सुंदर पत्रे 31
आता दिवस किती मोठे वाटतात. सात वाजले की संधिप्रकाश दिसत असतो. दिवस आणखी मोठे होत जातील व जूनमध्ये सर्वात मोठा दिवस येईल. परंतु सुधामाई, विषुववृत्ताजवळच्या प्रदेशात दिवस व रात्र नेहमीच समान. लहान दिवस, मोठा दिवस, लहान रात्र, मोठी रात्र- असा प्रकार तेथे नाही. या प्रदेशात संधिप्रकाश नसतो. एकदम सूर्योदय, एकदम सूर्यास्त. सूर्योदयाआधी किंवा सूर्योदयानंतर तेथे संध्यासमय नाही. तू जर सिंगापूरला गेलीस तर तेथे तुला सूर्य अस्तास गेल्यावर एकदम अंधार आलेला दिसेल. आणि म्हणूनच तेथे रोज सायंकाळी चांगला पाऊस पडतो. कारण आकाशातील वाफ एकदम थंड होते व जोराचा पाऊस येतो. सकाळीही तेथे पाऊस पडतो, परंतु तितका जोराचा नसतो. तिकडे नेहमीच हिरवेगार. सिलोनमध्येही पाऊस नेहमी पडतो; म्हणून तर पाचूसारखे बेट असे त्याला म्हणतात.
भूगोल हा मोठा रसाळ व काव्यमय विषय आहे. मी विद्यार्थी होतो तेव्हा भूगोलाचे काव्य आम्हांला कोणी विशेष शिकवीत नसे. परंतु तुम्ही आता त्यातील गोडी चाखत असाल.
मेक्सिकोकडून कढत पाण्याचे प्रचंड प्रवाह अटलांटिक महासागरातून येतात. ते किती वेगाने येतात; आणि त्या प्रवाहाबरोबर बोटी निघाल्या तर लवकर पोचतात. तुला माहीत आहे का की, पॅसिफिक महासागरातही असे प्रवाह आहेत. पॅसिफिक व अटलांटिक दोन्ही महासागरांत समांतर असे हे जलप्रवाह निघतात. प्राचीन काळी अमेरिकेचे व आशियाचे दळणवळण असावे. धर्मराजाच्या राजसूय यज्ञाच्या वेळेस मयासुराने मयसभा बांधून दिली; हा मयासूर का मेक्सिकोतील होता? मेक्सिकोतच मयांची संस्कृती. पॅसिफिकमधील या वेगवान प्रवाहाबरोबर का ते मय गलबतातून येत? मयासूर पाताळातून आला होता. या दंतकथांतून का भूगोल शोधायचा?
परंतु माझ्यापेक्षा तुलाच या गोष्टी अधिक माहीत असतील. हे कढत प्रवाह मेक्सिकोकडून अटलांटिकमध्ये येणारे. त्यामुळे वारे कसे उठतात, त्यांना गर्जणारे वारे, दौडणारे घोडे, वगैरे विशेषणे कशी दिली जातात; युरोपातील देशांना या कढत प्रवाहांमुळे पुढे गरम हवा कशी मिळते व 'वसंत' कसा फुलतो, हे प्रवाह म्हणजे 'युरोपची घोंगडी' असे का म्हणतात, उत्तरेकडून येणारे हिमप्रवाह व हे उष्ण प्रवाह एकत्र मिळून समशीतोष्ण पाणी. या टापूतच माशांची पैदास व्हायला योग्य वातावरण कसे मिळते आणि जगातील मच्छीमारीचा प्रचंड धंदा या न्यू फाउंडलंड भागातच का, हे सारे तू जाणून घेतले असशील. मी आलो म्हणजे हा गंमतीदार भूगोल तू मला समजावून दे. मला नाही या गोष्टी माहीत.
मला भूगोल येत नसला तरी काव्य थोडेफार माहीत आहे. तुला आहे का ठाऊक, वर्डस्वर्थ या थोर इंग्रज कवीला मरून आता शंभर वर्षे होतील? तू या थोर कवींच्या काही कविता वाचल्या असशील. इंग्रजी काव्यात त्याने क्रांती केली. त्याच्यापूर्वी इंग्रजी काव्यात अकृत्रिमता आली होती. आणि रोजच्या जीवनातील अनेक प्रसंगांतही किती काव्यमयता असते हे पूर्वीच्या कवींना दिसले नाही. परंतु हा वर्डस्वर्थ आला. सृष्टीचा तो महान उद्वाता! सृष्टीचा थोर उपासक! इंग्लंडमधील निसर्गाचे त्याने अनेक गीतांतून सुंदर वर्णन केले आहे. त्याच्या काही काही छोट्या कविता नितान्त सुंदर आहेत. ल्यूसी ग्रे, वुइ आर सेव्हन, रेनबो, ककू, सॉलिटरी, रीपर, ऍलिस फेल, पेट लँब, डॅफोडिल्स,- किती तरी छोट्या छोट्या कविता! परंतु सहज-सुंदर आहेत. वर्डस्वर्थची प्रतिभा सर्वत्र सारखीच आहे असे नाही. 'ओड टु इम्मॉरटॅलिटी' हे त्याचे गीत जणू 'उपनिषद' आहे. तेथे शब्दांना जणू पंख फुटल्याप्रमाणे वाटते. भावना व शब्द यांचा रमणीय संगम तेथे आहे. आणि विचारांची उदात्तताही आहे. ''काव्यदेवतेनं त्याच्या हातातील लेखणी घेऊन त्याच्यासाठी लिहिलं'' असे एकाने वर्डस्वर्थबद्दल लिहिताना म्हटले आहे; ते अशी भव्य गीते वाचताना सार्थ वाटते. तो उपेक्षित जनतेचा कवी होता. फ्रान्स देशात क्रांती होऊन बॅस्टिलचा तुरुंग फोडण्यात आला, त्या वेळेस वर्डस्वर्थ नाचला व म्हणाला, ''केवढी थोर घटना घडली. अशा वेळेस जिवंत असणे म्हणजे केवढी कृतार्थता!'' वर्डस्वर्थला क्षुद्रतेची चीड होती. तो नीतिधर्माचा उपासक होता. इंग्लंडमधील लाचलुचपती, गरिबांविषयीची वाढती बेफिकिरी, असंयमी वृत्ती हे पाहून तो म्हणतो, ''मिल्टन, तू दूर राहणारा तारा! ये, पुन्हा ये, इंग्लंडला तुझी जरूर आहे.''