बहिण-भाऊ 8
परंतु सर्वच भावजया वाईट नसतात. कधी भावजयाच मनाच्या थोर असतात व भाऊ उलट असतात. भावजयीचे कौतुक करायला नणंद तयार असते :
भावा ग परीस भावजय फार भली
कोणा अशीलाची केली वयनीबाई ॥
भावा ग परीस भावजय ग रतन
सोन्याच्या कारणें चिंधी करावी जतन ॥
कोणा कुलशीलवंताच्या घरची ही ? किती चांगली वागते. सोन्यासारखी आहे. माझा भाऊ म्हणजे फाटकी चिंधी. परंतु सोन्यासाठी ह्या चिंधीला जपले पाहिजे. लहानशी चिंधी सोन्याला सांभाळते. किती सुंदर दृष्टान्त ! भाऊ व भावजय यांचे परस्पर प्रेम पाहून बहिणीला धन्यता वाटते :
अतिप्रीत बहु प्रीतीची दोघेजण
विडा रंगे कातावीण भाईरायाचा ॥
इतर जगातल्या भावजया पाहिल्या म्हणजे स्वत:च्या भावजयीची किंमत कळते :
भावजयांमध्ये वहिनीबाई शांत
भाऊ माझे सूर्यकान्त उगवले ॥
भाऊ तेजस्वी, जरा प्रखर. परंतु वैनी अगदी शांत व सौम्य पाहून बहिणीला समाधान होते !
भावाचे वर्णन करताना बहिणीच्या वाणीत सारी सरस्वती जणू येऊन बसते. माझे भाऊ म्हणजे देवळातील निर्मळ आरसे, देवळातले अभंग खांब, देवळाजवळची शीतळ झाडे :
माझे दोघे भाऊ देवळाचे खांब
अभंग प्रेमरंग मला ठावें ॥
माझे दोघे भाऊ बिल्लोरी आरसे
देवळीं सरिसे लावीयेलें ॥
माझे दोघे भाऊ मला ते वाणीचे
देवाच्या दारींचे कडुलिंब ॥