मायलेकरे 36
माउली माउली कल्पवृक्षाची साउली
तान्हेबाळालागी दिली देवाजीने ४४१
माउली माउली देवा म्हणती साधुसंत
माउलीचा अंत कोण गाई ४४२
माउलीची सेवा कोण आणीक करील
सागराच्या पुढे कसे थिल्लर राहीन ४४३
देवाच्या मायेची माउली मूर्ती झाली
बाळासाठी ग रंगली भवपाशी ४४४
तान्हेबाळासाठी माउली ओव्या म्हणे
या ग माउलीच्यासाठी कोण करील कवने ४४५
आई आई अशी तान्हेबाळ हांक मारी
मिळाली स्तुति सारी माउलीये ४४६
माता रागावली बोले ना एक शब्द
कंठ झालासे सद्गद गोपूबाळाचा ४४७
शेजीला पुसतो माउली का बोलेना
दुखवीशी तिच्या मना घडीघडी ४४८
शेजीला पुसतो शेजी माय का रुसली
गोष्ट नाही तूं ऐकिली माउलीची ४४९
शेजी मला सांग आई प्रेमें कशी घेई
रडत उभा राही दीनवाणा ४५०
शेजी मला सांग कसे आईला हंसवावे
जाऊन मांडीवर बसावे एकाएकी ४५१
शेजी मला सांग कसे हसवूं माउलीला
घरी जाऊन डोळयांला तान्हेबाळा ४५२
शेजी मला सांग सुखवूं कशी माय
जाऊन धरी पाय दोन्ही हाती ४५३
शेजी मला सांग आईचा जावा राग
चरणी तिच्या लाग भक्तिभावे ४५४
जेवून आलास भूक इतक्यात कशी
आई तुझ्या हातच्या गे घासावीणे उपवासी ४५५
जेवून आलास पंगत होती मोठी
माउली तुझ्यावीण घांस जाईना गे पोटी ४५६
जेवून आलास काय होते लाडू वडे
मला नाही आई ठावें लक्ष होते तुझ्याकडे ४५७
जेवून आलास श्लोक कोणता म्हटला
आई तुला आठवून पूर डोळयाला लोटला ४५८
आई नको धाडू कुठे मला जेवायला
माझे ग पोट भरे तुझ्या पाहून मुखाला ४५९
आई नको धाडू कधी परक्याचे घरी
बये तुझ्या ग हातची गोड कोरडी भाकरी ४६०