तरवारीचें व फांसाचें थैमान 32
- ६ -
त्याच्या आशियांतील विजयाची वार्ता आधींच पोंचली होती. ती ऐकून रोमन जनता वेडी झाली. तिनें त्याचें भव्य स्वागत केलें. आणखी दहा वर्षे आपणच हुकुमतशहा राहणार असें घोषवून त्यानें क्लिओपाट्रा हिला आणण्यासाठीं लवाजमा व लष्कर पाठवून दिलें. ती आपल्या बाळाला घेऊन आली. तिनें त्याचें नांव 'सीझरियन' म्हणजे 'छोटा सीझर' असें ठेवलें होतें. तिजबरोबर तिची बहीण आर्सिनो हिहि आली होती ; पण पाहुणी म्हणून नव्हे, तर कैदी म्हणून. सीझरनें आपल्या विजयी मिरवणुकींत त्या अभागिनीला शृंखला घालून रोमन लोकांसमोर मिरविले व मग ठार केले. क्लिओपाट्रा हिच्या मर्जीसाठीं म्हणून त्यानें हें नीचतम कृत्य केलें. काल्पूर्निया हिजशीं काडीमोड करण्याचें धैर्य त्याला झालें नाहीं. क्लिओपाट्रा हिच्यासाठीं त्यानें टायबर नदीच्या पैलतीरीं भव्य प्रासाद बांधला व आपणांस केवळ रोमची राजा-राणी म्हणून नव्हे तर देवदेवता मानून जनतेनें भजावें, पूजावें यासाठीं दोघें कारस्थानें करूं लागलीं.
सीझरनें स्वत:चें एक मन्दिर बांधविलें व त्यांत आपले दोन पुतळे उभे केले. त्यांची पूजाअर्चा करण्यासाठीं व तेथे यज्ञयाग करण्यासाठीं त्यानें पुजारी नेमले व सीझरच्या नांवे घेतलेली शपथ 'जोव्ह' देवाच्या नांवे घेतलेल्या शपथेइतकीच पवित्र असें फर्मान काढलें. खेळांच्या निरनिराळ्या मिरवणुकी निघत त्यांत इतर देवदेवतांच्या चित्रांप्रमाणें आपलेंहि चित्र असलें पाहिजे असें त्यानें आज्ञापिलें.
आणि हे जे आपले अमर मानसन्मान तो करून घेत असे त्यांत क्लिओपाट्राहि सहभागी असे. 'अजिंक्य देव, ज्यूपिटर ज्युलियस', याच्या चित्राशेजारीं किंवा पुतळ्याशेजारीं 'व्हीनस देवतेची दिव्य बहीण क्लिओपाट्रा' हिचेंहि चित्र व पुतळा असे. सीझर आपणांस 'देव ज्युपीटर' व क्लिओपाट्रा हिला 'प्रेमदेवता व्हीनस हिची बहीण' म्हणून संबोधी.
देवत्वाचा मान स्वत:कडे घेण्याची सीझरची वृत्ति पुष्कळ रोमनांना आवडली नाहीं ; त्यांना या गोष्टीचा राग आला, पण सीझरनें देवत्व घेतल्याबद्दल त्यांना जितका राग आला त्यापेक्षां जास्त राग तो रोमचा राजा होऊं पाहत होता याबद्दलच त्यांना आला. त्यानें आपल्यासाठीं एक सुवर्णसिंहासन तयार करण्याची आज्ञा दिली व मुकुट धारण करण्यासाठीं योग्य संधीची तो वाट पाहत बसला.
ही संधि एका रोमन सणाच्या वेळीं आली असें त्याला वाटलें. लोकांची नाडीपरीक्षा करण्यासाठी अर्धवट गंमतीनें व अर्धवट गंभीरपणें त्यानें त्या दिवशींच्या उत्सवांत मार्क अॅन्टोनी याला खेळांत राजा करावें असें सुचविलें. तद्नुसार राजा झाला ; खेळांतलाच राजा. पण आजूबाजूच्या जनतेला राजाचा खेळ आवडला नाहीं. सीझर दुरून सर्व पाहत होता ; त्यानें जाणलें कीं, मुकुट धारण करण्याची वेळ अजून आली नाहीं. म्हणून त्यानें तो बेत पुढें ढकलला व रोमन रिपब्लिकचें अनियंत्रित राजशाही रोमन साम्राज्यांत परिवर्तन करण्याला परिपक्व वेळ अजून आली नाहीं, हें ओळखून वाट पाहण्याचें ठरविलें.