नाममहिमा - अभंग १२०१ ते १२२०
१२०१
विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥
नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥
गर्जत नामीं जो जो शब्द उठी । शब्दानुशब्दा पडतसे मिठी ॥३॥
एका जनार्दनीं नित्य स्मरें नाम । नामरुप जाला आत्माराम ॥४॥
१२०२
नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥
कैसें होता हें स्मरण । स्मरणामाजीं विस्मरण ॥२॥
नामरुपा नव्हता मेळा । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥
एका जनार्दनीं छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥
१२०३
शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥
साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥
परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥
एका जनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चारितां जाण श्रम हरे ॥४॥
१२०४
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें ॥१॥
कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥
तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥
१२०५
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥
ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढें ॥३॥
एका जनार्दनीं तारक हें नाम । पावती निजधाम गातां वाचे ॥४॥
१२०६
चांडाळादि तरले । महादोषी उद्धरले ॥१॥
नाम पावन पावन । नामापरतें थोर कोण ॥२॥
नामाग्नीनें न जळे । ऐसे दोष नाहीं केले ॥३॥
वाल्मिक म्हणती दोषी । नाम उच्चारितां वंद्य सर्वांसी ॥४॥
अजामेळ गणिका । नामे दोष भंगिले देखा ॥५॥
एका जनार्दनीं नाम जाण । शस्त्र निर्वाणीचा बाण ॥६॥
१२०७
एकचि नाम उच्चारिलें । गणिकें नेलें निजपदीं ॥१॥
नाम घोकी कोली वाल्हा । दोष जाहला संहारा ॥२॥
नामें परीक्षिती उद्धरिला मुक्त जाहला सर्वांथीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम । भवतारक निष्काम ॥४॥
१२०८
नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठपंथा । नामें पशु तो तत्त्वता । उद्धरिला गजेंद्र ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । जगीं सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥
नामें तरला कोळी वाल्हा । करा नामाचा गलबला । नामें एका जनार्दनीं धाला । कृत्यकृत झाला संसार ॥३॥
१२०९
उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥१॥
तेही तरले एका नामें । काय उपमें आन देऊं ॥२॥
एका जनार्दनीं नाम । गातां सकाम मुक्ति जोडे ॥३॥
१२१०
अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती ॥१॥
तोचि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥
तेणें त्रिभुवनीं सत्ता । उद्धरती पतिता अनायासें ॥३॥
एका जनार्दनीं गाजली हांक । नाम दाहक पापांसी ॥४॥
१२११
नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें ॥१॥
घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनीं वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥
१२१२
भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥
धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥
संकटीं सुखात नाम सदा गाय । न विसंबे देवराया क्षण एक ॥३॥
एका जनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरीं ॥४॥
१२१३
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥
धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥
उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखीं ॥३॥
नामापरतें आन । त्यासी नाहीं पैं साधन ॥४॥
एका जनार्दनीं नामें गाय । त्यांचे वंदितसे पाय ॥५॥
१२१४
जयामुखीं नाममंत्र । तया जग हें पवित्र ॥१॥
नाम वंदें ज्याची वाचा । देव हृदयीं वसे साचा ॥२॥
नामीं प्रीति अखंड ज्यासी । मोक्ष तया करी वसे ॥३॥
एका जनार्दनीं नाम । हेंचि चैतन्य निजधाम ॥४॥
१२१५
अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥
आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥
एका जनार्दनीं नामाची ही थोरी । होतसे बोहरी केली पापा ॥३॥
१२१६
अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥
धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥
न लगे उपवासकरणे अष्टांग । न लगे नानायोग साधनें तीं ॥३॥
एका जनार्दनीं नामामृत सार । उतरले पैलपार वैष्णव जन ॥४॥
१२१७
कलियुगी नाम तारक । दुजें होय दुःखदायक ॥१॥
पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥
अठरा वर्ण याती । नामें पावनचि होती ॥३॥
न करा आळस क्षणभरी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥
१२१८
नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी ॥१॥
प्रपंचमृगजळीं गुंतुं नको वायां । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥
सोईरे धाईरे वायांचि हांवभरी । पाडिती निर्धारी भोंवरजाळीं ॥३॥
एका जनार्दनीं संसाराचा छंद । वायांक मतिमंद भुललासे ॥४॥
१२१९
प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा ॥१॥
नामें तरलें पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकीं ॥२॥
व्यास शुकादिक पावन । नामेंचिक पावले बहुमान ॥३॥
वाल्हा कोली अजामेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥
एका जनार्दनीं नाम पावन । पातकी उद्धरीले परिपूर्ण ॥५॥
१२२०
असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं ॥१॥
जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥
कुळासी तो नाहीं काज । नाम वदतांचि निज ॥३॥
नाम पावन हे जनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥