रामनाममहिमा - अभंग ७९१ ते ८००
७९१
संकल्पे विकल्पें रामानाम घेतां । कोटीकुळें तत्त्वतां उद्धरती ॥१॥
अमृत सहजीं थेंब मुखी पडे । मृत्युचें सांकडे चुके जेवीं ॥२॥
तैशी परी होय रामनामें स्थिती । समाधि विश्रांति घर रिघे ॥३॥
एका जनार्दनीं रामनाम सार । न लगे विचार दुजा येथें ॥४॥
७९२
रामनामाचेनि बळें । ब्रह्मा सर्वत्रैक मिळे ॥१॥
रामनामाची ही ख्याती । कर्माकर्माची निवृत्ति ॥२॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । म्हणतां प्रगटे परमानंद ॥३॥
जों जों उच्चारी नाम । तों तों प्रगटे मेघःशाम ॥४॥
व्रत तप यज्ञ दान । रामनामासी साधन ॥५॥
एका जनार्दनीं कीर्तीं । सहज चैतन्य विश्रांती ॥६॥
७९३
सकळ सुख रामनामीं आहे । परमामृत ध्याये रामनाम ॥१॥
नामें न घडे कर्म नामें होय निष्कर्म । नाम परब्रह्मा सार नाम ॥२॥
नामें होय मुक्ति नामें होय भुक्ती । नामें स्वर्गप्राप्ति जपतीया ॥३॥
नामें होय बोध नामें जाय बाध । एका जनार्दनीं छंद नाम गातां ॥४॥
७९४
जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपें नाम श्रीहरी सर्वकाळ ॥१॥
साधन आणीक न लगे सकळ ॥२॥
रामनाम निखळ जपें आधीं ॥३॥
पापाचे पर्वत छेदी नाम व्रज । हाचि पैं निर्धार ऋषीश्वर ॥४॥
एका जनार्दनीं नाम निजधीर । पावन साचार रामनाम ॥५॥
७९५
मुखें गावें नाम । तेणें पुरें सर्व काम ॥१॥
सर्व साधनांचें सार । तेणें पावे पैलपार ॥२॥
नामें बहुत तारिलें । महा दोषी उद्धरिलें ॥३॥
रामनाम बहु श्रेष्ठ । घेतां न लगती कष्ट ॥४॥
नाम नित्य ज्याचे मुखीं । तो जाणावा सर्वसुखी ॥५॥
रामनाम हेंसी सार । सत्य जाणा हानिर्धार ॥६॥
रामनाम निरसी ताप । पापें जाती आपेआप ॥७॥
रामनाम जो उच्चारी । सुख पावे तो संसारीं ॥८॥
एका जनार्दनीं नाम । पाववितें परमधाम ॥९॥
७९६
सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥
धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥
जन्मजन्मांतरींचें सुकृत पदरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनीं सदा जपे नाम । तो देह उत्तम इहलोकीं ॥४॥
७९७
सकळ साधितां साधन । नामावांचुन नाहीं पावन ॥१॥
पहा विचारुनि ग्रंथ । नामें तरले असंख्यात ॥२॥
दोषी सदोषियां उद्धार । रामनामें पैं साचार ॥३॥
कोटी कुळें तारी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥
७९८
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामीं नाचे ॥१॥
सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥
सदा नामीं ज्याचें मन । जन नोहे जनार्दन ॥३॥
नामें रंगे ज्याची वाणी । एका जनार्दनीं तोचि जनीं ॥४॥
७९९
राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥
सदोदित नाम जपे श्रीरामाचें । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥
राम राम वदे सादा सर्वकाळं । काळाचा तो काळ रामनामें ॥३॥
राम वदे ध्यानीं राम वदे मनीं । एका जनार्दनीं राम वदे ॥४॥
८००
कोटी जन्मांचि येरझारी । तें तो हरी रामनाम ॥१॥
तें तुं वाचे सुगम वदें रामनाम आणीक नको श्रम करुं वायां ॥२॥
श्रम केलिया पडसी सांकडीं । जन्ममरण बेडी तोडी नाम ॥३॥
संतसमागम भावें करी भक्ति । एका जनार्दनीं वस्ती नामीं करी ॥४॥