संग्रह ९
माझ्या ग माहेरी मळ्यात लावला भुंडा ऊस
पिता माझा तो दौलत आल्या गेल्याला पाजी रस ।
माझ्या माहेरी ऊसाची ऊस सरी पानमळ्याची पायरी
पित्या माझ्याच्या जिवावरी दुनिया दिसती दुहेरी ।
माहेरी ग गेली मळ्यात आंबाडा लुकलूक
माय लेकींची शीण एक ।
माय माहेरी विचारी डोळं कशाच्या जिनसाचं
झाड डोंगरी फनसाचं ।
माहेरी ग गेली, डोळं लागलं असं कसम
माय मोजूनी धरी मासं ।
माझ्या ग माहेरी, पुढच्या सोप्याला हुती दाटी
माझ्या बंधूजीच्या कलेक्टर येती भेटी ।
माहेरी ग गेले म्हणू माझं लक्ष कुणीकडं
ताईता बंधूजीच्या हिरीकडं, चाफा चंदन दुईकडं ।
माझ्या ग माहेराचं, छत्री खाईन कोन येतं
बयाचं माझ्या बाळ, हिरा माणिक ढाळ देतो ।
माहेरी गेली, बंधूजी घेतो चोळी भावज गुजर विनी दोरा
बंधूच्या जिवावरी काय चांदनी तुझा तोरा ।
माहेर करता, उंच दुकानी जाऊ नका चोळी उगाक घेऊ नका
नंदा दिल्यात्या थोर लेका ।
माहेरा करता, पिता शिष्याच्या दुकानी भोळा राजा
उंच घडीला हात माझा ।
माहेर केलं, सया इचारित्या चोळी लुगडं भराचं
माझ्या ग बंधूजीचं नाव हाय हंबीराचं ।
सासर्याला जाती, गाडी भरली किराण्यानं
माझी तू लाडीबाई बंधू लुटीला इलाजानं ।
सासर्याला जाती घोडं लागलं चढणीला
हाक मारिती गडणीला, चोळी राहिली वळणीला ।
माझ्या ग माहेरी पाताळ वाळतं परसदारी
पिता माझ्या त्या दौलताला नाव शोभतं कारभारी ।
माहेर केलं म्हणू पातळाची घडी तळहाताएवढी
पिता माझ्या त्या दौलताची हावस मनाची केवढी ।
वैराळ भरी चुडा या ग बायांनो कालाकिता
पिता माझ्याच्या जिवावरी राजवरकीची काय कथा ।
वैराळ भरी चुडा तुला मोलाची काय चिंता
ताईता बंधू माझा धनी जामीन दिला होता ।
सासरी जाय कन्या, माता इच्यारी का ग लेकी आवघड
शेजी त्या बोलत्याती बाया तुझं मन किती भाबडं ।
माहेर गावाच्या पारावरी, सभा कशाला जमली
हावशा बंधूजींनी हिरव्या शालूसाठी बनारसी तार केली ।