संग्रह १६
पहिल्यांदा गरभार कांत विचारी आडभींती
रानी म्हईने झाले किती ? ।
पैल्यांदा गरभार कांत विचारी गोटयायात
हौशा माजा कांत घाली अंजीर वटयायात ।
हिरव्या चोळीला ग बंदा रुपाया सारीयीला
माज्या त्या भैनाईला चोळी गर्भार नारीयीला ।
पैलांदा गर्भार तिला गर्भाची येती घेरी
चाफाचंदन माज्या दारी बसू सावली त्येच्या नारी ।
गर्भार नारीयीला तिला अन्नाची येती घान
हौशा भरतार देतो बघा सुपारी कातरुन ।
पैलांदा गर्भार डोळे लागले ताकायाचे
माजी ती सूनबाळ हाये लक्षण पुत्रायाचे ।
पैलांदा गर्भार डोळे लागले कारल्याचे
माजा ग बाळराज मळे धुंडीतो मैतराचे ।
पैलांदा गरबार डोळे लागती जिन्नसाचे
आणीतो बाळराज आंबे शेंदरी पाडायाचे ।
गर्भीण तू ग नारी नको करुस देवा देवा
देव मारुती ब्रह्मचारी नाडबंदी तो गेला गावा ।
सणामंदी सण आली पंचीम खेळायाची
माजी ती भैनाबाई वाट बगती मुराळ्याची ।
सांगून धाडीयीती आल्या गेल्याल्या मानसाला
बया माजीला म्हनाव येतो म्हनली गणपतीला ।
शिलंगनाला गेला हरी तिथं शिलंगनाची झाली दाटी
माज्या बंदुजीन बाई सोनं घातीलं माज्या ताटी ।
दिवाळसनादिशी बंधू अजून आला न्हाई
बंदु माजा म्हनी जोड ठुशाचा झाला न्हाई ।
दिवाळसनादिशी मी का ओवाळी गाईघाटा
माज्या त्या बंदुजीच्या हिश्शांत माजा वांटा ।
भाऊबीजेची काचोळी ही शीव शिंप्या तू परसदारी
माज्या तू बंदुराया येती दिवाळी कोनवारी ।
दिवाळसनादिशी भाऊबीजेच लुगडं
दार पित्याचं उघडं ।
बंदुजी पावना शेजी म्हनती कोन राजा
राजा नव्हं त्यो बंदु माजा ।
तांबडा मंदील ग बंदु गुंडीतो कवाकवा
येतो झुकत माज्या गावा ।
आला नि बला घेती हात पुरना मंदिलाला
ताईता बंदुजीला वाड लागली चंदनाला ।
माळ्याच्या मळ्यामंदी येसबंदाची काकयिरी
ताईता बंदुजीची टोपी लालाची झ्याक मारी ।