संग्रह ५९
सीता भावजई - पाय धुवून पाणी पेली
बापाजी राजानं - कोण्या अशीलाची केली ।
तोडया पैंजणाचा - आवाज येतो घाऊ घाऊ
सीता भावजई - घाली सासर्याला जेवूं ।
तोडया पैंजणाची - कोण वाडा उतरती
बापाजीची सून - दिवा मारुतीला नेती ।
सासर्याला सून - आवडली मनातून
तोडे पायजिण्या - हळू उतर जिन्यातून ।
सीता भावजई - कुंखाची लाव चिरी
तुह्या चिरीसाठी - नौस केले नानापरी ।
सीता भावजई - कुंखू लाव कोरणीचं
पाठीचा भाऊ मव्हा - सोनं मह्या मोरणीचं ।
सीता भावजई - कुंखू लाव ग टिकला
अंजिराच्या बागा - बंधू राखतो एकला ।
सीता भावजई - कुंखू लाव पिंपळपान
तुह्या कुंखावरी - दादा रंगील्याचं ध्यान ।
बारा बयलाचं शेण - हाये भागेरथी सून
साखळी भावजई - न्हाई पडू देत उणं ।
शिण्याच्या साताला - चोळ्या फाडी उडदाणी
रंगीळा दादा मव्हा - वैनी सांगी एक शिणी ।
दुरुन पुसते - मव्हा सोयरा सुखाचा
सीता भावजईला - पुडा धाडते कुंखाचा ।
मपले आऊख - मह्या बंधवाला देते
हळदीवरी कुंखू - सीता भावजई लेते ।
सीता भावजई - नको पडू मह्या पाया
वडील भाऊराया - आशीर्वाद जातो वाया ।
सीता भावजई - जशी गुलालाची पुडी
रंगीला दादा मव्हा - अभीर तिच्या चडी ।
पातळ पुतळ - कंबर मुठीच्या मोजाची
भाऊच्या ग मह्या - राणी चतुर भुजाची ।
सीता भावजई - तुहा मला राग येतो
रंगीला दादा मव्हा - हातानं पाणी घेतो ।
भाऊ घेतो चोळी - भावजई गुमानात
दोघांच्या इचारानं - चोळी बांधी रुमालात ।
भाऊ घेतो चोळी - भावजय डोळे मोडी
चोळाची काय गोडी - शिंपीदादा घाल घडी ।
बोलला ग भाऊ - बह्यणीला कर रोटी
बोलली भावजय - गहू जमीनीच्या पोटी ।
भाई राजस ग माझा - समुद्र जायफळ
सावळी भावजय - लवंग मोठी आगजाळ ।
सीता भावजई - तुह्या भावामंधी मळ ।
पाटीचा दादा मव्हा - चांद कसा निरमळ
सीता भावजई - हाय कोणाची कोण
भाऊच्या करीता - तिला दिलं मोठेपण ।
सीता भावजई - उचल उष्टे दुरण
जेऊनिया गेले - तुहे नंदई बाम्हण ।
सीता भावजई - उचल उष्टया ताम्हणी
जेऊनिया गेल्या - तुह्या नणंदा बाम्हणी ।
नणंदा भावजया - हैती एका ग चालीच्या
लोक ग बोलती - लेकी कोण्या मावलीच्या ।