सुखदु:खाचे अनुभव 20
पिकलेला अननस हिरवा त्याचा देठ
खोतांना आली भेट अप्पारायांना १८१
पाटील पट्टी करी येतील सचणीला
हिरवी शाल खोतीणीला अक्काबाई १८२
माझ्या ओटीवरी खोतापाटलांची दाटी
तुमच्या नावासाठी बाप्पाजी हो १८३
हातींच्या आंगठ्या कशानें झीजल्या
राशी मोहरांच्या मोजल्या गोपूबाळाने १८४
माझ्या ओटीवर चांदीचे गडवे पेले
मैत्र तुझे पाणी प्याले गोपूबाळा १८५
माझ्या ओटीवरी सतरंज्या लोळती
मैत्र तुझे रे खेळती गोपूबाळा १८६
माझ्या ओटीवरी कशाचा केर झाला
जाई मोडून तुरा केला भाईरायाला १८७
माझ्या ओटीवरी कागदाचा केर
लिहिणार सुभेदार मामाराया १८८
माझ्या ओटीवरी कागद किती पाहूं
लिहिणार माझे भाऊ कारभारी १८९
अंगांत सदरा कोट पायांत कुलपी बूट
तुझ्या चालण्याची ऐट गोपूबाळा १९०
लहानसा कारकून साहेबाच्या डावीकडे
पहिल्या पगाराचे तोडे उषाताईला १९१
लहानसा कारकून साहेबापुढें उभा
तुमच्या स्वारीजोगा गोपूबाळ १९२
लहानसा कारकून साहेबाला आवडला
पगार वाढवीला गोपूबाळाचा १९३
लहानसा कारकून साहेबाची खुशी
पहिल्या पगाराची ठुशी उषाताईला १९४
लहानसा कारकून बैसे साहेबांच्या कडे
पहिल्या पगाराचे पेढे वांटीयेले १९५
माझ्या अंगणात बैसलासे हिरा
सखे तुझा ग नवरा उषाताई १९६
कचेरीच्या पुढें आंवळीचे झाड
सांवळा सुभेदार गोपूबाळ १९७
दळणाची पाटी अखंड जात्यावरी
अन्नछत्र तुझ्या घरीं गोपूबाळा १९८
कारागीरी टोपी आली दारावरी
गोपूबाळ पारावरी मोल करी १९९
शेरभर सोनें लेखणीच्या टांका
हिशोब देतो बापा गोपूबाळ २००