिकण्यांत मदत करीत असे. स्पायनोझा तिच्या मार्गदर्शनानें लॅटिनच नव्हे तर प्रेमहि शिकला. आपण ज्यू आहों हें विसरून त्यानें तिला लग्न करण्याची विनंती केली, तेव्हां तिनें त्याचें ज्यूपण त्याच्या ध्यानीं आणून दिलें व स्वत:च्या कर्करिंग नामक दुसर्या एका विद्यार्थ्याशीं लग्न केलें. तो तिच्याच धर्माचा असून हँबुर्ग येथें त्याचा फायदेशीर धंदा होता.
प्रेमाचा हा असा अनुभव आला, त्यामुळें तो शहाणा झाला व आपल्या विफल प्रेमापासून अमूर्ताच्या प्रेमाकडे वळला. त्यानें पलेटो, स्टोइक व एपिक्युरियन पंथाचे तत्त्वज्ञानी, त्याचप्रमाणें त्याच्या वेळेपर्यंत झालेले सर्व तत्त्वज्ञानी वाचून काढले. गिऑर्डानो ब्रूनो हा विश्वीं विश्वंभर मानणारा होता; त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्पायनोझावर बराच परिणाम झाला. ब्रूनोला नवीन विचार करणारा म्हणून जाळण्यांत आलें. तसेंच डोकार्टस्च्या गणितांतील अमूर्त तत्त्वांनींहि तो आकृष्ट केला गेला. सनातरी विचार प्रकट करण्याबद्दल डोकार्टस्ला राजांमहाराजांकडून मानसन्मान मिळाले होते. स्पायनोझाचें मन अतिशय विशाल होतें. तो जें जें वाची तें सर्व स्वत: फावून टाकी. शेवटीं त्याचें तत्त्वज्ञान एक प्रकारचा ज्यू गूढवादच झालें. त्याला पलेटोच्या विचारांचाहि रंग होता, एपिक्युरसच्या संशयवादाचीहि थोडीशी छटा होती व इटॅलियन हुतात्मा ब्रूना याच्या अद्वैत तत्त्वज्ञानानेंहि त्याला थोडा आकार दिला होता. फ्रेंच तत्त्वज्ञानी डोकार्टस् याच्या गणिती परिभाषेंतून स्पायनोझाचें तत्त्वज्ञान जगासमोर मांडलें गेलें. स्पायनोझानें आपलीं सारीं पुस्तकें सिसरोनियन लॅटिनमध्यें लिहिलीं. त्याच्या बुध्दीइतकी विशाल व व्यापक बुध्दि इतिहासांत फारच क्वचित् दिसते. पण स्पायनोझाचें नीतिशास्त्र वर लिहिल्याप्रमाणें इसापचें नीतिशास्त्र होतें.
वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आपलें जन्मगांव ऍमस्टरडॅम सोडून तो लंडन शहराजवळच्या र्हिन्स्बर्ग उपनगरांत येऊन राहिला. येथें प्राचीन इझ्राईल ॠषींप्रमाणें तो शारीरश्रमानें पोटाला मिळवी व उरलेला वेळ जीवनाचें, तसेंच ईश्वराचें कोडें उलगडण्यांत घालवी. जीवनाचा अर्थ काय याचा विचार करीत तो बसे. करमणूक म्हणून तो कोळ्याच्या हालचाली बघत बसे. एकादा देवदूत मानवांच्या लीला पाहत असेल त्याप्रमाणें तो कोळ्यांच्या गंमती बघत बसे. आपणांस लढणार्या कोळ्यांचीं भांडणें पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागत, गाल ओले होत. होतां होईतों तो कधीं प्रक्षुब्ध होत नसे. पण मालकिणीनें त्याच्या खोलींतील कोळिष्टकें झाडून टाकलीं तर मात्र त्याला जरासा राग येई.
कोळ्यांच्या जाळ्यांकडे पाहत असतां तो मनांत आपल्या तत्त्वज्ञानाचें चिंतन करीत बसे. त्याचें पहिलें पुस्तक धर्मावर होतें. त्याचें नांव A Treatise on Religion & Politics. त्यांत त्यानें बायबलवर टीका केली होती. जुन्या करारांतील ईश्वराला रजा देऊन त्यानें स्वत:च्या नव्या करारांत अधिक दयाळू प्रभू निर्माण केला. स्पायनोझाचें हें नवें पुस्तक, हा त्याचा नवा करार म्हणजेच त्याचें सुप्रसिध्द नीतिशास्त्र होय. भूमितीच्या पध्दतीनें स्पायनोझानें लिहिलेलें हें बायबल आहे; अधात्म गणितात बसविण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. हा अदृश्य जगाचा फोटो आहे. हें शाश्वततेचा सांगाड्यांत बसविलेलें जीवनाचें चित्र आहे.