संग्रह ३९
भावज गुजरीचं तिचं बोलनं ठसक्याचं
फूल सुकलं सबज्याचं ।
जातीसाठी माती खावावी लवनाची
पिता माझ्या दौलताची ऊंच कुळी रावणाची ।
नंनद आक्काबाइ पाया पडून माजं घ्यावं
हळदी कुंकवाचं एक वचन मला द्यावं ।
मायबाप म्हणीतो लेक वंशाला नसावी
पार्वतीबाई बोल दुनिया कशानं वसावी ।
दिवाळीची चोळी भाऊ बिजेच्या कोयर्या
हावशा बंदुराया बाकी राहिली सोयर्या ।
माझ्या धरला पावईना जन्म दिलेला माझा पिता
तांब्या तुपाचा केला रिता ।
लाडकी येवढी लेक गावामंदी तिला दिली
बारा सणांची बोली केली ।
तुझा माजा भाऊपणा तेला वर्ष झाली बारा
बया माझी गवळण तुजा सबुद आला न्यारा
मला सुटला उभा वारा ।
तुझा माझा भाऊपणा एका तिळात माझा वाटा
माझी तू सोनूबाई जन वार्याच्या बांधी मोटा ।
तांबडया मंदीलाचा रुमाल सोप्याच्या खुंटीला
माझा तो बंदुराया आला उमराव भेटीला ।
आंबारीचा हात्ती माझ्या वाडयाला थटला
बाई माझ्या त्या गवळणीनं काय जिन्नस पाठविला ।
बया माजीनं पाठविल्या गुळाच्या गूळपोळ्या
आत उघबीडूनी पहाती खुतनीच्या नव्या चोळ्या ।
भावज गुजरीचं तिचं बोलनं राळा रुकी
माझा तो बंदूराया चाफा सुकला एकाएकी ।
उन्हाळा पावसाळा केळीबाईला गारईवा
कंताच्या जिवावरी नाही कुणाची परईवा ।
माझे तू मायभैनी गिरनीवरुन दोघी जाऊ
आपला बंदुराया गिरणीवरला हिरा पाहू ।
पाची पक्क्वान्नाचं ताट वर रुमाल झाकीला
बंदु माझ्याची पहाती वाट कोरेगावच्या स्टेशनाला ।
बहिण भावांचा मेळा बसला बसईरी
तान्ह्या माझ्या तू लाव समई लौकरी ।