पहिली माझी ओवी 4
एकुणिसावी माझी ओंवी एकूण एक करा
संसारीं नित्य स्मरा गणेराया २१
विसावी माझी ओंवी विसावा माहेराला
आईच्या आसर्याला सुखशांती २२
एकविसावी माझी ओंवी एकवीस दूर्वा आणा
वाहा देवा गजानना लंबोदरा २३
पहिली माझी ओंवी जगाच्या पालका
रक्षीता बालका देवराया २४
दुसरी माझी ओवी दुजा नको भाव
तरीच पावे देव संसारांत २५
तिसरी माझी ओवी भीकबाळे तीन मोती
संसारी रमापति आठवावा २६
चौथी माझी ओंवी चांडाळचौकडी
त्यांची कधी गडी करूं नये २७
पांचवी माझी ओंवी आपुलीं पांच बोटें
त्यांनी कधी कर्म खोटें करूं नये २८
सहावी माझी ओंवी सहा महाशास्त्रें
निर्मिली विचित्रें ऋषिमुनींनी २९
सातवी माझी ओंवी सात आठवड्याचे वार
आहे हा संसार संकटाचा ३०
आठवी माझी ओंवी आठवा देवकीचा
सखा द्रौपदीचा कृष्णनाथ ३१
नववी माझी ओंवी आहेत नवग्रह
संसारी आग्रह धरूं नये ३२
दहावी माझी ओंवी आहेत दहा दिशा
चंद्रामुळें निशा शोभतसे ३३
अकरावी माझी ओंवी अकरावा अवतार
मानूं ज्ञानेश्वर आळंदीचे ३४
अकरावी माझी ओंवी अक्राळ असूर
नखरा न कर उषाताई ३५
बारावी माझी ओंवी संसारी बारा वाटा
पुण्याचा करी साठा क्षणोक्षणी ३६
तेरावी माझी ओंवी तीन तेरा होती
जरी न जपती जगीं लोक ३७
चौदावी माझी ओंवी चौदा चौकड्यांचा
नाश झाला रावणाचा गर्व होतां ३८
पंधरावी माझी ओंवी पंधरा दिवसांचा पक्ष
संसारात दक्ष राही सदा ३९
सोळावी माझी ओंवी सोळा चंद्रकला
पतीच्या ग कला सांभाळावें ४०