विठ्ठलनाममहिमा - अभंग ७०१ ते ७१०
७०१
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥
हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥
रुप देखतां आनंद । जन्म कंद तुटे तेणें ॥३॥
एका जनार्दनीं मन । जडोन ठेलें चरणीं ॥४॥
७०२
ऐका ऐका वचन माझें । तुम्हीं वदा विठ्ठलवाचें ॥१॥
नामापरतें साधन नाहीं । वेदशास्त्रें देती ग्वाहीं॥२॥
चार वेद सहा शास्त्र । अवघ नामाचा पसर ॥३॥
अठरा पुराणांचे पोटी । नामेंविण नाहीं गोष्टी ॥४॥
नामें तारिलें पातकी । मुक्त झालें इहलोंकी ॥५॥
अजामेळ तारिला । वाल्हा कोळी ऋषी केला ॥६॥
गणिका नेली निजपदा । रमनाम वादे एकदां ॥७॥
ऐसीं नामजी ती थोरी । पुतना तारिली निर्धरीं ॥८॥
आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥९॥
७०३
अवघे दैवतां नका पाहुं । आदरें आवडी विठ्ठल गाउं ॥१॥
अवघे पोटाचे भिकारी । हिंडीविती दारोदारीं ॥२॥
अवघे तें वायं जाय । काय धरुनि त्याचें पाय ॥३॥
अपल्या पोटा जें रडतें । आणिकातें काय देतें ॥४॥
मागुन खाती जना । काय पुरविती वासना ॥५॥
ऐसियासी देव म्हणणें । सदा आम्हां लाजिरवाणें ॥६॥
आम्हीं आणिकां शरण जातां । लाज लागेल सर्वथा ॥७॥
ऐसें नका येऊ देऊं मना । शरण एका जनार्दनीं ॥८॥
७०४
आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय ॥१॥
विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥
त्याविण आणिक दैवत पै नाहीं । आणिक प्रवाहि गुंतुं नको ॥३॥
सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एक जनार्दनीं भ्रांती काढी काढी ॥४॥
७०५
काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥
सर्वभावें शरण विठठलासी जाई । ठायीचाचि ठायीं निवारिल ॥२॥
देह गेह माझें म्हणणें हें दुजें । सर्व विठ्ठलाराजे समपीं तुं ॥३॥
एका जनार्दनी करी आठवण । चिंती तुं पावन परब्रह्मा ॥४॥
७०६
जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नाराय्ण इतुका जप ॥१॥
तुटेल बंधन खुंटेल पतन । जप जनार्दन एकविध ॥२॥
एका जनार्दनें नको आणीक बोल । वाचेसी विठ्ठल जपे आधीं ॥३॥
७०७
दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठ्ल ॥१॥
मग तुम्हां काय उणें । होय पेणें वैकुंठ ॥२॥
धरा सत्यसमागम आवडीं । कीर्तनपरवडीं नाचावें ॥३॥
एका जनार्दनीं श्रोतें । एकात्मतें पावाल ॥४॥
७०८
बहुतांची मतांतरें तीं टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दें कां ॥१॥
नव्हें तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तु गोविंदा प्रेमभरीत ॥२॥
जनार्दनाचा एका लाहुन चरणीं । बोलतसे वाणी करूणाभरीत ॥३॥
७०९
धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥
प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥
तरती तरले हाचि भरंवसा । एका जनार्दनीं ठसा विठ्ठलनाम ॥३॥
७१०
जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥
न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥
भलतिया परी विठ्ठलासी गाये । सुखा उणें काय तुजाला आहे ॥३॥
जन्ममरणा तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिद्धि पायां लागे ॥४॥
एका जनार्दनीं जपतां विठ्ठल । न लगे तया मोल धन कांहीं ॥५॥