तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 7
पंढरीसी जाता पंढरी हिरवीगार
तुळशीला आला भर विठ्ठलाच्या २१
पंढरीसी जातां उभा राहील खांबाशी
चुडे मागेल देवाशी विठ्ठलाशी २२
गुलाबाची फुलें रुपयाला बारा
हारतुरे गजरा करा विठोबाला २३
पंढरपुरांत माळिणी ठमा रमा
फुलांचा पायजमा विठ्ठलाला २४
पंढरपुरांत माळिणी उंच काठी
फुलांची चिंचपेटी रखुमाईला २५
माळ्याच्या मळ्यांत माळिणी गाणी गाती
पूजेला तुळशी नेती विठ्ठलाच्या २६
रुसली रखुमाई बैसली वाळवंटी
धरिली मनगटी विठ्ठलाने २७
चला जाऊं पाहूं खिडकीं उभ्या राहूं
पालखी येते पाहूं विठ्ठलाची २८
कोठे ग जातसा जातसा लवलाही
विठ्ठल-रखुमाई पहावया २९
कोठे ग जातसा जातसा लगबगा
भरली चंद्रभागा बघावया ३०
पंढरपुरांत रखुमाई सुगरीण
पापड तिने केले चंद्रासारखी घडावण ३१
पंढरपुरांत कशाचा वास येतो
कस्तुरीचें माप घेतो भाईराया ३२
पंढरपुरांत काय मौज पाहायाची
हंडी फुटली दह्याची गोकुळांत ३३
पंढरपुरामध्यें दुकानें गोळा केली
रथाला जागा दिली विठ्ठलाच्या ३४
पंढरपुरामध्ये काय बुक्क्याची धारण
पुसे बंगल्यावरून रखुमाबाई ३५
पंढरपुराची होईन वेळणी
वाढीन साखरफेणी विठ्ठलाला ३६
पंढरपुरीची होईन परात
वाढीन साखरभात विठ्ठलाला ३७
पंढरपुरीचा होईन मी गडूं
वाढीन ग लाडू विठ्ठलाला ३८
पंढरपुरींची होईन मी घार
तुपाची वाढीन धार विठ्ठलाला ३९
पंढरपुरींचा होईन कावळा
बैसेन राऊळा विठ्ठलाच्या ४०