मानवजातीची जागृती 13
पण टिमॉन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीं. तो शक्य तेवढे सारे शिव्याशाप त्यांना देतो. पण शेवटीं त्याच्या मनांत एक विचार येतो. तो म्हणतो, ''अल्सिबिआडीसच्या हातून मरण येऊं नये असें वाटत असेल तर एक गोष्ट मी करूं शकेन.'' आणि मग तो म्हणतो, ''माझ्या शेजारींच एक झाड आहे. मला तें माझ्यासाठींच कापावें लागणार आहे. मी तें तोडणारच आहे. पण अथेन्समधील माझ्या-मित्रांना-सार्या अथेन्सलाच-खालपासून वरपर्यंत, रावापासून रंकापर्यंत, सर्वांना—माझा हा निरोप सांगा : ज्यांना ज्यांना येणारें संकट टाळावयाचें असेल, ज्यांना ज्यांना आपलीं दु:खें थांबवावयाचीं असतील, त्यांनीं त्यांनीं येथें त्वरेनें धांवून यावें. माझ्या कुर्हाडीनें झाड पडण्यापूर्वीच या झाडावर त्यांनीं स्वत:ला टांगून घ्यावें.''
आपल्या विषारी तिरस्काराचा शेवटचा बाण शहराकडे परतणार्या त्या आपल्या नगरबंधूंवर सोडून टिमॉननें स्वत:चे थडगें खणलें. तेथील खारट पाण्याच्या प्रवाहाजवळ त्यानें खड्डा खणला व स्वत:चें विषण्ण जीवन संपविलें. मातींतील—पृथ्वीच्या पोटांतील—कृतज्ञ किड्यांना मेजवानी देणेंच अधिक चांगलें. पृथ्वीवर चालणार्या द्विपाद मानवी पशूंपेक्षां पृथ्वीच्या पोटांतले किडे व जीवजंतू किती चांगलें !
या नाटकांत टिमॉन हा एकच सिनिक नाहीं. अॅपेमॅन्टस नांवाचा तत्त्वज्ञानीहि सिनिकच आहे. मानवजातीचा मूर्खपणा पाहून तोहि नाक मुरडतो. पण टिमॉनची दु:खी विषण्ण कटुता व अॅपेमॅन्टसचा उपहासात्मक चावटपणा यांत फरक आहे. मानव मानवाशीं माणुसकी विसरून वागतो हें पाहून टिमॉनला जीवन अशक्य होतें. पण तेंच दृश्य पाहून अपेमॅन्टस उपहासानें हंसतो. त्याला जणूं सैतानीं आनंद वाटतो. टिमॉन हें जग नाहींसें करून ज्यांत प्रेमळ मित्र असतील असें नवें जग निर्मू पाहतो. पण अॅपेमॅन्टस जगाला नांवे ठेवतो, जग सुधारूं इच्छीत नाहीं. अथेन्समधील एक सरदार त्याला ''किती वाजले ? कोणता समय आहे ?'' असें विचारतो, तेव्हां तो उत्तर देतो, ''प्रामाणिक असण्याचा हा समय आहे.'' पण आजूबाजूला जरासें प्रामाणिक जग दिसलें तरी तो तें लगेच बिघडवूं पाही. जगांत अप्रामाणिकपणाच नसेल तर मग जगाची टिंगल कशी करतां येईल ? 'जग वाईट असावे. म्हणजे गंमत पाहतां येईल.' अशी अॅपेमँटसची वृत्ति आहे. मित्रांची कृतघ्नता पाहून टिमॉनला मरणान्तिक यातना होतात, प्राणान्तिक वेदना वाटतात, अॅपेमँटसला ती मोठ्यानें हंसण्याची संधि वाटते ! एकाच नाटकांत टिमॉन व अॅपेमँटस यांची पात्रें रंगविणारा फारच सूक्ष्मदर्शी असला पाहिजे. त्याला स्वभावदर्शन फारच सूक्ष्म साधलें आहे. बारीकसारीक छटा दाखविणें फार कठिण असतें. पण शेक्सपिअर स्वभावदर्शनांत अद्वितीय आहे. टिमॉनशिवाय अॅपेमँटसला पूर्णता नाहीं, अॅपेमँटसशिवाय टिमॉनला पूर्णता नाहीं. दोघांच्याद्वारां मिळून जगांतील अन्यायाला शेक्सपिअर उत्तर देत आहे. जगाचा उपहास करणारा शेक्सपिअर या दोघांच्या डोळ्यांनी बघून उत्तर देत आहे.
- ३ -
'हॅम्लेट' मध्यें व्यवहारी माणसाचें, संसारी शेक्सपिअरचें, रामरगाड्यांत पडलेल्या शेक्सपिअरचें जगाला उत्तर आहे. त्याच प्रश्नाला—जगांतील अन्यायाला/त्यानें उत्तर दिलें आहे. जगांतील नीचता पाहून टिमॉन आत्महत्त्या करतो, अॅपेमँटस हंसतो, पण हॅम्लेट काय करतो ? तो खुनाचा सूड घेऊं पाहतो. हॅम्लेट टिमॉनपेक्षां कमी भावनाप्रधान आहे, पण अॅपेमँटसपेक्षां अधिक उदार वृत्तीचा आहे. तो जगांतील अन्यायाला शासन करूं पाहतो. जुन्या करारांतील 'डोळ्यास डोळा', 'दांतास दांत', 'प्राणास प्राण', 'जशास तसें' हा न्याय त्याला पसंत पडतो. जगांतील अन्याय पाहून हॅम्लेटच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते, तशीच सर्वसामान्य माणसाच्या मनावर होते. टिमॉनप्रमाणें तो जगापासून पळून जात नाहीं किंवा अॅपेमँटसप्रमाणें जगाचा उपहासहि करीत नाहीं. तो विचार करीत बसतो. या सर्व जगाचा अर्थ काय याची मीमांसा करीत असतो. पण शेवटीं त्याच्या भावना जेव्हां पराकोटीला पोंचतात, तेव्हां तो प्रहार करतो; मात्र तो प्रहार दुष्ट कृत्यावर नसून दुष्ट कृत्य करणार्यावर असतो आणि असें करीत असतां तो आपल्या शत्रूचा व स्वत:चाहि नाश करून घेतो.