संग्रह ७६
आम्ही चौघी भैनी एका रंगाच्या साडया नेसू
ऊंच पायरीवर बसू आम्ही थोरांच्या लेकी दिसू ।
माझ्या जीवाला भारी जड खडी साखर घोटयीना
बंधु उशाचा उठयीना पाणी डोळ्याचं तुटयीना ।
काय पाटच्या पार्यामंदी दिस उगवुनी दारी आला
येवढया हळदी कुंकवाला म्या का पदर पसरीला ।
सासू सासयीरा आंबा लावून दिला त्यांनी
बाळ माझ्याला दिली लेक आंबा उत्तम पाहूयीनी ।
उन्हाच्या रखामंदी गाडी जुंपली रेडयायाची
जोती सागर देवायांनी दिली दवड घोडयायाची ।
उन्हाळ्याचं ऊन काळ्या खडकाची होत लाही
हौवशा भ्रताराची गोर्यापणाची गत कायी ।
समोर सोप्यावर कुणी ठेवीला तांब्यापेला
बंधु वकील पाणी प्याला ।
उन्हाच्या रखामध्ये कुठं निघालं माझं सोनं
कवळ्या छातीला लागं ऊन घाम पुसीते पदरानं ।
वैराळ सादवितो ल्याग बायांनो नवी तर्हा
बंधु निजला जागा करा ।
वैराळ सादवितो, तो का सादवी वैल्यावेशी
बया राहिली परदेशी छंद सांगू मी कुणापाशी ।
बंधुजीचं बाळ माझं मला म्हणीतो आत्या आक्का
कडी घेऊनी घेते मुका ।
जोंधळ्या परायास वाढवते मी ग तूरी
लेका परायास लेक मला हाय प्यारी ।
थोरलं मोठं जातं मला बघून पळईतं
बयाचं दूध माझ्या मनगटी खेळईतं ।
कामामधी काम दळण अवघड
गाण्याच्या नादावर ओढावा दगड ।
माहेरच्या वाटे कोन चालतो तोलाचा
हौशा बंधू माझा हिरा झळके मोलाचा ।
बंधुजी पावईनं येताचं गाजतात
घोडीचं घासदाणं, माझ्या घंगाळी भिजतात ।
आला बंधूजी पावईना, माझ्या जावाल धगा धगा
शिंगी अवकाळ नवी जागा ।
पिवळी पितांबर मला पुशितो सारा गाव
सावळा बंधुराज म्यांग लुटीला बाजीराव ।
पिकलं उंबीयीरं सारा डोंगर दरवळतो
नटवा बंधु माजा पाड कशाचा विचारतो ।
तुज्या जीवासाठी जीव माझा हार्या हुर्या
का म्हणून सुकलास माझ्या शेतीच्या राजगीर्या ।
सारविल्या भींतीवर काढते चित्तार
बंधूचं बहिणीला आलया पत्तार ।
नदीच्या काठायाला बेट फुटतं उन्हाळ्याचं
माझ्या हुरद्यात फुलतं माह्यार जिव्हाळ्याचं ।
सुकमार माझी बाई का लागली रडायाला
कुण्या ग पापिय नं लाविली दळायाला ।
सासू का सासर्यानं धाकल्या ननंदेनं
लावली दळायाला थोरल्या जावेनं ।
वढना जड जातं हालना जड तळी
घामेजली माझी बाई फुलात चाफेकळी ।