तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 4
देहूचे भाग्य कोणी वर्णावे ! तेथील अणुरेणूंतूनसुध्दा “विठ्ठल विठ्ठल” आवाज येत असेल:
देहूचा अणुरेणू गर्जे विठ्ठल विठ्ठल
लोकां उध्दरील क्षणामाजी
आणि कोकणातील परशुरामाचे देवस्थान् तेथील ती पाखाडी. ती चढायला कठीण असलेली चढण. आई मुलाला म्हणते:
भार्गवराम देवाजीची पायठणी अवघड
येथून पायां पड गोपू बाळा
त्या देवळाला चुना किती लागला, उत्सवात जेवणाचे वेळेस सार करताना चिंच किती लागते, याची गमतीदान वर्णने आहेत :
तिन्ही देवांमध्ये भार्गवराम उंच
सव्वा खंडी चिंच उत्सवाला
तिन्ही देवांमध्ये भार्गवराम जुना
सव्वा खंडी चुना देवळाला
असा हा भार्गवराम; त्याच्या पूजेला रोज कस्तुरी. आणि एक सखी म्हणते:
कस्तुरीचा वास माझ्या ओच्याला कुठूनी
आल्ये सख्याला भेटूनी भार्गवरामा
आणि हिंदुस्थानच्या दक्षिणेकडचा तो रामेश्वर- त्याचे एका ओवीतील वर्णन वाचा:
देवांमध्ये देव रामेश्वर अति काळा
त्याच्या दोंदावर रुद्राक्षांच्या रुळती माळा
चिंचवड, नरसोबाची वाडी, खंडोबा यांचीही वर्णने आहेत;
खोबर्याच्या वाटया हळदी भरल्या
देव भंडारा खेळला जेजूरीचा
कोकणातील राजापूरच्या गंगेचेही वर्णन करणार्या किती तरी ओव्या आहेत:
गंगाबाई आली तळकातळ फोडून
राजापुराला वेढून वस्ती झाली
आणि प्रसिध्द मुंबापुरी ! तेथील ती मुंबादेवी:
मुंबईची मुंबादेवी तिची सोन्याची पायरी
सव्वा लक्ष तारूं उभें कोटाच्या बाहेरी