हमामा - अभंग २०६ ते २१२
२०६
हमामा पोरा हमामा । घुंबरींवाजे घमामा ॥१॥
हमाम्यांचे नादानी । घुंबरी वाजली रानीं ॥२॥
हमाम्यांची शीतळ शाई । पोरा मेली तुझी आई ॥३॥
काम क्रोध पोरा नाशी । अहंकार तोंड वासी ॥४॥
एका जनार्दनांशीं । पोरा वहिल्या गांवा जाशीं ॥५॥
२०७
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥
हमामा पोरा हमामा ॥धृ॥
हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥
हमामा घालीं नेटें । धरीं भक्तींचे बळ मोठे ॥३॥
हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरीं ॥४॥
२०८
हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥
हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालुं हमामा ॥२॥
हमामा घालुं ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥
हमामा घालूं नेटें ।एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥
२०९
हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्ह्बा तुझें पायीं ॥१॥
हमामा रे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥धृ॥
हमामा खेळा वेंगीं । सांडुनीं द्वैताच्या संगीं ॥२॥
हमामा खेळूं नेटें । कान्होंबाचे बळ मोठें ॥३॥
हमामा खेळॊं सोई । एका जनार्दनाचे पायीं ॥४॥
२१०
हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥
हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥
हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥
हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥
हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥
२११
हमामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा ॥१॥
बोला हमामा बोला हमामा ॥धृ॥
हमामा बोला होटीं । बुद्धी सांडोनि द्यावी खोटी ॥२॥
हमामा बोला भाई । पुन्हां जन्मा येणें नाहीं ॥३॥
एका जनार्दनांचे पायीं । भावें ठेवियेली डोई ॥४॥
२१२
कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्हीं आम्हीं दोघे मिळोनी ॥१॥
हमामा रे भाई हमामा ॥धृ॥
हमामा घाली मत्स्य अवतारी । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥
हमामा घाली समुद्रतीरीं । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥
हमामा घाली नानापरी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥
हमामा घाली हिरण्य कश्यपाघरीं । प्रगटुनी स्तंभामाझारीं ॥५॥
हमामा घाली बळीचे द्वारीं । आपण होऊनि भिकारी ॥६॥
हमामा घाली परशु हातीं । निःक्षात्री पृथ्वी केली जगतीं ॥७॥
हमामा घाली लंकेवर । केला बिभीषण राज्यधर ॥८॥
हमामा घाली नंदाघरीम । गोपाळ नाचती गजरीं ॥९॥
हमामा घाली भीमातटीं । उभाचि धरुनि कर कटीं ॥१०॥
एका जनार्दनी खेळ । नानापरीचा आकळ ॥११॥