संग्रह २९
महादेवाच्या पिंडी बेल वाहिला जाता जाता
चुलता पंडित संगं होता ।
महादेवाच्या पिंडी फूल वाहिलं वडाचं
हात्तीच्या चुडयाचं सोनं दिडाच्या पाडयाचं ।
महादेवाच्या पिंडी बेल वाहिला तिकटीचा
बयाच्या जिवावरी न्हाई कुनाची परवचा ।
सोमवार दिशी बाई बाई आई लेकाची गहू दळी
नको निवदाला तुझी पोळी ।
सोमवार दिशी बाई आई लेकाची पाणी न्हाली
सदाशिवाला वर्दी गेली पूजा बेलाची ढासळली ।
महादेवाची पिंड कशानं ओली झाली
पुत्रासाठी मी सेवा केली ।
महादेवाच्या पिंडी बेल वाहिला असा कोणी
नटवा माझा बंधु पहिला पुत्र झाला त्यांनी ।
माझा तो बंधुराया वटी केली रुमालाची
पेट्टी पेरीतो इनामाची ।
पाटाचं पाणी सरळ सापावाणी
माझा तो बंदुराया ईमानी बापावाणी ।
नवस मी करीते बंधुला पुत्र व्हावा
भाचा मुरळी मला यावा ।
माझा तो भाऊराया नवरा मोतीयाचा घड
काय मागण्या तुमच्या चढ ।
जावेचा आला भाऊ काढीले सोनसळी गहू
दादा उपाशी नको जाऊ ।
नणंद आत्याबाई बाळ धरतो निरीयाला
मोती मागतो चुरीयाला ।
वर्हाड उतरीलं पानमळ्याच्या टिपरीखाली
नवरा सोन्याच्या छतरीखाली ।
बहिणीला बघू आले पुणे सातार तालुक्यात
बहिणा भिंगाच्या दरवाज्यात ।
बहिणीला बघू आले वीस मोटार तीस टांगा
बहिण आजोळा गेली सांगा ।
नंद कामीन भागीरती जाव गुजर धुरपती
दीर दाजीबा गणपती चांद सूख्या माजा पती ।
सकाळच्या पारी बाई मी लोटीते घरदार
पायी जोडवी भरदार ।
पाण्याला जाते नार तुझ्या घागरी लाल काई
नटबा बंधु माजा वरुन टाकतो फुलजाई ।
लेकाच्या आयीयीला तिला कशाची लाज लज्जा
उभा राहिली दरवाजा हाक मारती बाळराजा ।