संग्रह ७९
गेली वान्याच्या दुकानात चिकनी सुपारी चिकयीट
चुना कळीचा तिकयीट ।
माज्या बंदूचा ग ईडा रंगना देते कोकणी काळा कात
गेला बयाला बोलवीत भैन असावी जलमात ।
बंदुजी पावईना शेजीबाई ही खुनवीती
माज्या बंदूच्या भोजनाला लाडू बुंदीचं बनवीती ।
माज्या ग दारायात निळ्या घोडीचा पायबंद
हावशा बंदु माजा राती आलाया गोपीचंद ।
लेका परायास सून करावी गोरीपान
माज्या बाळायाचं ऐन्या शेजारी दरपान ।
आंब्याची आंबराई केळीचं शिकरन
मावली बाई माजी जेवू वाडीते सुगरीन ।
भरल्या बाजारात शिंप्या दादाची लंका लाल
मावलीबाई माजी उबी पेटला मकमल ।
नार लेनं लेती ईस पुतळ्या कारली
हौशा कंताला मागयीती राम अवतार डोरली ।
सुखाचा भरतार दुःखाचं न्हाई कुनी
आला मावचा क्रिष्णदेव आला बैरागी होऊनी ।
पुतराचं मुख, मुख पहा त्या' त्या बहुजनी
सुनमुख हे सोभागिनी ।
चांगल्या मनुष्याची दुरुनी घ्यावी बला
मुरख्या मनुष्याला वाट सोडूनी द्यावी त्येला ।
तुळस पतिव्रता कशी रामाला कळयिली
वार्या सजनानं त्येनं मंजुळा हालविली ।
पिकला उंबयीर सरवा डोंगूर दरवळीतू
वानीचा माजा बंदु पाड कशाचा इच्यारीतु ।
जोडव्याचा पायपाय टाकीती फुलूनी
माजी भैनाबाई कुन्या गर्तीची मालिनी ।
डोंगर कटारीला हिरव्या शालूची कोन येती
भाची मामांनी न्हेली हुती ।
डोंगर कटारीला हिरव्या शालूच्या दोगी बाया
बाळी माजीला किती सांगू हाईत्या नणंद भावजया ।
बंदु तुज्या जिवासाठी उभी राहिली वाळवंटी
वानीचा माजा बंदु तू का डेरा मी र्हाऊयिटी ।
समोरल्या सोप्यां चौकट सायासाची
माज्या बंदुजीची रानी वागिती गभिसाची ।
बंदुजा घेतो चोळी दंड भरुनी रेशमाची
बया विचारीती भैन कुन्याया वकीलाची ।
तुजी वाट पहाता बाई शिनल्या माज्या कोरा
बाईचा माज्या बाळ कदी भेटल श्यास म्होरा ।
दुबळं माजं पन जन लोकाला जाहियीरु
वानीचं माज बंदु हंडा मोलाचा भाईरु ।
समोरल्या सोप्यां पंक्ति पडल्या चक्रभुजा
भैना बाळीला किती सांगू हिरव्या शालूचा कंत तुजा ।
गावाला गेला म्हनूं माज्या बुगबीडीचा रवा
ताईता बंदु माजा गावा गेल्याला यील कवा ।
लेन्या नेसन्याची नको बसू तू शेजाराला
वानीची माज्या बाळं जर माज्या या पदराला ।
मोटं मोटं मोती, मोती छ्त्रींच्या झारलीला
वानीचा माझा बंधु ऊन लागीतं गवन्याराला ।
पाटानं जातं पानी उसा संगट जाईला
सुक लेकाच्या आईला ।