संग्रह ७
हिरव्या चोळीयिला मी ग रुपया सारियेला
चोळी गर्भीण नारीयीला ।
पहिल्यांदा गरभीण करती केळाच्या केळवडया
जाती गर्भीणीच्या वाडया ।
सोनं बी झालं स्वस्त सव्वा रुपया झालं तोळा
माझी ग बाळाबाई हौशा कंथाला दावी गळा ।
आला जावाई पाव्हणा शेजी म्हणती आता कसं
हैती साठयाला अनारसं ।
साखरेचे लाडू परात भरुना
आली सासर करुनी उषाताई ।
शिव शिंप्या चोळी चोळी आखूड बाह्याची
लेक सासरी जायाची ।
शिव शिंप्या चोळी मोती देते मी पसापसा
चोळी जायाची दूरदेशी ।
शिव शिंप्या चोळी काढ कसूदा कोथिंबीरी
उषाताई ती किती गोरी ।
सावळ्या सुरतीवर मोडया बायांचा ताटवा
सावळा भाऊराया भरजानीचा नटवा ।
लावणीचा आंबा कुणी तोडीला पत्ता लावा
मामाच्या लेकीसाठी भाच्या बाळांनी केला दावा ।
सोनसळी गहू बाई मी घंगाळी वलवीते
धाकल्या सावळ्याला भाऊबीजेला बोलवीते ।
साती सुगरीनी भट्टी बिगाडली लाडवाची
नंद कामिनी सुगरण आता येऊ दे मालकीची ।
उजेड पडला ग वाटीपरास ताटीचा
कंत जेवितो भाचीचा ।
दिव्याला भरायानं घाली समई जोडवात
गुज बोलाया गेली रात ।
पोटीच्या परास ग मला पुतण्याची गोडी
परान माजा गेला काशीला पिंड सोडी ।
दिवाळीच्या दिशी दिवा करीते कनकीचा
बया माज्या गौळणीचा ल्योक ववाळी जानकीचा ।
सोनसळी गहू सोजी काढीते नकुल्याला
भाऊबीज करीते मी माझ्या ग धाकल्याला ।
मावळणीच्या घरी भाचा केळीन पाणी आणी
सखी मेव्हनी केली राणी ।
बारीक सदर्याचा पंख उडीतो भराभरा
बसला सायकलीवरी वसंत माजा हिरा ।
दिष्ट नि झाली म्हनू माज्या टाळूचा गजर्याला
चांदीची बटण तुज्या रेशमी सदर्याला ।
लुगडयाची घडी माज्या तळातात झाकली
भैन भावात एकली ।