मायलेकरे 35
माऊलीची माया कुणा ग वर्णवेल
पाताळीचा ही थकेल सहस्त्रफणी ४२१
अंधारात दिवा प्राणाला जशी हवा
मातृप्रेमाचा हवा तान्हेबाळा ४२२
आंधळयाला दृष्टी पांगळयाला काठी पाय
तशी असावी ही माय तान्हेबाळा ४२३
पाऊस शेताला माशाला ते पाणी
तशी असावी जननी तान्हेबाळा ४२४
वासराला गाय पाडसा हरिणी
तशी असावी जननी तान्हेबाळा ४२५
भुकेल्याला अन्न तान्हेल्याला पाणी
तान्हेबाळाला जननी तैशापरी ४२६
डोंगराचे पाणी नद्यांना पोसायाला
माउलीचे तसे सारें तान्हेबाळ वाढायाला ४२७
देवा रे ईश्वरा एक गोष्ट आईकावी
आई सावत्र नसावी तान्हेबाळा ४२८
सावत्र आईची प्रीतीहि कडू वीख
दृष्टीत बाण तीख भरलेले ४२९
सावत्र आईची प्रीतीहि विषारी
काटेच बोचतील जरी बाभुळ मिठी मारी ४३०
सावत्र ती आई तान्हेबाळाची ग सासू
आणील डोळया आसूं घडोघडी ४३१
सावत्र माउली माउली ती ना मृत्यु
तान्हेबाळाला जप तूं प्रभुराया ४३२
सावत्र आईची साऊली न पडावी
नागिणीची भेट कधी सुध्दा न घडावी ४३३
सावत्र आईस छळील तान्हेबाळ
होईल त्याची काळ अवदसा ४३४
सावत्र आईस संसारीचा शाप
देईल सदा ताप तान्हेबाळा ४३५
पेटलेली आग पेटलेली खाई
तशी सावत्र ती आई खाष्टनष्ट ४३६
सख्ख्या ग आईची गोड लागे मारपीट
सावत्र आईची कडू साखरेची मूठ ४३७
सावत्र आईला आई तरी कशी म्हणूं
आईच्या नांवाला आपण त्याने अवगणुं ४३८
माउली माउली माउली कामधेनू
माउली गोड वेणू गोविंदाची ४३९
माउली माउली माउली चिंतामणी
बाळाचे जें जें मनीं पुरविते ४४०