मायलेकरे 10
मुलाला शाळेत घालतात. आईला सोडून तासन् तास कोंडवाड्यात बाळ जाणार. आणि त्या जुन्या काळच्या शाळा. ‘छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’ हे त्या वेळचे शिक्षणशास्त्रातील महान् सूत्र. शाळेतील पंतोजीचे हे मातृकृत वर्णन ऐका :
शाळेचा पंतोजी काय शिकवितो
सोडितो बांधीतो चंचीलागी ॥
शाळेचा पंतोजी शिकवी अकरकी
मुलांची मुखश्री कोमेजली ॥
शाळेचा पंतोजी वाजवीतो छडी
येती रडकुंडी सारी मुलें ॥
शाळेचा पंतोजी मुलांना वाटे यम
केलासे कायम कोंडवाडा ॥
मुलांचा विकास हा असा व्हायचा ? मुलाला शाळेत पाठवताना आईला वाईट वाटे. परंतु बापापुढे काय चालणार ?
शाळेसी जातांना रडे कशोंचे रें आले
पाटीदप्तरांचे ओझें आई ॥
परंतु खरे ओझे पंतोजीच्या मारण्याचे असे. आई मग मुलाच्या बापाला म्हणते :
शाळेच्या पंतोजींना देऊ करावी सुपारी
नका मारूं हो दुपारी तान्हेबाळा ॥
शाळेच्या पंतोजींना देऊ करा धोतरजोडा
सांगा नका देऊ खडा मानेवरी ॥
निदान दुपारच्या उन्हाच्या वेळेस तरी म्हणावे मारू नका. तिरिमिरी यायची. मुलाला नीट चांगले बारीक लिहायला पंतोजीने शिकवावे असे मातेला वाटते. नाही तर पत्रातील श्री बारीक म्हणून जावईबोवा रडू लागले तसे पुढे बाळाचे व्हायचे :
शाळेच्या पंतोजींना देऊ करावी खारीक
बाळ लिहाया शिकू दे नीट अक्षर बारीक ॥
पंतोजीच्या व आईच्या मारण्यातील फरक पुढील ओवीत पहा कसा दाखवला आहे.
माऊलीचा मार नसे पंतोजीसारखा
माउली मायेची असे पंतोजी पारखा ॥
जो प्रेम करतो, त्याला मारण्याचाही हक्क पोचतो. त्याचे मारणेही मधुर असते, पवित्र असते.
क्रोधो हि निर्मलधियां रमणीय एव ।
निर्मळ माणसाचा रागही गोड असतो. परंतु जगात मारण्याचा हक्क सर्वांना पाहिजे असतो. प्रेम करण्याचा हक्क क्वचितच कोणास हवा असतो. असो.
कधी कधी आई मुलावर फार रागावते. ती अबोला धरते. लहान बाळ कावराबावरा होतो. त्याला काय करावे कळत नाही, मग तो शेजीकडे जातो व विचारतो.
शेजी मला सांगा आई प्रेमें कशी घेऊं
रडत उभा राही दीनवाणा ॥
शेजी मला सांगा कसें आईला हंसवावें
जाऊन मांडीवर बसावें एकाएकी ॥
शेजी मला सांगा कसें हसवूं आईला
घरी जाऊन डोळयाला तान्हेबाळा ॥