मानवजातीचें बाल्य 50
- ३ -
पेरिक्लीस हा अथेन्समधील एका सरदाराचा मुलगा होता. पेरिक्लिसचा बाप पर्शियांशीं झालेल्या लढायांत लढला होता. आईकडून तो क्लेस्थेनीस घराण्यांतील होता. अथेन्समध्यें लोकशाही स्थापणार्यांपैकीं क्लेस्थेनीस हा एक होता. ग्रीक लोकांचा जो शिक्षणक्रम असे तो सारा पेरिक्लिसनें पुरा केला. व्यायाम, संगीत, काव्य, अलंकारशास्त्र, तत्त्वज्ञान, सारे विषय त्यानें अभ्यासिले. लहान वयांतच राजकारणाची आवड त्याला लागली. त्या विषयांत तो रमे. त्याच्या अनेक आचार्यांपैकीं सुप्रसिध्द तत्त्वज्ञानी झेनो हा एक होता. झेनोची वाणी दुधारी तरवारीप्रमाणें होती. तो कोणत्याहि विषयावर दोन्ही बाजूंनीं तितक्याच समर्पकतेनें व परिणामकारकपणें बोलूं शके. पुढें यशस्वी मुत्सद्दी होण्याची महत्त्वाकांक्षा धरणार्या तरुण पेरिक्लिसला अशा वादविवादपटु बुध्दिमान् गुरुजवळ शिकायला सांपडलें ही चांगलीच गोष्ट झाली. परंतु पेरिक्लिसचा सर्वांत आवडता आचार्य म्हणजे अनॅक्झेगोरस हा होता. अनॅक्झेगोरस हाहि मोठा तत्त्वज्ञानी होता. तो थोडासा अज्ञेयवादी होता. ''या जगाचा कारभार भांडखोर व क्षुद्र वृत्तीचे देव चालवीत नाहींत, होमरच्या महाकाव्यांतील देवताहि चालवीत नाहींत, तर परमश्रेष्ठ अशी चिन्मयता जगाचा कारभार चालवीत आहे'' असें तो म्हणे. अनॅक्झेगोरस विज्ञानांतहि फार पुढें गेलेला होता. मनुष्यांच्या डोळ्यांना सूर्य जरी बचकेएवढा दिसत असला तरी तो खरोखर फारच प्रचंड आहे असें तो म्हणे. सूर्याचा आकार निदान पेलापॉनेसच्याइतका म्हणजे शंभर चौरस मैलांचा तरी असला पाहिजे असा त्यानें अंदाज केला होता.
ज्या प्रदेशांत ग्रीक रहात होते तो प्रदेश खरोखरच फार लहान होता.
पेरिक्लीस अशा गुरुजनांजवळ शिकला. जेव्हा त्याचें शिक्षण संपलें त्या वेळेस विश्वाच्या पसार्यांचें जरी त्याला फारच थोडें ज्ञान असलें तरी त्याच्या स्वत:च्या शहरांतील राजकारणाचें मात्र भरपूर ज्ञान होतें. तो उत्कृष्ट वक्ता होता. प्रतिपक्षीयांचीं मतें तो जोरानें खोडून टाकी. विरुध्द बाजूनें मांडलेल्या मुद्यांची तो राळ उडवी. त्याचें अशा वेळचें वक्तृत्व म्हणजे मेघांचा गडगडाट असे, विजाचा कडकडाट असे. अशा वेळेस कोणीहि त्याच्यासमोर टिकत नसे. परंतु पेरिक्लीस एकदम राजकारणांत शिरला असें नाहीं. प्रथम त्यानें लष्करांत नोकरी धरिली. ज्याला जींवनांत यशस्वी व्हावयाचें असेल त्यानें लष्करी पेशाची पायरी चढणें आवश्यक असतें.
आणि पुढें त्याचें सर्वाजनिक आयुष्य सुरू झालें. गरिबांचा पुरस्कर्ता म्हणून तो पुढें आला. स्वभावानें तो भावनाशून्य व जरा कठोर होता. तो अलग रहाणारा, दूर रहाणारा, जरा अहंकारी असा वाटे. तो विसाव्या शतकांतील जणूं वुड्रो वुइल्सन होता. प्रथम प्रथम लोकांचा विश्वास संपादणें त्याला जड गेलें. पुराणमतवादी पक्षाचा किमॉन हा त्याचा प्रतिस्पर्धी होता. किमॉन अधिक चळवळ्या व गुंडवृत्तीचा होता. हा किमॉन गरिबांना मेजवानीस बोलावी. स्वत:च्या खासगी फळबागांतील फळें गोळा करायला, त्या बागांतून खेळायला तो गरिबांना परवानगी देई. रस्त्यांतून जातांना त्याचे गुलाम वस्त्रांचे गठ्ठे घेऊन त्याच्या पाठोपाठ येत असत. आणि रस्त्यांत जे जे कोणी वस्त्रहीन दिसत, ज्यांच्या अंगावर फाटक्या चिंध्या असत, त्यांना किमॉन वस्त्रें वांटीत जाई.