नामपाठ - अभंग १३७४ ते १३९०
१३७४
नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जालें ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वदतां वो वाचे । सार्थक जन्माचें झालें साचें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । विठ्ठल विठ्ठल ध्याये वेळोवेळां ॥३॥
१३७५
झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥
आवडी आदरें नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें निका । तोडियेली शाखा अद्वैताची ॥३॥
किर्तनमहिमा
१३७६
क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥
आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥
गरुडतिष्ठे जोडिल्या करीं । लक्ष्मी तेथें कामारी । ऋद्धिसिद्धि सहपरिवारी । तिष्ठताती स्वानंदें ॥३॥
कीर्तनगजरें वाहे टाळीं । महादोषांची होय होळी । एका जनार्दनीं गदारोली । नामोच्चार आनंदें ॥४॥
१३७७
श्रीशंभुचें आराध्य दैवत । क्षणीं वैकुंठीं क्षीरसागर । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला आम्हां कीर्तनरंगांत ॥१॥
धन्य धन्य कीर्तन भूमंडळी । महादोषां होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळीं । वाहतां टाळी कीर्तनीं ॥२॥
पार्वतीसी गुज सांगे आपण । शंकर राजा बोलें वचन । माझें आराध्य दैवत जाण । कीर्तनरंगणीं उभे आहें ॥३॥
मी त्रिशूळ पाशुपत घेउनी करीं । कीर्तनाभोंवतीं घिरटी करी । विघ्ना हाणोनि लाथा निवारी । रक्षी स्वयें हरिदासां ॥४॥
त्याचे चरणींचें रज वंदी आपण । हें पार्वतीसी सांगे गृह्मा ज्ञान । एका जनार्दनीं शरण । कीर्तनरंगी नाचतसें ॥५॥
१३७८
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥
गावें नाचावें साबडें । न घालावेंकोडें त्या कांहीं ॥२॥
मिळेल तरीं खावें अन्न । अथवा पर्णे ती भक्षुन ॥३॥
जाईल तरी जावो प्राण । परी न सांडोवे कीर्तन ॥४॥
किर किर आणूं नये पाठी । बोलुं नये भलत्या गोष्टी ॥५॥
स्वये उभा राहुन । तेथें करी मी कीर्तन ॥६॥
घात आलिया निवासी । माता जैसी बाळावरी ॥७॥
बोलें उद्धवासी गुज । एका जनार्दनीं बीज ॥८॥
१३७९
उद्धवा तूं करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥
धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तूं नाचे । मी तूं पण साचें । अंगीं न धरीं कांहीं ॥२॥
भोळे भोळे जन । गाती अनुदिनीं कीर्तन । तेथें अधिष्ठान । माझें जाण सर्वथा ॥३॥
नको चुकूं तया ठायीं । वसे सर्वदा मीही । एका जनार्दनीं पाहीं । किर्तनी वसें सर्वदा ॥४॥
१३८०
नारदें केलासे प्रश्न । सांगतसे जगज्जीवन । कलीमाजी प्रमाण । कीर्तन करावें ॥१॥
महापापीया उद्धार । पावन करती हरिहर । ब्रह्मादि समोर । लोटांगण घालिती ॥२॥
श्रुति स्मृति वाक्यार्थ । कीर्तन तोचि परमार्थ । शास्त्रांचा मथितार्थ कीर्तनपसारा ॥३॥
एक शरण जनार्दन । किर्तनें तरती विश्वजन । हें प्रभुंचे वचन । धन्य धन्य मानावें ॥४॥
१३८१
कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी ॥१॥
सुख कीर्तनींअद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥
गोडी सेविती संतजन । येरां न कळे महिमान ॥३॥
ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं पहा डोळां ॥४॥
१३८२
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥
आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥
युगे अठ्ठावीस जाली । न बैसे उभा सम पाउली ॥३॥
कीर्तनीं धरुनियां हेत । उभा राहिला तिष्ठत ॥४॥
एका शरण जनार्दनीं । अनुदिती करा किर्तन ॥५॥
१३८३
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा ॥१॥
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसें ॥२॥
भाळ्याभोळ्यासाठीं । धावें त्याच्या पाठोपाठीं ॥३॥
आपुलें सुख तया द्यावें । दुःख् आपण भोगावे ॥४॥
दीनानाथ पतीतपावना । एका जनार्दनीं वचना ॥५॥
१३८४
गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन ॥१॥
आवडी कीर्तना ऐशी । लक्ष्मी तेथे प्रत्यक्ष दासी ॥२॥
मोक्षादिकां नव्हें वाड । येरा कोण वाहे काबाड ॥३॥
एका जनार्दनीं भुलला । उघडा कीर्तनी रंगला ॥४॥
१३८५
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडीं । म्हणोनियां उडी घाली स्वयें ॥१॥
नावडे तया आणिक संकल्प । कीर्तनीं विकल्प करितां क्षोभे ॥२॥
साबडे भाळे भोळे नाचताती रंगी । प्रेम तें अंगी देवाचिये ॥३॥
एका जनार्दनीं धांवे लवलाहे । न तो कांहीं पाहे आपणातें ॥४॥
१३८६
देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडी ॥१॥
वैकुंठीहुनि आला । कीर्तनींतो सुखें धाला ॥२॥
ऐसा कीर्तनाचा गजर । देव नाचतासे निर्भर ॥३॥
भुलला कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
१३८७
देवासी प्रिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदे ॥१॥
न विचारी यतीकुळ । असोत अमंगळ भलतैसे ॥२॥
करिती कीर्तन अनन्यभावें । ते पढिये जीवेंभावें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । कुळें पावन होती कीर्तनीं ॥४॥
१३८८
देवासी दुजे नावडे सर्वथा । करितां हरिकथा समाधान ॥१॥
येऊनिया नाचे कीर्तनीं सर्वदा । निवारी आपदा सर्व त्याची ॥२॥
भाविकांसाठी मोठा लोभापर । नाचतो निर्भर कीर्तनांत ॥३॥
एका जनार्दनीं आवडे कीर्तन । म्हणोनि वैकुंठसदन नावडेची ॥४॥
१३८९
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव संतजन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवाघरीं ॥२॥
जो नातुडे ध्यानीं समाधीसाधनीं । तो स्वानंदें कीर्तनीं नाचतसें ॥३॥
जो यज्ञावदानीं कांहीं नेघे माये । तो द्वादशीं क्षीराब्धी उभ उभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणें बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धि ॥५॥
वैष्णवाघरें लक्ष्मी कामारी । एका जनार्दनीं देव दास्यत्व करी ॥६॥
१३९०
योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥
तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥
यज्ञांचें अवदानीं न धाये । तो क्षीरापतीलागीं मुख पसरुनि धांवें । केवढें नवले सांगावें । या वैष्णवसुखाचें ॥३॥
सुख येतें समाधानीं । म्हणोनि सुख जनार्दनीं । एका जनार्दनाचे चरणीं । सप्रेमें विनटला ॥४॥