मानवजातीची जागृती 19
''मला आपले विकार आंवरवत नाहींत'' असें तो पुष्कळदां आपल्या आईला सांगे व म्हणे, ''मला याची लाज वाटते !'' पण हे विचार व या वासना आंवरण्याचा यत्नच त्यानें कधीं केला नाहीं. व्हर्सायलिस येथील तो प्रसिध्द आरसे-महाल-तो भव्य प्रासाद त्यानें बांधला. येथेंच तो आपल्या प्रियकरिणींची करमणूक करी, त्यांच्याबरोबर कामक्रीडा करी, नाचरंग खेळे, मेजवान्या देई. या त्याच्या विषयोपभोगांतील वैभव प्राचीन रोमन सम्राटांच्या वैभवापेक्षांहि अधिक असे. एकदां एका मेजवानीच्या प्रसंगीं त्याच्याजवळच्या तरवारीचें मॅन इतक्या हिर्यांनीं भरलेलें होतें कीं, ज्या सोन्यांत ते हिरे बसविलेले होते तें सोनें दिसणेंहि मुश्कील झालें होतें !
ही सौंदर्योपासना, हीं सुखें, हे विलास, या सर्वांसाठीं लुईला अपरंपार खर्च करावा लागे. शेतकर्यांची दैना करून त्यानें फ्रान्सचें वैभव वाढविलें. अधिक उदात्त जगाचा पैगंबर जो डिडरो त्यानें एक सुंदर प्रसंग रेखाटला आहे. आपल्या आजोबांना-चौथ्या हेनरीला-चौदावा लुई आपला व्हर्सायलिसचा प्रासादर दाखवीत आहे. चौदावा लुईहि मेलेला असून त्याचें भूत तो राजवाडा आजोबांना दाखवीत असतां तो वृध्द राजा राजवाड्याकडे बघतो व तदनंतर चुकचुक् करून नापसंतीदर्शक मान हालवून म्हणतो, ''बाळ, राजवाडा छान आहे, सुंदर आहे, यात शंकाचा नाहीं. पण गोनेसी येथील शेतकर्यांची घरें कशी आहेत तें पहावेंसें वाटतें.'' त्या भव्य राजवाड्याच्या आसपास राहणारे शेतकरी पेंढयांवर निजत, त्यांना राहण्याला घर नसे, त्यांच्या पोटांत भाकर नसे, हें लुईला व हेनरीला कळतें तर त्याना काय वाटलें असतें ?
- ३ -
आपल्या भरमसाट खर्चाच्या विलासोपभोगांसाठीं लागणार्या पैशांकरिता लुई सर्वांवर कर बसवी; मोठमोठ्या सरदारांपासून तों किसानकामगारांपर्यंत सर्वांवर तो करांचा बोजा लादी. पण सरदार बिथरले तेव्हां त्यानें सारा बोजा सामान्य रयतेवरच टाकला ! आपल्या र्सावजनिक भाषणांतून व घोषणांतून तो गरिबांबद्दल अपार सहानुभूति दाखवी. तो एकदां म्हणाला, 'शिपायांपेक्षां मजुरांचा उपयोग अधिक असतो.' तो दुसर्या एका प्रसंगीं म्हणाला, 'किसान व कामगार यांच्यावर माझें फार प्रेम आहे.' तो त्यांच्यावर प्रेम करी व त्यांना चिरडून टाकण्यासाठींहि शक्य तें सर्व करी. त्यानें शेतकर्यांची इतकी पिळणूक केली कीं, ''शेवटीं शेतकरी गुराढोरांप्रमाणें गवत खाऊं लागले !''
दुसर्यांबद्दल त्याला यात्किचितहि सहानुभूति वाटत नसे. राजानें आपल्या हृदयांत दयेला थारा देतां कामा नये असें त्याचें मॅकिआव्हिली मत होतें. धनी गुलामावर चालवितो तशी राजानें प्रजेवर हुकुमत चालवावी असें तो म्हणे. प्रजेबद्दल तो फक्त तिरस्कारच व्यक्त करी. जणूं खालच्या योनींतील पशू समजूनच तो त्यांना वागवी. शौचाला बसल्या बसल्या तो मुलाखती देई व उघड्यावर एनिमा घेई. ''आजूबाजूचीं माणसें म्हणजे कावळे, चिमण्या वा पशुपक्षी ! त्यांची कदर कशाला ? त्यांची कशाची लाज ?'' असेंच जणूं त्याला वाटे. एकादा सामान्य मनुष्य कुत्रा समोर असतां जसे हे विधी बिनदक्कत करील तसें माणसें समोर असलीं तरी लुई करी. त्याची स्तुतिस्तोत्रें गाणारा चरित्रकार बरट्रांड म्हणतो, ''त्याचें हरएक कृत्य राजाला शोभेसें असे. कांहिंहि करतांना आपण मोठा भूपाल आहों, थोर राजां आहों, हें तो कधींहि विसरत नसे.''