नाममहिमा - अभंग ११८१ ते १२००
११८१
नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥
देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥
द्वैत अद्वैत गेलेंक नेणें हारपलें । जाणणें तें गेलें जाणते ठायीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम तें अनाम । सर्वोत्तम नाम सर्वा ठायीं ॥४॥
११८२
दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां ॥१॥
नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥
आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनीं नाम । तरले तरती निष्काम ॥४॥
११८३
नामें पावन इये लोकीं । नामें पावन परलोकीं । नाम सदा ज्याचें मुखीं । धन्य तो नर संसारीं ॥१॥
नामें कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदतां ॥२॥
नाम गातां सुख वाटे । प्रेमे प्रेम तें कोंदाटें । एका जनार्दनीं भेटें । नाम गातां निश्चयें ॥३॥
११८४
नामें घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगतीं । दृढभावें आठवितां ॥१॥
म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥
मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा । एका जनार्दनीं सर्वेशा । नाम जपे अंतरीं ॥३॥
११८५
नामे प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भकंद । नाम तारक निर्धार ॥१॥
हेंचि मना दृढ धरीं । वांया नको पंडु फेरी । तेणें होसी हाव भरी । मग पतनीं पडशील ॥२॥
म्हणे एका जनार्दनीं । नामें तरती अधम जन । नामें होय प्राप्त पेणें । वैकुंठचि निर्धारें ॥३॥
११८६
नामें तारिले पातकी । नाम थोर तिहीं लोकीं । नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कलीं तारक ॥१॥
नको जाऊं वनांतरीं । रानीं वनीं आणि डोंगरी । बैसोनियां करीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥
नामें साधलें साधन । तुटले बहुतांचे बंधन । एका जनार्दनीं शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥
११८७
जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥
एक नाम सत्य सार । वाउगा पसार शीण तो ॥२॥
नामें प्राप्त ब्रह्मापद । नामें देह होय गोविंद ॥३॥
एका जनार्दनीं नाम । सर्व निरसे क्रोधकाम ॥४॥
११८८
सदा नामें घडे आचार । नामें साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥
शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठवितां ॥२॥
नामें साधे अष्टांग पवन । नामें साधे पंचाग्रि धूम्रपान । नामें एका जनार्दनीं भजन । नामें पावन देह होय ॥३॥
११८९
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥
चहुं वाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आम्ही गाऊं सदोदित । सोपें नाम ॥२॥
ऋद्धिसिद्धि धांवे पायीं । मुक्तिसे तो अवसर नाहीं । मुक्तीचा तो उपाय काहीं । हरिदास ॥३॥
एका जनार्दनीं भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥
११९०
श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिकर । दरुशनें सांगती आधार । वाचे नाम उच्चारा ॥१॥
तारक जगीं हें नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥
म्हणोनि धरिलें शिवें कंठीं । तेणें हळाहळ शमलें पोटीं । एका जनार्दनी गुह्मा गोष्टी । गिरजेंप्रति अनुवाद ॥३॥
११९१
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥
शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं संताचें हे मत । नामे तरती पतित असंख्यात ॥३॥
११९२
कष्ट न करितां योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कां बा ॥१॥
नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जोडे ॥२॥
एका जनार्दनीं नको योगयाग । म्हणावा श्रीरंग वाचे सदा ॥३॥
११९३
योगयाग तप व्रतें आचरितां । नाम सोपें गातांसर्व जोडें ॥१॥
पाहोनियां प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥
एका जनार्दनीं नामाचा महिमा । वर्णितां उपरमा शेष आला ॥३॥
११९४
करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥
नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥
नामापरतां दुजा मंत्र । नाहींनाहीं धुंडितां शास्त्र ॥३॥
एका जनार्दनीं नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥
११९५
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥
सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥
अखंड वैराग्य बाणलें अंगी । म्हणोनि वंद्य सर्वा जगीं ॥३॥
एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचे ॥४॥
११९६
कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥
ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥
हरिचिया दासा साचें । भय नाहीं कळिकाळाचें ॥३॥
एका जनार्दनीं काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥
११९७
जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥
नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥
नामासाठी मागें धावें । इच्छिअलें तेणे पुरवावें ॥३॥
यातीकुळ तयाचें । न पाहे कांही सांचें ॥४॥
वर्णाची तों चाड नाहीं । नाम गातां उभा नाहीं ॥५॥
एका जनार्दनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ॥६॥
११९८
आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥
ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥
एका जनार्दनीं नाम । सोपें सोपें हो सुगम । तरावया आन नाहीं धाम । नामावांचुन सर्वथा ॥३॥
११९९
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥
एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरुनी ॥२॥
एकाचि उगेचि धरुनि आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनीं त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ॥३॥
१२००
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥
करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥
करी नीच काम नाहीं थोरपण । खाय भाजींचें आनंदें पान । तृप्त होय एका जनार्दनीं । तेणें समाधान होतसें ॥३॥