पंढरी माहात्म्य - अभंग ४११ ते ४२०
४११
धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥
म्हणोनि नेमें वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥
पुडलीकां दंडवत । पाहाती दैवत श्रीविठ्ठल ॥३॥
काला करती गोपाळापुरी । मिळोनि हरी सवंगडे ॥४॥
तया हरिदासाचे रजःकण शरण एका जनार्दन ॥५॥
४१२
तयाचे संगती अपार । विश्रांती घर पंढरी ॥१॥
म्हणोनि वारकारी भावें । जाती हावें पंढरीसी ॥२॥
योगयाईं जो न संपडे । तो पुंडलिका पुढें उभा असे ॥३॥
शोभे चंद्रभागा उत्तम । धन्य जन्म जाती तेथें ॥४॥
घेऊनि आवडी माळ बुका । वाहती फुका विठ्ठला ॥५॥
एका जनार्दनीं भावें । हेंचि मागणें मज द्यावें ॥६॥
४१३
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥
जाय नेमें पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥
आषाढी कार्तिकी । सदां नाम गाय मुर्खीं ॥३॥
एका जनार्दनीं करी वारी । धन्य तोचि बा संसारीं ॥४॥
४१४
भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये ॥१॥
करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥
आळविणे मृदंग मोहरी । गरुड टके शोभती करीं ॥३॥
करती आनंदे नामघोष । नाहीं आंस पायांवीण ॥४॥
एका जनार्दनीं कौतुकें । नाचतु सुखें भक्तराणा ॥५॥
४१५
घडती पुण्याचियां रासी । जे पंढरीसी जाती नेमे ॥१॥
घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरुशन पुडंलीक ॥२॥
पाहता विटेवरी जगदीश । पुराणपुरुष व्यापक ॥३॥
वारकारी गाती सदा । प्रेमें गोविंदा आळविती ॥४॥
तया स्थळीं मज ठेवा । आठवा जनीं जनार्दन ॥५॥
४१६
पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ॥१॥
सांडुनिया विठ्ठल राजा । आणिक देव नाहीं दुजा ॥२॥
सांडुनिया चंद्रभागा । कोणा जाय आणीके गंगा ॥३॥
सांडुनिया पुंडलीका । कोण आहें आणीक सखा ॥४॥
साडोनिया वेणुनाद । कोन आहे थोर पद ॥५॥
एका जनार्दनीं भाव । अवघा विठ्ठलाचि देव ॥६॥
४१७
गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥
ऐसा आनंड गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवंचे वारकरी ॥२॥
आषाढी कार्तिकी नित्य नेमें जाण । जाउनी भीवरे करिताती स्नान ॥३॥
घेतां दरुशन पुंडलिकाचे भेटी । एका जनार्दनी पुण्य न समाये सृष्टी ॥४॥
४१८
देव संत दोन्हीं एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥
ती हे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥
येती वारकारी ।आनंदे नाचती गजरीं ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । पुंडलिकें दाखविला निका ॥४॥
४१९
देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥
करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥
दिंडी जागरण एकादशीं । क्षीरपती द्वादशी करिताती आवडीसी । भक्त मिळोनी सकळ ॥३॥
मिळतां क्षीरापती शेष । तेणें सुख सुरवरास । एका जनार्दनीं दास । वैष्णवांचा निर्धारें ॥४॥
४२०
मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं ॥१॥
वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥
एका जनार्दनी कीर्तनीं । नाचतसे शारंगपाणी ॥३॥