मुलगी 9
लांब लांब केस वेणी येते मोगर्याची
फणी आणा घागर्यांची उषाताईला २१
लांब लांब केस आईने वाढवीले
बापाने गोंडे केले उषाताईला २२
मोठमोठे केस मुठींत मावती ना
लिंबावांचून न्हाईना उषाताई २३
मोकळे केस ग सोडून तूं ना जाई
दृष्ट होईल तुला बाई उषाताई २४
गोंडीयाची वेणी पाठीवरी लोळे
भावंडांत खेळे उषाताई २५
पांचा पेडी वेणी मला वाटे काळा साप
पदराखाली झांक उषाताई २६
घागर्या घुंगुर दणाणे माझी आळी
खेळून आली चाफेकळी उषाताई २७
सोनाराच्या शाळे ठिणगुल्या उडती
बिंदुल्या घडती उषाताई २८
उषाताई खेळे तुळशीच्यामागें
केवडयाला ऊन लागे गोपूबाळाला २९
माते माते म्हणून मातेच्या पाठी लागे
कुडयांना मोती मागे उषाताई ३०
माझ्या दारावरनं कोण गेली परकराची
हाती आंगठी हिर्याची उषाताई ३१
झोपाळयावर बसूं हिरव्या साडया नेसूं
सारख्या बहिणी दिसूं उषाताई ३२
काचेची बांगडी कशी भरूं मी एकटी
आहे बहीण धाकटी माझ्या घरी ३३
काचेची बांगडी कशी भरूं मी हातांत
आहे हो घरात लहान बहीण ३४
दोघी ग बहिणी जोडीजोडीने चालती
परकर ते हालती रेशमाचे ३५
नदीच्या पलीकडे हिरव्या परकराची कोण
पैजण वाळ्यांची माझी धाकुटी बहीण ३६
लाडक्या लेकीचे नांव ठुमक बीजली
पायी पैंजण सुंदर ओसरीला की नीजली ३७
लाडकी ग लेक लेक उपाशी निजली
ऊठ ऊठ आता साखर तुपांत थिजली ३८
बाहुलीं बुडकुली भिंतीशी उभी केली
खेळणार कोठे गेली उषाताई ३९
शिंपली कुरकुली बुरुडाला सांगणार
मैना माझी खेळणार उषाताई ४०