मायलेकरे 21
नाचती हांसती फुले जशी वेलीवर
तशी माझ्या मांडीवर माझी बाळें १४१
सखीया लेणे लेतीं आपले हारदोरे
आपण दाखवूं आपले बाळ गोरे १४२
तरूलता वेली रानावनांत डोलती
माझ्या घरांत शोभती तान्हीं बाळें १४३
सरोवरामध्यें जशी फुलती कमळें
तशीं शोभतात बाळें घरामध्यें १४४
समुद्राचे तळीं मोती झळाळती
तशीं घरात शोभतीं तान्ही बाळें १४५
तारे चमचम करिती आकाशात
बाळें नाचती घरांत माउलीची १४६
रांगुनी खेळुनी बाळ उंबर्यात बसे
सोन्याचा ढीग दिसे तान्हेबाळ १४७
अंगणीचे खडे मी ग लोटीतें नित्याने
माझे रांगे गुडघ्याने तान्हेबाळ १४८
अंगणीचे खडे झाडिते निरियांनी
बाळ रांगे गुडघ्यांनी उषाताईंचे १४९
शेजारिणी बाई दाट घाली सडा
रांगतो सवंगडा तान्हेबाळ १५०
शेजीबाई तूं गं दाट दाट घाली सडा
माझे बाळ ग रांगते रूतेल हो त्याला खडा १५१
शेजारिणी बाई आटप जाईजुई
अचपळ माझी सई कळया तोडी १५२
शेजारिणी बाई सडा टाक गे भिडूनी
अनाडी बाळ माझा येतो रांगोळी मोडूनी १५३
शेजारिणी बाई आंवर डाळी साळी
अनाडे तान्हेबाळ नको देऊं शिवीगाळी १५४
शेजारिणी बाई आटप मोगरा
अचपळ माझा हिरा गोपूबाळ १५५
शेजारिणी बाई आटप आपले वाळवण
रेती करिल मिसळण तान्हेबाळ १५६
दळणाची पाटी ठेवूं मी कोणीकडे
हिंडते चोहीकडे तान्हेबाळ १५७
शेजी आली घरा बैस म्हणाया चुकल्यें
तुझ्या कामात गुंतल्ये तान्हेबाळा १५८
किती सांगितले नको तूं जाऊ कोठें
लबाड झाले मोठें माझे बाळ १५९
मळयाच्या मळयांत नको तूं जाऊ कोठें
माळीण अवदसा शिव्या देई १६०