मानवजातीचें बाल्य 18
ज्यूंचें हें महाप्रयाण त्यांच्या इतिहासांत जरी अत्यंत महत्त्वाचें असलें, तरी इजिप्शियनांच्या इतिहासांत त्याला मुळींच महत्त्व नाहीं. जणूं एक साधी क्षुद्र गोष्ट असें त्यांना वाटलें. जुन्या करारांत या महाप्रयाणाच्या यात्रेची भव्यभडक कथा रंगवलेली आहे. प्राचीन काळीं प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासांत सत्य व कल्पना यांचें मिश्रण केलेलें असे. सत्यकथांत कल्पना मिसळलेली असे. ऐतिहासिक कादंबरी वा नाटक तयार केलें जाई.
मूसाबरोबर जे ज्यू आले ते रांगडे होते. त्यांच्यांत ऐक्य नव्हतें. वृत्तीनें ते भांडखोर होते. त्यांची नीट संघटना नव्हती. परंतु मूसाच्या अलौकिक प्रतिभेनें व बुध्दीनें या लोकांची अभेद्य अशी एकजूट जन्माला आली. हे अभंग ऐक्य एकाएकीं निर्माण झालें नाहीं. मूसाला त्यासाठीं कितीतरी वर्षे प्रयत्न करावा लागला. या ज्यूंचें एक राष्ट्र बनविण्यापूर्वी मूसानें त्यांना नवीन स्मृति दिली ; नवीन कायदे दिले. त्या ज्यूंमध्ये एक नवीन प्राण त्याने फुंकिला. मूसा जन्मजात पुढारी होता. या ज्यूंच्या साध्या मनांवर परिणाम करण्यासाठीं त्यानें भव्य-दिव्य विधी निर्माण केले. मानवी मनाला स्तंभित करणार्या भव्य अशा नैसिर्गिक स्थानीं हे विधि करावयाचे. यासाठीं त्यानें तो सिनाई पर्वत पसंत केला. सिनाई पर्वताचीं तीं काळींकभिन्न अशीं, मेघांना फोडून वर जाणारीं पांच शिखरें; पांढर्या वाळूचें घों करणारे लोंढे ; सिनाई पर्वतांवरील ते दगडधोंडे, ते कडे, ज्यांतून ईश्वराचें अट्टाहास्य जणूं प्रतिध्वनित होई ; ईश्वराचे आदेशच जणुं जेथून उद्धोषिले जात आहेत असें वाटे ; अशी ही सिनाई पर्वताची जागा म्हणजे योग्य असें भव्य व्यासपीठ होतें. या व्यासपीठावर बसून स्वर्ग व पृथ्वी एकत्र आणणें शक्य झालें असतें.
या सिनाई पर्वतावर बसून मूसानें आपला तो नवधर्म दिला. तें अर्धवट रानटी व अर्धवट उदात्त असें नीतिशास्त्र त्यानें दिलें. त्या नीतिशास्त्रानें आजपर्यंत मानवांना मार्गहि दाखविला आहे व पदच्युतहि केलें आहे. मूसाच्या या उपदेशांत जरी प्रसंगविशेषीं क्रौर्य दिसत असलें, कोठें कोठें जरी बालिशता असली, तरी मानवी हृदयांत मानवी विचार ओतण्याचा इतिहासकाळांतील तो पहिला थोर प्रयत्न होता. त्यानें तुझा डोळा फोडला तर तूं त्याचा डोळा फोड असें तो शिकवितो. परंतु त्या आरंभींच्या रानटी अवस्थेंतून जो नुकताच बाहेर पडत आहे, त्याच्यापासून तुम्ही असे आदेश ऐकलेत तर त्यांत आश्चर्य वाटण्यासारखें तें काय ? परंतु मूसानें गरिबांवर प्रेम करा व परकीयालाहि सहानुभूति द्या असेंहि सांगितलें आहे. आजचा सुसंस्कृत समजला जाणारा विसाव्या शतकांतील मनुष्य गरिबांना प्रेम देणें व परकीयांस सहानुभूति दाखविणें एवढें तरी करतो का ? मूसाचा उपदेश तीन हजार वर्षे झालीं तरीहि आपण अद्याप आपलासा केला नाहीं. मूसा जितका उंच चढला तितकें तीन हजार वर्षे झालीं तरी आपण चढलों नाहीं. मूसा आपल्यापुढें गेलेला आहे. आणि आपण अद्याप मागासलेले व रानटी आहोंत. या मूसानेंच मनुष्याचे बळी देऊं नये म्हणून शिकविलें, हें आपण विसरतां कामा नये. मूसाची ही उदार आज्ञा, त्याची ही प्रेमळ शिकवण अद्यापहि आपण ऐकिली नाहीं. १९१४ मध्यें लाखों आईबापांनीं आपल्या मुलांचे युध्द-देवाला बळी दिले.
- ७ -
असें सांगतात, कीं ध्येयाला पोचण्यापूर्वीच मूसा मेला. जो प्रदेश त्याला पुन्हा मिळवावयाचा होतो तेथे जाण्यापूर्वीच तो देवाघरीं गेला. त्यानें ज्या कामाचा आरंभ केला होता तें पुढें दुर्बळांच्या अंगावर पडलें. त्यांना ते झेपेना, पार पाडतां येईना. जगांतील मोठ्यांतील मोठ्या क्रांतिकारकांच्या बाबतींत सदैव हीच गत झाली आहे. मूसापासून तों लेनिनपर्यंत हाच दुर्दैवी अनुभव. परंतु मरण्यापूर्वी मूसानें स्वत:च्या दुबळ्या लोकांतील दुबळेपणा झडझडून पार फेंकून दिला होता. वाळवंटांतील स्वच्छ व जोरदार वारे आणून तो दुबळा रोगटपणा त्यानें नष्ट केला होता. त्यानें जगायला नालायक असणार्या जुनाट दुर्बलांना खुशाल मरूं दिलें. त्याच्याऐवजीं नव्या दमाची, उत्साही अशी अग्रेसरांची पिढी त्यानें उभी केली. मृतप्राय लोकांतील निराश असा अवशिष्ट भाग त्यानें वाळवंटांत आणला आणि त्याच्याकडून संघटित असें नवराष्ट्र त्यानें निर्मिलें. हें राष्ट्र कधीं मरणार नाहीं, मरायला कधींहि तयार होणार नाहीं.