संग्रह ९०
नणंद-भावजा काय बोलल्या कोनामंदी
विहिनी व्हायचं मनामंदी
कपाळीचं कुंकू घामानं रंगियलं
सासू माझ्या त्या मालणीचं फूल जाईचं चांगलं
हौसंचा भरतार हौस करीता राहीना
कोल्हापुरी डोरल्याचा साज खिशांत माईना
पहिली ओवी गाते बापाजी चातुराला
माऊलीचं नां घेताःशीण मनींचा उतरला
माझ्या चुडियाचं सोनं काय पिवळं हडूळ
चुलत्या बापाजीनं केली पारख वाढूळ
सासरला जाती संगं पालखी बारा भुई
बापाजीनं माझ्या दिली आंदण तानी गाई
भुकेलं तान्हेलं मला कोण ग म्हणील
माय माझी एक तोंड कोमेजं जाणील
आई म्हणू आई तिच्या इकतं गोड काई
साखरबाईला कडूपणाचा लेश नाही
आला घरास मुराळी मला बाई ठावं नाही
नेणत्या बंधवाचा शेला वार्यानं झोकं खाई
अंतरीचं गूज बंधु सांगत खाली बस
भिकबाळीचं तुझ्या मोती माझ्या डोरल्या लाव घस
ऊंची ऊंची चोळ्या जावा लेत्यात शेजारला
नेणत्या माझ्या भावा चल बंधवा बाजाराला
पाया पडू आली कोण नारंग्या पदराची
नेणंत्या बंधवाची राणी प्रताप पवाराची
पिकला उंबर, शेंडा-बुडका लालेलाल
नेणंता बंधू बोलं, भैणी चौथाई घ्याया चल
तुझी चौथाई तुझी तुला एका चोळीची आशा मला
दूरच्या देशाची काय कळंना भावना
सांगून धाडिते कंता धाडावा पाव्हणा
सांगून धाडिते लखोटयामंदी चिठ्ठी
नेणंती माझे भैणी कंतासहित यावे भेटी
विटयाच्या वाटंनं डाक टपाल धावा घेतं
नेणंत्या बहिणीचं खुशालीचं पत्र येतं
नाही कशाची आशा मला; नाही कशाची मी आसुसी
सुखी असावं माहेर मी ग त्यातच संतुषी
गेले कोण्या गावी भाऊ माझे राईरंद
पुरवीती छंद वेळ्या खाली बाजूबंद
गावाच्या गावात भाऊ बहिणीशी बोलेना
आस्तुरीच्या पुढे त्याचा विलाज चालेना
खेडयाच्या गावात हंडे, गंगाळी वाजती
भाऊ माझे माणिकराव इथे गवळी नांद्ती
किती हाका मारु भाऊ डोंगर धरुनी
मिरगाचा पाणी लवण चालले भरुनी
जिला नाही भाऊ तिने गुरुभाऊ केला
मांडवाच्या दारी अहेर चुनडीचा नेला
मांडवाच्या दारी काय नेसू बाई
नादारीचे कुई भाऊ अजून आले न्हाई
भाऊ घेतो साडी भावजय आडी तेडी
भाऊ नको भारी साडी माझी सुखाची चुनडी